मुंबई : (Goregaon–Mulund Tunnel) गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाच्या टप्पा ३-ब अंतर्गत जुळ्या बोगद्यांच्या खोदकामासाठी बोगदा खनन संयंत्र(टीबीएम)चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये उतरवण्याची प्रक्रिया बुधवार,दि.११ मार्च रोजी औपचारिकरीत्या सुरू करण्यात आली. नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत तब्बल तीन महिने आधी ही प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पाच्या कामाला लक्षणीय गती मिळणार आहे. या प्रक्रियेची मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहून पाहणी केली. या टप्प्यानंतर बोगद्याच्या प्रत्यक्ष खनन कार्याला लवकरच सुरुवात होणार आहे.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता नरेश मेघराजानी, कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे यांच्यासह अधिकारी व सल्लागार उपस्थित होते.
१२.२० किमीचा महत्त्वाकांक्षी दुवा
मुंबई महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारा १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव–मुलुंड जोड मार्ग हा पश्चिम आणि पूर्व उपनगरांना थेट रस्तेमार्गाने जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड येथील खिंडीपाडा दरम्यान प्रत्येकी ४.७० किलोमीटर लांबीचे समांतर जुळे भूमिगत बोगदे उभारण्यात येणार आहेत. बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर असून संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात तो १३ मीटर असेल. हे बोगदे पूर्णपणे जमिनीखालील असून पर्यावरणपूरक पद्धतीने अभयारण्याखाली बांधले जाणार आहेत. प्रत्येक बोगद्यात तीन मार्गिका असतील.
या प्रकल्पासाठी १४.४९ मीटर व्यासाची S-118 आणि S-119 ही प्रत्येकी २१७५ मेट्रिक टन वजनाची दोन अत्याधुनिक टीबीएम वापरली जाणार आहेत. ही मुंबईत आजपर्यंत वापरली जाणारी सर्वात मोठ्या व्यासाची यंत्रणा आहे. सुमारे २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३० मीटर खोल अशा या शाफ्टमध्ये टीबीएम उतरवण्यासाठी आवश्यक खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे.
८०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेन कार्यरत
टीबीएमचे सुटे भाग शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी ८०० आणि ३५० मेट्रिक टन क्षमतेच्या अत्याधुनिक क्रेन कार्यरत आहेत. आज १३५ मेट्रिक टन वजनाचा ‘टाईप ए शिल्ड’ हा मुख्य खनन घटक यशस्वीपणे उतरवण्यात आला. महत्त्वाच्या तांत्रिक घटकांची जुळवाजुळव पूर्ण झाली असून पुढील टप्प्यात टीबीएमची अंतिम संरचना उभारली जाणार आहे. त्यानंतर बोगद्याच्या प्रत्यक्ष खनन प्रक्रियेला गती दिली जाईल.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.