फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार; हल्लेखोर २० वर्षांपासून होता तयारीत!

    12-Mar-2026   
Total Views |


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीरच्या जम्मू शहरात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. खासगी विवाह समारंभातून बाहेर पडत असताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र या घटनेत ते थोडक्यात बचावले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. Firing on Farooq Abdullah

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जम्मूतील ग्रेटर कैलाश परिसरात घडली. या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते. कार्यक्रमातून बाहेर पडताना संशयिताने पिस्तुलातून गोळीबार केला, मात्र सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ पकडले. या प्रकरणाची चौकशी गंग्याल पोलीस ठाणे करत आहे. सध्या तरी या घटनेत दहशतवादी दुवा आढळलेला नाही, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी संशयिताची ओळख कमल सिंह जामवाल अशी पटवली असून त्याला कार्यक्रमस्थळीच ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या घटनेमागील कारण आणि उद्देश शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. या गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाल्याची माहिती मिळत आहे. Firing on Farooq Abdullah

उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी या घटनेला मोठी सुरक्षा त्रुटी असल्याचे म्हटले. “हा कार्यक्रम रॉयल पार्क, ग्रेटर कैलाश येथे होता. त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांचा एकही कर्मचारी नव्हता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सल्लागार उपस्थित असलेल्या कार्यक्रमात एखादा व्यक्ती शस्त्र घेऊन पोहोचतो, ही गंभीर बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

हल्लेखोर २० वर्षांपासून होता तयारीत
पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर कमल सिंह जामवाल अनेक वर्षांपासून परवानाधारक शस्त्राचा वापर करत होता. तो गेल्या २० वर्षांपासून फारूख अब्दुल्ला यांना ठार मारण्याचा विचार करत होता, असे त्याने चौकशीदरम्यान सांगितले. फारूख अब्दुल्ला, सुरिंदर चौधरी आणि इतर नेते जम्मू-कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते सुरजीत सिंह यांच्या मुलाच्या लग्नसमारंभाला उपस्थित होते. हल्लेखोर हा सुरजीत सिंह यांचा चुलत भाऊ असून तो व्यवसायिक आहे. जुन्या शहरात त्याची काही दुकाने आहेत.

झेड+ सुरक्षा असताना व्यक्ती जवळ पोहोचली कशी
माझे वडील थोडक्यात बचावले. भरलेली पिस्तूल घेऊन एक व्यक्ती अगदी जवळपर्यंत पोहोचला आणि त्याने गोळी झाडली. जवळ असलेल्या सुरक्षा पथकाने तत्काळ हस्तक्षेप करून गोळीची दिशा वळवली आणि त्यामुळे हत्या करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. सध्या उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक आहेत; विशेषतः झेड+ एनएसजी सुरक्षा असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांपर्यंत एखादी व्यक्ती इतक्या जवळ कशी पोहोचली, हा मोठा प्रश्न आहे.
- ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक