१०.६० लाख सदस्यांसह विद्या भारती माजी विद्यार्थी परिषद जगात अव्वल!

    11-Mar-2026   
Total Views |
Vidya Bharati
 
मुंबई : (Vidya Bharati) विद्या भारती या अखिल भारतीय शिक्षण संघटनेच्या माजी विद्यार्थी परिषदेला १०.६० लाख नोंदणीकृत सदस्यांसह जगातील सर्वात मोठ्या माजी विद्यार्थी संघटनेचा मान मिळाला आहे. या संघटनेतील नोंदणीकृत सदस्य सध्या जगातील ९२ देशांमध्ये विविध क्षेत्रांत सेवा देत आहेत. या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी असून तिच्याकडे सुमारे ८ लाख माजी विद्यार्थी नोंदणीकृत आहेत.
 
विद्या भारती माजी विद्यार्थी परिषदेचे अनेक सदस्य नासा, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपल यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. याशिवाय ते सामाजिक सेवेसह विविध क्षेत्रांतही सक्रिय भूमिका बजावत आहेत. २०१९ मध्ये ऑनलाइन नोंदणीसाठी पोर्टल सुरू केल्यानंतर अवघ्या चार वर्षांतच या संघटनेने जगात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले.
 
उल्लेखनीय म्हणजे, विद्या भारतीचे देशभरात सुमारे १३ हजार विद्यालये आहेत. या विद्यालयांमध्ये सध्या सुमारे ३५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका अंदाजानुसार, आतापर्यंत या विद्यालयांमधून ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले आहेत. त्यापैकी १०.६० लाख माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केली आहे. हे सर्व विद्यार्थी सामाजिक सेवेत सक्रिय सहभाग घेत असून देशभरातील विविध जिल्हा आणि राज्य स्तरावरील संघटनांमार्फत दरवर्षी लाखो रुपयांच्या शिष्यवृत्ती देऊन होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते.
 
हेही वाचा : ममतांच्या 'त्या' व्हिडिओवरून राजकीय वातावरण तापले!
 
मुख्य आकडेवारी
 
१०.६० लाख नोंदणीकृत सदस्य
 
१३ हजार शाळांमध्ये ३५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
 
एकूण माजी विद्यार्थ्यांची संख्या ६५ लाखांहून अधिक
 
विद्या भारतीच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा खरा अर्थ समाजसेवेतून दाखवून दिला आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी एका माजी शिक्षकाच्या कुटुंबावर संकट ओढवले असताना या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत त्यांना आधार दिला. शिक्षकांच्या निधनानंतर त्यांच्या आजारी मुलीच्या उपचारांची जबाबदारी घेतली आणि तिच्या दोन लहान मुलांचीही काळजी घेतली. त्या मुलीचाही आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर या दोन मुलांचे संगोपन, शिक्षण आणि अन्नाची व्यवस्था माजी विद्यार्थ्यांनीच केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या उध्वस्त झालेल्या घराचे पुनर्बांधकाम करण्यात आले आणि घरासमोर एक दुकान उभारून कुटुंबासाठी नियमित उत्पन्नाची सोय करण्यात आली.
 
हे वाचलत का? - Women Farmers: विधानभवनात महिला शेतकऱ्यांचा गौरव! मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान...
 
कोविडच्या काळात समाजाला परस्पर सहकार्य आणि बंधुभावाची सर्वाधिक गरज होती. त्या काळात विद्या भारतीचे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर पुढे आले. याच उत्साहातून सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र जोडण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलवर मोठ्या संख्येने नोंदणी होऊ लागल्याने ही संघटना जगातील सर्वात मोठी माजी विद्यार्थी संघटना बनली. आज जेव्हा कोणतेही सामाजिक अभियान सुरू केले जाते, तेव्हा जगभरातून एकाच वेळी २० लाखांहून अधिक हात त्या कार्यासाठी पुढे सरसावतात.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक