LPG Cylinder Crisis : कच्च्या तेलापासून ते तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी गॅस नेमका तयार कसा होतो? कुठून येतो?

    12-Mar-2026   
Total Views |
LPG Cylinder

LPG Cylinder Crisis :
आखातातील युद्धाने जगभरातील ऊर्जा बाजार विस्कळीत केला असताना, त्याचे थेट दुष्परिणाम आता भारताच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागले आहेत. इराण–इस्रायल संघर्षामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाल्याने देशभरात गॅसचा तुटवडा जाणवतो आहे. हॉटेल्स बंद पडण्याची वेळ, घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ, आणि वाढवलेली बुकिंग मुदत या सर्वांमुळे गॅस हा जीवनावश्यक घटक किती महत्त्वाचा आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे. परंतु जीवनावश्यक असलेला हा एलपीजी गॅस नेमका तयार कसा होतो? कुठून येतो? आणि आपल्या स्वंयपाकघरामध्ये पोहोचेपर्यंत त्याचा प्रवास कसा असतो? 

एलपीजी म्हणजे नेमकं काय?

एलपीजी हा मुख्यतः प्रोपेन आणि ब्युटेन या दोन हलक्या हायड्रोकार्बन वायूंचे मिश्रण असतो. हे वायू नैसर्गिकरीत्या जमिनीखाली सापडतात. जेव्हा जमिनीतून नैसर्गिक वायू काढला जातो, तेव्हा त्यासोबत प्रोपेन आणि ब्युटेन देखील असतात. हे वायू वेगळे करून एलपीजी तयार केला जातो. नैसर्गिक अवस्थेत हे घटक वायू स्वरूपात असतात. परंतु, त्यांच्यावर उच्च दाब देऊन त्यांचे रूपांतर द्रवात केले जाते, म्हणूनच याला 'लिक्विफाइड' पेट्रोलियम गॅस म्हणतात.
 
एलपीजी तयार होतो कुठे? दोन मुख्य स्रोत
 
 
१) कच्च्या तेलाची शुद्धीकरण प्रक्रिया (Petroleum Refining)

तेल शुद्धीकरण कारखान्यांमध्ये ‘डिस्टिलेशन’ प्रक्रियेने कच्च्या तेलातील विविध घटक वेगवेगळे केले जातात. यात वरच्या स्तरावर सर्वात हलके घटक प्रोपेन आणि ब्युटेन तर खाली पेट्रोल, डिझेल, केरोसीन त्याखाली हाय फ्युएल ऑइल अशाप्रकारे वेगवेगळे पदार्थ मिळतात.यातील प्रोपेन आणि ब्युटेन वेगळे करून एलपीजी तयार केला जातो.

२) नैसर्गिक वायू प्रक्रिया (Natural Gas Processing)
 
नैसर्गिक वायू जमिनीतून काढताना त्यामध्ये मिथेनसह इतर वायू मिसळलेले असतात. त्यातील ब्युटेन-प्रोपेन वेगळे करून एलपीजी मिळते. भारतातील बऱ्याच एलपीजीची निर्मिती याच स्रोताकडून होते. जगातील साधारण ६० टक्के एलपीजी याच पद्धतीने तयार केला जातो.
 
 
निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी?

१) वायूंचे संकलन (Collection of Gases)

कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू ज्या ठिकाणाहून काढले जाते, तिथेच प्रोपेन आणि ब्युटेनसारखे हलके वायू वेगळे केले जातात. हे वायू ‘गॅदरिंग प्लांट’मध्ये जमा केले जातात. यालाच एलपीजी निर्मितीची पहिली पायरी म्हणता येईल.

२) अशुद्धी काढून टाकणे (Purification Process)
 
या वायूमध्ये हायड्रोजन सल्फाइड, पाणी, घातक घटक, धूळ, तसेच पर्यावरणाला हानीकारक तत्त्वे मिसळलेली असतात. विशेष रासायनिक प्रक्रियेद्वारे ही सर्व अशुद्धी काढून टाकली जाते. शुद्धीकरण जितके दर्जेदार, तितका एलपीजी अधिक सुरक्षित.

३) द्रवीकरण (Liquefaction)

शुद्ध केलेले प्रोपेन व ब्युटेन यांना उच्च दाबाखाली थंड तापमानात द्रवरूपात आणले जाते. द्रवरूपात असल्याने त्याचे प्रमाण कमी होऊन साठवण आणि वाहतूक सोपी होते. हीच एलपीजीची मुख्य निर्मिती प्रक्रिया.

४) मिश्रणाचे अचूक प्रमाण ठरवणे (Blending)

वेगवेगळ्या परिस्थितीनुसार एलपीजीतील मिश्रणाचे प्रमाण बदलते, थंड प्रदेशात प्रोपेनचे प्रमाण अधिक तर उष्ण प्रदेशात ब्युटेनचे प्रमाण अधिक असते. कारण दोन्ही वायूंचे उत्कलन बिंदू वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्य, देश किंवा ऋतूनुसार योग्य मिश्रण तयार केले जाते.

५) साठवण आणि सिलेंडर भरण्याची प्रक्रिया (Storage and Bottling)

तयार एलपीजी ‘बुलेट टँक’ नावाच्या मोठ्या आणि अत्यंत सुरक्षित स्टील टाक्यांमध्ये साठवला जातो. या टाक्यांत दाब व तापमान स्थिर ठेवण्यासाठी आधुनिक उपकरणे बसवलेली असतात. साठवलेला एलपीजी पाइपलाइनद्वारे रिफिलिंग प्लांटमध्ये पाठवला जातो, जिथे तो घरगुती किंवा व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जातो. यानंतर सिलेंडरचे वजन, गळती चाचणी, वाल्व्ह तपासणी केली जाते. सर्व तपासण्यांनंतरच १४.२ किलो किंवा १९ किलो एलपीजी अत्यंत स्वयंचलित यंत्रणांद्वारे भरला जातो. भरलेले सिलेंडर वितरकांकडे आणि तिथून ग्राहकांच्या स्वंयपाकघरापर्यंत पोहोचतात.
 
प्रोपेन आणि ब्युटेनमध्ये नैसर्गिकरित्या कोणताही वास किंवा रंग नसतो. गॅस गळती झाल्यास ती त्वरित लक्षात यावी, यासाठी त्यात 'इथिल मरकॅप्टन' नावाचा उग्र वासाचा पदार्थ मिसळला जातो. कोळसा किंवा लाकडाच्या तुलनेत एलपीजी जळताना खूप कमी प्रदूषण करतो आणि धूर होत नाही, म्हणून याला 'स्वच्छ इंधन' मानले जाते.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\