स्ववेदनेतून समाजकार्याचा नवा मार्ग शोधणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे रोहा येथील ‘ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थे’च्या संस्थापक-अध्यक्ष दर्शना आठवले. त्यांच्या समाजकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
दर्शना दीपक आठवले यांचे बालपण सातारा जिल्ह्यातील वाईत गेले. शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षणही वाईमध्येच झाले. ‘मराठी’ हा विषय घेऊन त्यांनी ‘एमए’ केले आणि पुढे साताऱ्यातील आझाद कॉलेजमधून ‘बीएड’ पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सामान्य शाळा आणि महाविद्यालयात सुमारे 30 वर्षे शिक्षिका म्हणून कार्य केले.
त्यांचे माहेर साधे, सुस्थित आणि समाधानी कुटुंब होते. कुटुंबात आई-वडील, मोठा भाऊ, मोठी बहीण आणि त्या अशा चार सदस्यांचे कुटुंब. आई गृहिणी आणि वडिलांचे जनरल स्टोअर होते. लग्नानंतर सासरी आल्यावर दर्शना यांना मोठे कुटुंब लाभले; सासू-सासरे, दोन दीर, जावा आणि त्यांची मुले असा भरगच्च परिवार. आई-वडील, सासू-सासरे यांच्या निधनानंतर सर्वजण काळानुरूप स्वतंत्रपणे राहू लागले.
बालपणापासूनच जीवनात अनेक गोष्टी प्रखर संघर्षातूनच त्यांना मिळाल्या. मात्र, त्या संघर्षातून स्वतःचा शोध घेण्याची जिद्द त्यांच्यात होती. ‘बदकांच्या थव्यामध्ये आपणच राजहंस असल्याचा शोध लागल्याचा आनंद’ हा अवर्णनीय अनुभव त्यांना आयुष्याने दिला. समाजाविषयी सहानुभूती त्यांना लहानपणापासून होती; पण आपल्या हातून इतके मोठे सामाजिक कार्य उभे राहील, असे त्यांना कधी वाटले नव्हते. आयुष्यातील एक वळण मात्र त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास बदलून गेले; त्यांच्या मुलाचा जन्म विशेष (स्पेशल चाईल्ड) अवस्थेत झाला.
त्या काळात रोहा परिसरात अशाप्रकारच्या विशेष मुलांसाठी योग्य अशी एकही शाळा आसपास उपलब्ध नव्हती. त्या वेदनेतून आणि असंख्य पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी व त्यांचे पती यांनी काही पालकांना एकत्र आणले आणि 2006 साली ‘ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थे’ची स्थापना झाली. त्याच अंतर्गत ‘प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा’ सुरू करण्यात आली. सुरुवातीला केवळ सहा मुले, तीदेखील पाल्यच. प्रशिक्षित शिक्षकही नव्हते; पण त्यांनी हार मानली नाही. काहींना प्रोत्साहन देऊन विशेष शिक्षण घेण्यासाठी पाठवले. पहिली शिक्षिका म्हणून दर्शना यांचीच भाची श्रीया अनिकेत जोशी शाळेत रुजू झाली. नंतर आणखी दोन महिलांना प्रशिक्षण देऊन शाळेत शिक्षक म्हणून घेतले. त्यातील एक शिक्षिका रोज पालीहून आणि दुसरी पेणहून येते. बाकीचे कर्मचारी रोहा तालुक्यातून येतात.
शाळा सुरू झाल्यानंतर दर्शना यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे पालक सामान्य मुलांकडे जास्त लक्ष देतात; पण विशेष मुलांच्या गरजांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. म्हणून नाममात्र 200 रुपये फी ठेवण्यात आली; परंतु ती देण्याची सक्ती नाही. आज या संस्थेत एकूण 51 मुले शिक्षण घेत आहेत. त्यापैकी सुमारे 20 टक्के पालक फी भरू शकत नाहीत, तरीही संस्थेने कधीही त्यांच्यावर सक्ती केलेली नाही. कारण, अशा मुलांच्या जन्मानंतर पालक आधीच मानसिक आणि आर्थिक अडचणीत असतात. गेल्या 20 वर्षांपासून ही संस्था केवळ दानशूर व्यक्तींच्या मदतीवर चालत आहे.
संस्थेत सध्या तीन शिक्षक, एक क्लार्क, एक शिपाई, चार आया आणि एक मदतनीस असे दहा कर्मचारी कार्यरत आहेत. पाच ते 30 वर्षे वयोगटातील मुले येथे शिक्षण घेतात. 18 वर्षांवरील मुलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. त्यातून पेपरची फुले, मेणबत्त्या, बुके, ग्रीटिंग कार्ड्स तयार केली जातात. सध्या मुलांकडून नर्सरी तयार करणे आणि कचऱ्यातून खतनिर्मिती हे उपक्रमही राबवले जात आहेत. ‘जन शिक्षण संस्था’ आणि ’एक्सेल इंडस्ट्री’ यांच्या सहकार्याने मसाले तयार करण्याचे प्रशिक्षणही मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिले जाते.
रोहा येथील मेहेंदळे हायस्कूलसमोर असलेल्या दगडी शाळेच्या इमारतीत ही संस्था कार्यरत आहे. अनेक अडचणी, आर्थिक मर्यादा आणि संघर्ष असूनही दर्शना आठवले यांनी ही ‘ज्ञानगंगा’ अखंड वाहती ठेवली आहे. स्वतःच्या वेदनेला समाजासाठी शक्तीत रूपांतरित करणारी ही स्त्री आज अनेक विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरली आहे. त्यांच्या कार्यातून हेच सिद्ध होते की, संघर्षातून जन्मलेली संवेदना जेव्हा कृतीत उतरते, तेव्हा ती समाजासाठी ‘ज्ञानगंगा’ बनते.
आज समाजात ‘स्पेशल चाईल्ड’ ही संकल्पना केवळ वैद्यकीय किंवा शैक्षणिक विषय म्हणून न पाहता, संवेदनशीलतेने आणि समजुतीने पाहण्याची गरज आहे. प्रत्येक विशेष मूल हे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याची नव्हे, तर त्याला सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगण्याची संधी देण्याची जबाबदारी आपली आहे. दर्शना आठवले यांनी स्वतःच्या मुलाच्या अनुभवातून ही जाणीव केवळ शब्दांत मांडली नाही, तर ती कृतीत उतरवली. त्यांच्या प्रयत्नांतून उभी राहिलेली ‘ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था’ ही अशाच असंख्य विशेष मुलांसाठी आशेचा आणि आत्मविश्वासाचा दीप बनली आहे. दर्शना आठवले यांची कहाणी ही एका आईच्या वेदनेतून जन्माला आलेल्या समाजकार्याची कहाणी आहे. म्हणूनच, आज रोह्यातील अनेक विशेष मुलांच्या आयुष्यात त्या केवळ संस्थापक नाहीत, तर एक ‘आधारवड’ आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने दर्शना आठवले यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क - 9850217735)