सामान्यातून असामान्यतेकडे...

11 Mar 2026 12:24:07
Prathamesh Fadtare
 
असामान्य मेहनतीच्या जोरावर जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरावर रस्सीखेच खेळाचे प्रतिनिधित्व करणार्‍या प्रथमेश फडतरे यांच्याविषयी...
 
आज फक्त क्रिकेटच नाही, तर विविध खेळांमधून भारतीय खेळाडू आदर्श म्हणून समाजासमोर उभे राहताना दिसतात. देशाच्या क्रीडाक्षेत्राचे बदलणारे दृश्य निश्चितच सुखावह असेच. देशातील क्रीडाक्षेत्रातील असेच एक खेळाडू म्हणजे प्रथमेश फडतरे होय.
प्रथमेश यांचा जन्म सातार्‍यात आजोळी झाला. प्रथमेश यांचे कुटुंब मुंबईमधील लालबाग येथेच वास्तव्यास होते. प्रथमेश यांचे वडील ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ येथे नोकरीस होते, तर आई गृहिणी. प्रथमेश यांचे सर्व शालेय शिक्षण ‘इंडियन एज्युकेशन संस्थे’च्या विविध शाळांमध्ये झाले. याच शाळांमध्ये प्रथमेश यांच्यातील क्रीडाकौशल्याच्या विकासाला हातभार लागला. बालवर्गात असल्यापासूनच मल्लखांब, धावणे अशा शालेय स्पर्धांमध्ये प्रथमेश हिरिरीने सहभागी झाले. इयत्ता सातवीत असताना राजा शिवाजी विद्यालयातील खेळाच्या राठोड सरांनी ‘रस्सीखेच’ या नव्या खेळाच्या शालेय जिल्हास्तरीय संघाची घोषणा केली. तसेच, यामध्ये सहभागासाठी मैदानामध्ये इच्छुक खेळाडूंना बोलावण्यात आले होते. अर्थातच नवीन काही शिकण्याच्या आवडीमुळे प्रथमेश यांची पाऊले तिकडे वळली. इथेच रस्सीखेच आणि प्रथमेश हे समीकरण कायम झाले. रस्सीखेच खेळासाठी त्यांची शालेय
स्पर्धेसाठी निवड झाली. त्या स्पर्धेत शाळेला उत्तम यशही मिळाले. मात्र, या स्पर्धेमध्ये त्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली नाही. मात्र, हार न मानता प्रथमेश यांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले.
 
त्यांनी पुढील एका वर्षात या खेळाचे कौशल्य बारकाईने आत्मसात केले. त्यामुळेच इयत्ता आठवीमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेतून त्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली. त्या स्पर्धेमध्ये प्रथमेश यांची कामगिरी उत्तम झाली, तरीही अनुभवामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धांसाठी झाली नसल्याने प्रथमेश थोडे निराश झाले. मात्र, त्याचवेळी एका खेळाडूला साजेशा वृत्तीनुसार त्यांनी पुढच्या वर्षीच्या शालेय स्पर्धांमध्ये जिल्हा आणि राज्यस्तरीय पातळीवर उत्तम कामगिरी करत, राष्ट्रीय पातळीवर त्यांची दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतरच्या काळामध्ये प्रथमेश यांनी १५ पेक्षा अधिक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
 
रस्सीखेच खेळाशी जोडलेली त्यांची नाळ शालेय जीवनानंतर महाविद्यालयीन जीवनामध्येही जोडलेलीच राहिली. दादरच्या नवहिंद महाविद्यालयातून अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण करतानाही प्रथमेश मैदानामध्ये चमकदार कामगिरी करतच होते. पुढे शिक्षणासाठी त्यांनी माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत, पत्रकारितेमध्ये पदवीही संपादन केली. प्रथमेश यांनी याच काळामध्ये फोटोग्राफीचे कौशल्य आत्मसात करत, स्वतःचा व्यावसायदेखील सुरू केला. मात्र, त्यावेळीदेखील रस्सीखेच खेळाचा नैमित्तिक सराव त्यांनी एकही दिवस चुकवला नाही. शिवाजी पार्कच्या ‘एकलव्य क्लब’कडून रस्सीखेच खेळताना सरावाच्या सुरुवातीपासून सराव संपेपर्यंत प्रथमेश यांचा वावर समान उत्साहाने मैदानामध्ये असे. हा उत्साहच त्यांच्या खेळातील प्रगतीचे मर्म ठरले. ‘संघाच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही स्थानावर खेळणारा आणि प्रसंगी कोणतीही जबाबदारी निभावणारा खेळाडू’ म्हणून ‘एकलव्य संघा’मध्ये असलेले प्रथमेश यांचे स्थान वादातीत आहे.
 
पुढे प्रथमेश यांची निवड भारतीय संघामध्ये झाली होती. देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रथमेशसाठी आनंदाचा क्षण होता. मात्र, थायलंड येथे होणारी स्पर्धा तिकडच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे झालीच नाही. मात्र, प्रथमेश यांनी हार मानली नाही. सातत्याने संघासाठी सर्व काही देत उत्तम कामगिरीसाठी त्यांचे प्रयत्न ते करतच राहिले. त्यामुळे नंतरच्या नेपाळ येथील स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर अलीकडेच मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये भारताचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते.
 
प्रथमेश यांनी पुढे भारतीय पोस्ट खात्याची परीक्षा देत, खेळाडूंसाठीच्या कोट्यातून त्यांना नोकरीदेखील लागली. सध्या ते मुंबई येथे कार्यरत असून, नोकरी सांभाळत रस्सीखेचचा सराव करत आहेत. मिळालेल्या यशाचे श्रेय प्रथमेश कुटुंब आणि मार्गदर्शक प्रशिक्षक यांना देतात. आई-वडील यांनीही खेळामध्ये चांगली कमगिरी करण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिल्याचे प्रथमेश अधोरेखित करतात, तर शाळेतील राठोड सरांपासून ‘एकलव्य क्लब’मधील विल्सन वरळीकर सर, सतीश खरटमल सर, नंदकिशोर शिंदे सर आणि शांताराम नाईक सर यांचेही अमूल्य असे योगदान लाभल्याचे प्रथमेश सांगतात. देशासाठी ‘सुवर्ण’ पदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाले असले, तरी ऑलिम्पिकमध्ये देशाला या खेळामध्ये ‘सुवर्ण’ मिळवून देण्याचे स्वप्न प्रथमेश उराशी बाळगून आहेत. लवकरच या खेळाचा समावेश पूर्वीसारखा ऑलिम्पिकमध्ये व्हावा, अशी अपेक्षाही प्रथमेश नम्रपणे व्यक्त करतात. प्रथमेश यांना त्यांच्या भविष्यातील देशसेवेसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 - कौस्तुभ वीरकर
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0