नेतृत्वबदलाने मतभेद

    11-Mar-2026   
Total Views |
Mojtaba Khamenei
 
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खामेनी मारले गेले. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आता मोज्तबा खामेनी यांची निवड करण्यात आली आहे. मोज्तबा खामेनी यांच्याकडे आता इस्लामिक क्रांतीचे नवे नेतृत्व म्हणून पाहिलं जातंय. मात्र, इराणमधील सद्यस्थिती पाहिल्यास भू-राजकीय परिस्थिती वेगाने बदलताना दिसते. देशात नवीन सर्वोच्च नेत्याची नियुक्ती झाल्यानंतर तेथील जनमतही दोन गटांत विभागले गेले. एका बाजूला मोज्तबा खामेनी यांना पाठिंबा देणारा गट आहे, तर दुसरीकडे मुल्ला शासनाचा विरोध करणारा गट सक्रिय आहे. यादरम्यान अनेक नागरिक ऑनलाईन किंवा गुप्तपणे अधिक दडपशाही वाढण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
 
दि. ९ मार्चची गोष्ट. एन्गेलाब स्क्वेअर येथे दुपारच्या सुमारास मोठी गर्दी जमली होती. लोक मोज्तबा खामेनी यांचे पोस्टर हातात घेऊन घोषणा देत होते. देशातील अनेक शहरांमध्येही अशाच प्रकारची दृश्ये सरकारी वाहिन्यांवर दाखवण्यात आली. सुरक्षा दल तैनात असतानाही लोक ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘इस्रायल मुर्दाबाद’ अशा घोषणा देत होते. अनेकजण मोज्तबांना ‘बासिज’चे अनौपचारिक नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व मानतात. आतापर्यंत त्यांनी राष्ट्राला कोणतेही अधिकृत संबोधन केलेले नाही. समर्थकांच्या मते, ही नियुक्ती सत्तेतील सातत्याचे प्रतीक आहे. दुसरीकडे, अनेक इराणी नागरिक गेल्या तीन दशकांतील दडपशाहीसाठी अली खामेनी यांना जबाबदार धरतात. त्यांच्या कठोर इस्लामी धोरणांच्या विरोधात झालेल्या संघर्षांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते.
 
त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर काही ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून आनंद व्यक्त केल्याचेही सांगितले जाते. मोज्तबा यांच्या नियुक्तीच्या घोषणेपूर्वी सोशल मीडियावर ‘मोज्तबा मुर्दाबाद’ असे व्हिडिओ व्हायरल झाले होते. इंटरनेटबंदी असूनही काही लोक संदेश पाठवत असल्याचे समोर आले. मोज्तबा आपल्या वडिलांपेक्षा अधिक कट्टर असल्याची भीती व्यक्त केली जात असून, ‘बासिज’ आणि ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’वर त्यांची मजबूत पकड असल्याने पुढील काळात दडपशाही वाढू शकते, अशीही चर्चा आहे. ‘बासिज’ आणि ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ या दोन्ही संघटना इराणमध्ये आंदोलन दडपणे, विरोधकांवर कारवाई करणे आणि शासन टिकवून ठेवणे, यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे मोज्तबा सत्तेत आल्यास सुरक्षा यंत्रणांवर अधिक अवलंबून राहून कठोर धोरणे राबवतील, अशी भीती व्यक्त होते. 
 
इराणमध्ये २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर मोठे आंदोलन झाले होते. याला ‘इराणीयन ग्रीन मुव्हमेंट’ असेही म्हटले जाते. त्यावेळी आंदोलकांनी निवडणूक गैरप्रकाराचा आरोप केला होता. अनेक पाश्चिमात्य विश्लेषक आणि विरोधकांचा दावा आहे की, त्या काळात मोज्तबा यांनी ‘आयआरजीसी’ आणि ‘बासिज’ यांच्यावर जनआंदोलने कठोरपणे दडपण्यासाठी प्रभाव टाकला. या आंदोलनांदरम्यान शेकडो लोकांना अटक झाली आणि अनेकांचा मृत्यूदेखील झाला होता. त्यामुळे मोज्तबांची प्रतिमा ‘कठोर भूमिका घेणारा’ अशी तयार झाली. इराणमध्ये सर्वोच्च नेता सहसा मोठ्या धार्मिक विद्वानांमधून निवडला जातो. पण, मोज्तबा हे प्रामुख्याने सुरक्षा आणि राजकीय नेटवर्कमुळे प्रभावशाली असल्याचे मानले जाते. त्यामुळे धार्मिक संतुलनापेक्षा सुरक्षा आधारित शासन अधिक कडक होईल, अशी चर्चा होतेय.
 
एकूणच पाहता, मोज्तबा खामेनी यांच्या नियुक्तीने इराणमधील सत्तेचा वारसा जणू एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे गेला आहे. समर्थकांच्या मते, ही इस्लामिक क्रांतीच्या सातत्याची हमी आहे; तर विरोधकांना यात वाढत्या दडपशाहीचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे इराण पुढील काळात अधिक कठोर आणि सुरक्षाआधारित शासनाकडे झुकते का, की अंतर्गत असंतोषामुळे नव्या राजकीय समीकरणांची निर्मिती होते, हेच या निर्णयाचे खरे परिणाम ठरवणार आहेत. मोज्तबा खामेनी यांच्या नेतृत्वामुळे इराणमध्ये सत्तेचे सातत्य राहील की बदलाची नवी लाट निर्माण होईल, याबाबत अनिश्चितता आहे. आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि वाढता सामाजिक असंतोष या पार्श्वभूमीवर इराण एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. त्यामुळे हा नेतृत्वबदल केवळ राजकीय घटना नसून, देशाच्या भविष्यातील दिशा ठरवणारा क्षण आहे.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक