घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले; शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस

11 Mar 2026 14:24:43
sharad pawar
 
मुंबई : (sharad pawar) अहिल्यानगरमधील शरद पवार गटाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांना घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले आहे. विधान परिषद विशेषाधिकार समितीने मोरे यांना ३० दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा देण्याची शिफारस केली आहे.
 
या समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी या संदर्भातील १६७ पानांचा अहवाल मंगळवारी सभागृहात सादर केला. सूर्यकांत मोरे यांनी दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी जामखेड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या भाषणात विधान परिषद, सभागृहाची रचना, कायदेनिर्मिती प्रक्रिया आणि सभापती यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. समितीने ६ बैठका घेऊन या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला.
 
याबाबत समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले की, "सूर्यकांत मोरे यांनी केलेले कृत्य केवळ सभागृहाचा अवमान नाही, तर या सभागृहात पूर्वी कामकाज केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे यांसारख्या महान विभूती आणि संविधान यांचाही हा अप्रत्यक्ष अवमान आहे. अशा कृत्यांमुळे जनमानसाचा घटनात्मक संस्थांवरील विश्वास उडू शकतो. भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा कोणाकडूनही घडू नये आणि समाजात एक जरब बसावी, या हेतूने समितीने ही शिक्षा सुचवली आहे. भारतीय न्याय संहितेनुसार अशा प्रकरणात २ वर्षांपर्यंतच्या कारावासाचे प्रावधान असले, तरी समितीने ३० दिवसांच्या शिक्षेची शिफारस केली आहे," असे त्यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0