Colors Marathi New Serial : कलर्स मराठीवर येणार नवी मालिका; सध्या सुरू असलेली लोकप्रिय मालिका होणार बंद?

12 Mar 2026 18:57:06
Colors Marathi New Serial
 
मुंबई : (Colors Marathi New Serial) छोट्या पडद्यावर टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्या सातत्याने नव्या मालिकांची घोषणा करत आहेत. गेल्या काही महिन्यांत स्टार प्रवाह आणि झी मराठीवरील नव्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता कलर्स मराठी वाहिनीनेही दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे. सध्या कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू असला तरी या सीझनला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाहिनीने नव्या मालिकांवर भर दिल्याचे बोलले जात आहे.
 
नव्या मालिकांची घोषणा
कलर्स मराठीवर जिंकून घेईन मी सारं ही नवी मालिका १६ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानंतर मोहिनी या नव्या मालिकेचीही घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका २३ मार्चपासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित होणार आहे. दरम्यान, ही मालिका कलर्स हिंदीवर गाजलेल्या मधुबाला मालिकेचा रिमेक असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
 
जय जय स्वामी समर्थ मालिकेचा निरोप?
मोहिनी मालिका ७:३० वाजता प्रसारित होणार असल्यामुळे सध्या या वेळेत सुरू असलेली जय जय स्वामी समर्थ ही लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या या मालिकेत स्वामी समर्थांच्या महानिर्वाणाचा भावपूर्ण अध्याय दाखवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कलर्स मराठीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चर्चेमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
 
मनोरंजनसृष्टीतील प्रेमकहाणी
ग्लॅमर, स्टारडम आणि चाहत्यांची वेडी गर्दी अशा मनोरंजनसृष्टीच्या झगमगाटात उलगडणारी मोहिनी ही एक धगधगती प्रेमकहाणी असणार आहे. फिल्मी दुनियेच्या सेटवर जन्मलेली एक सामान्य मुलगी आणि त्याच सेटवर राज्य करणारा एक सुपरस्टार यांची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडच्या चकाकीमागील त्याग, संघर्ष आणि भावनिक घालमेल यांची वास्तवदर्शी बाजूही या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
 
समीर परांजपे मुख्य भूमिकेत
या मालिकेत अभिनेत्री अनघा ठाकूर मोहिनीची भूमिका साकारणार आहे, तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता समीर परांजपे आरके या सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन पूर्णपणे भिन्न स्वभावाचे मोहिनी आणि आरके एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, याभोवती मालिकेची कथा फिरणार आहे.
 
प्रोमोने वेधलं लक्ष
मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये चित्रपटाच्या सेटवरील एक रंजक प्रसंग दाखवण्यात आला आहे. शूटिंग थांबलेलं असताना अचानक सुपरस्टार आरकेची एन्ट्री होते आणि क्षणार्धात वातावरण बदलतं. त्याचवेळी मेकअप बॅग घेऊन धावत येणारी मोहिनी आणि आरकेची धडक होते. मेकअपचं सामान खाली विखुरतं. त्यावर आरके हे फक्त मेकअपचं सामान आहे असे म्हणतो. त्यावर मोहिनी ठामपणे उत्तर देते की हेच सामान माणसाला कलाकार, कलाकाराला स्टार आणि स्टारला सुपरस्टार बनवतं.
 






View this post on Instagram
















A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


या प्रसंगामुळे मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून सुपरस्टारचा अहंकार जिंकणार की मेकअप आर्टिस्ट मोहिनीचा स्वाभिमान हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0