Pune SSC Paper leak : परीक्षेपूर्वीच पुण्यात दहावीचे दोन्ही गणिताचे पेपर टेलिग्रामवर लीक

    11-Mar-2026   
Total Views |
Pune SSC Paper Leak
 
पुणे : (Pune SSC Paper leak) पुण्यात दहावीच्या गणिताच्या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पुणे बोर्डाने तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि 'कॉपीमुक्त' वातावरणात पार पाडण्यासाठी कंबर कसली असतानाच पुण्यात हा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
 
गणित भाग-२ चा पेपर तीन दिवस आधीच ग्रुपवर
पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याने पुणे बोर्डाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत गंभीर प्रकार उघडला आहे. गणित भाग-१ आणि भाग-२ चे पेपर परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाले, तर गणित भाग-२ चा पेपर तीन दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आला होता. बोर्डाने अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली असता दोन्ही पेपर तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले.
 
पोलिस कारवाई
या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, टेलिग्राम ग्रुपचे अॅडमिन व सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलीसांच्या मदतीने पेपर कसा लीक झाला? मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा तांत्रिक तपास सुरु आहे. पोलिसांनी या घटनेमागे मोठ्या रॅकेटची शक्यता वर्तवली आहे आणि मुख्य सूत्रधार पकडणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
 
बीडमध्ये पारंपरिक कॉपी पुरवठा
पुण्यातील हायटेक पद्धतीने पेपर लीक होत असतानाच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी परीक्षा केंद्रावर पारंपरिक पद्धतीने कॉपी पुरवण्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थी नातेवाईकांकडून चिट प्राप्त करत असल्याचे स्पष्ट झाले, तर पेपरचे चिट एका दगडात गुंडाळून खिडकीतून फेकल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
 
राज्यातील परीक्षा पारदर्शकतेस संकट
राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त पार पाडण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुण्यातील या प्रकारामुळे राज्य मंडळाच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात हा प्रकार घडल्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
 

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.