संतविचारांच्या अधिष्ठानावर उभी असलेली ‘चोखोबा ते तुकोबा-एक वारी समतेची’ ही चळवळ गेल्या आठ वर्षांपासून समाजमनात समतेचा दीप प्रज्वलित करीत आहे. ‘संत चोखामेळा अध्यासन केंद्र’ आणि ‘वृंदावन फाऊंडेशन, पुणे’ यांच्यावतीने या यात्रेचे सातत्याने आयोजन केले जाते. संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथून सुरू होणारी ही वारी देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमीपर्यंत प्रवास करते. त्यानिमित्ताने यंदाच्या वारीचा परामर्श घेणारा हा लेख...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात वारकरी संप्रदाय ही केवळ धार्मिक परंपरा नसून, सामाजिक समतेची व्यापक चळवळ म्हणून ओळखली जाते. ही संतांची भूमी आहे. संतवाङ्मयाने माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचा आणि भेदभावाच्या भिंती मोडून काढण्याचा जो विचार दिला, त्याची परंपरा आजही समाजाला दिशा देत आहे. ‘या रे या रे लहान-थोर, याती भले नारी-नर,’ असा सर्वसमावेशक संदेश देणार्या संतवाणीने महाराष्ट्राच्या समाजजीवनात समन्वय, बंधुभाव आणि मानवतेची बीजे रोवली. याच विचाराने यंदाच्या वर्षी दि. १ फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंती दिनी समता वारी यात्रेचा शुभारंभ झाला. दि. ९ फेब्रुवारी रोजी देहूगाव येथे तिची सांगता झाली. सुमारे १७५० किमीचा प्रदीर्घ प्रवास करत, ही वारी सोलापूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत गेली. गावोगाव, वाड्या-वस्त्यांवर, शहरी परिसरात, तसेच शाळा व महाविद्यालयांत जाऊन समतेचा संदेश दिला गेला. संवाद, परिसंवाद, चर्चासत्रे आणि संतवाङ्मयाच्या वितरणातून बंधुभाव हाच खरा धर्म हा विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न झाला. या यात्रेत ‘संत सोयराबाई : व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या ग्रंथाच्या प्रती मान्यवरांना भेट देण्यात आल्या. तसेच ‘चोखोबावाणी दिनदर्शिका’ आणि समता वारीविषयीची पत्रके समाजात वितरित करण्यात आली.
वारकरी परंपरेचा गाभा हा समन्वयात आहे. संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्म लोकभाषेत आणून सामान्य माणसापर्यंत पोहोचवले; भागवत वारकरी धर्मप्रणेते संत नामदेवांनी भक्तीला लोकजीवनाशी जोडले; संत एकनाथांनी जातीय विषमतेला कठोर विरोध केला; तर संत तुकाराम महाराजांनी अभंगातून सर्व मानव समान असल्याचा ठाम संदेश दिला. संत चोखामेळा महाराजांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत समतेचा विचार कृतीत उतरवला. पुढे संत गाडगेबाबांनी स्वच्छता, प्रबोधन आणि समतेचा ध्यास घेत समाजाला जागवले. या अखंड संतपरंपरेचा वारसा आधुनिकसंदर्भात पुढे नेण्याचे कार्य समता वारी करत आहे. आजच्या काळात समाजात तणाव, अस्मितांचे संघर्ष आणि भेदभावाच्या घटना वाढताना दिसतात. अशा वेळी वारकरी विचारांचा समन्वयवादी दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा ठरतो. चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला विठ्ठल अठरापगड जातींना एकत्र आणणारा प्रतीक आहे. वारकरी संप्रदायाची मुळे बहुजनांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक हिताशी जोडलेली आहेत. समता, बंधुता आणि मानवता ही त्याची मूलभूत मूल्ये आहेत.
यंदाच्या समता वारीत विविध ठिकाणी अभिवादन सभा, सार्वजनिक समता संवाद, महाविद्यालयांत व्याख्याने, परिसंवाद आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. पंढरपुरातील मंदिरप्रवेश सत्याग्रह स्मारक तनपुरे महाराज मठ, विश्वपुण्यधाम पीठ (कैकाडी महाराज मठ) आणि महाद्वार परिसरात समता सभांचे आयोजन करण्यात आले. विशेषतः संत सावता महाराजांच्या अरण मंदिरात संपन्न झालेल्या ‘सावता-चोखोबा शब्दमेळा’ या कवी संमेलनाने मोठी दाद मिळवली. संतविचार आणि समतेचा संदेश कवितांमधून व्यक्त झाल्याने या कार्यक्रमाने यात्रेला सांस्कृतिक समृद्धीची जोड दिली. यावर्षीची समता वारी आणखी एका कारणाने विशेष ठरली, ते म्हणजे समाजातील निःस्वार्थी कार्यकर्त्यांचा शोध आणि त्यांचा सन्मान. समाजातील खरे अन्मोल हिरे ओळखून त्यांना वारकरी परंपरेने गौरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. धाराशिव येथील समाजकार्यकर्ते नामदेव वाघमारे यांचा भाई उद्धवराव पाटील स्मारक येथे तुकोबांची पगडी घालून सन्मान करण्यात आला. ते दर आठवड्याला धाराशिव शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून त्यांना अभिवादन करतात. हा उपक्रम केवळ सेवा नाही, तर इतिहासाशी जपलेले नाते आहे.
तसेच पैठण येथे संत चोखोबांच्या मंदिर व मठाच्या संरक्षणासाठी संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर चाबूकस्वार यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या यात्रेदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक ‘पद्मश्री’ अण्णा हजारे यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत संत चोखामेळा आरोग्य केंद्राच्या कार्याविषयी माहिती घेतली आणि हा प्रकल्प प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केली. समता वारीचा आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे, संत चोखोबांच्या विचारांचा प्रसार. धुळे-जालना महामार्गावर मेहुणाराजा गावाकडे वळणार्या ठिकाणी संत चोखोबांच्या फोटोसह माहितीफलक उभारण्यात आला. स्थानिक शिक्षक बंधू-भगिनींनी पुढाकार घेऊन हा संकल्प साकार केला. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणार्या प्रत्येकाला संत चोखोबांचे दर्शन आणि त्यांच्या विचारांची ओळख होणार आहे.
या यात्रेत विशेषत्वाने तरुणांचा सहभाग लक्षणीय दिसून आला. युवक-युवती विविध सामाजिक स्तरांतून सहभागी होत संवाद, विचारमंथन आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय झाले. समतेच्या मूल्यांबद्दल जागरूक होणारी ही तरुणाई समाजपरिवर्तनाची खरी ऊर्जा आहे. समता वारी ही केवळ यात्रा नाही, ती इतिहासाशी संवाद साधणारी आणि वर्तमानाला दिशादर्शन करणारी चळवळ आहे. संतांनी मांडलेल्या समतेच्या विचारांना आधुनिक समाजरचनेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. सामाजिक लोकशाहीची मूल्ये केवळ घटनापुस्तकात न राहता, व्यवहारात रुजावीत, हा या चळवळीचा मूलभूत हेतू आहे. आज समाज अनेक आव्हानांच्या उंबरठ्यावर उभा आहे; परंतु संतपरंपरेने दिलेला समतेचा दीप अजूनही तेवत आहे. त्या प्रकाशात समाजाला दिशा देणारी ही समता वारी म्हणजे परिवर्तनाची आशादायी पाऊलवाट आहे. समता, बंधुता आणि मानवता या मूल्यांवर आधारलेला समाजच खर्या अर्थाने सुदृढ आणि एकात्म होऊ शकतो. त्या दिशेने वाटचाल करणारी ‘चोखोबा ते तुकोबा-एक वारी समतेची’ ही चळवळ समाजमनात नव्या परिवर्तनाची प्रेरणा जागवत आहे. ही वारी म्हणजे विचारांची क्रांती, मानवतेची एकता आणि उज्ज्वल भविष्याची दिशा आहे.
संत चोखामेळा ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज या संतपरंपरेतील समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश जनमानसात अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने एक वारी समतेची ही संकल्पना साकार झाली. सचिन पाटील यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाने यावर्षीच्या समता वारीतून विचारांना कृतीची जोड दिली. समता वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक संवाद आणि परिवर्तनाची चळवळ आहे. भेदभाव संपवून समाजमन जोडण्याची दिशा या वारीतून दृढ होत आहे. यावर्षीच्या समता वारीच्या संयोजन समितीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. सहकारी, कार्यकर्ते आणि समतेच्या विचारांनी प्रेरित नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांतून ही वारी यशस्वीरित्या पार पडली. समता वारी ही चळवळ समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत राहील.
- डॉ. सुनील बळीराम गायकवाड,
अध्यक्ष, समता वारी २०२६, माजी खासदार
वारकरी संप्रदायाच्या मूलभूत तत्त्वज्ञानात स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव मान्य नाही. या परंपरेत स्त्रीला दुय्यम स्थान नसून तिला समान सन्मान आणि आध्यात्मिक अधिकार देण्यात आला आहे. ‘संत चोखोबा ते तुकोबा-एक वारी समतेची’ हा उपक्रम या मूल्यांचीच पुनर्स्थापना करणारा आहे. समाजात अजूनही विविध स्तरांवर असमानता दिसून येते; परंतु वारकरी विचार आपल्याला परस्पर सन्मान, संवेदनशीलता आणि समानतेचा मार्ग दाखवतात. समता वारीच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेचा आणि बंधुभावाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचत आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. समतेवर आधारलेला समाज अधिक सक्षम आणि सुदृढ बनतो, याची जाणीव या चळवळीतून दृढ होत आहे.
- वर्षा हांडे, उपाध्यक्ष, समता वारी संयोजन समिती
- सचिन पाटिल