ममतांचा ‘एम’ बॉम्ब!

    11-Mar-2026
Total Views |
Mamata Banerjee
 
राज्यातील हिंदू मतदार आपल्या सरकारवर नाराज असल्याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झाली असावी. दुसरीकडे ‘एसआयआर’मुळे त्यांच्या हक्काचा बोगस मुस्लीम मतदार निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकला गेला आहे. परिणामी, पुन्हा सत्तेवर येण्यासाठी केवळ मुस्लीम मतांवर अवलंबून राहता येणार नाही, हे लक्षात आल्याने हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून आपणच त्यांचे त्राते आहोत, असे त्यांना भासविण्यासाठी ममतांनी मुस्लिमांच्या आक्रमकतेचा मुद्दा दीदींनी उपस्थित केला आहे. पण, हे करताना आपण मुस्लिमांच्या जातीयतेला खतपाणी घालीत आहोत, हेही त्यांना पक्के ठावूक आहे.
 
बुडत्याचा पाय खोलात’ असे म्हणतात. म्हणजे एखादी व्यक्ती बुडायचीच असेल, तर तिला कसलाच आधार मिळत नाही आणि अखेरीस ती पूर्ण बुडून जाते, असा या उक्तीचा अर्थ. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अवस्था आता अशीच झाली आहे. मतांसाठी मुस्लीम तुष्टीकरणाचे जे राजकारण त्यांनी सुरू केले होते, त्यात त्यांचा पाय अधिकाधिक खोलात जात चालला आहे. सत्तेच्या लालसेपोटी आता त्यांनी थेट हिंदू समाजालाच धमकाविण्यास प्रारंभ केल्याचे दिसते. एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "आम्ही (म्हणजे तृणमूल काँग्रेस पार्टी) सत्तेवर आहोत, म्हणूनच तुम्ही (हिंदू समाज) वाचला आहात. आम्हाला सत्तेवरून दूर केलेत, तर एक विशिष्ट समाज तुम्हाला घेरून संपवून टाकेल आणि त्याला एक सेकंदही लागणार नाही.” अशाच तर्‍हेचे वक्तव्य यापूर्वी हैदराबादच्या ‘एमआयएम’ पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले होते.
 
"पोलिसांना केवळ १५ मिनिटे दूर करा आणि मग बघा, आम्ही (मुस्लीम) काय करतो ते,” या त्यांच्या वक्तव्याने तेव्हाही खळबळ माजविली होती. पोलीस संरक्षण नसेल, तर हिंदूंची कत्तल करण्यास मुस्लिमांना फारसा वेळ लागणार नाही, हेच त्यांना सूचित करायचे होते. अर्थात, त्यांच्या पक्षाचा उद्देशच मुस्लिमांची एकजूट आणि सत्ताप्राप्ती करणे, हा आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य त्यांच्या विचारसरणीला अनुसरूनच आहे. या पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही नुकतेच म्हटले होते की, १९४७ पर्यंत भारताच्या पंतप्रधानपदी एखादी बुरखा घातलेली महिला बसलेली पाहणे, हे माझे स्वप्न आहे. एकंदरीतच स्वत:ला राज्यघटनेचे रक्षक आणि सेक्युलॅरिझमचे प्रवक्ते मानणार्‍या नेत्यांना आता आपल्या विरोधातील मतदारांना संपविण्याची घाई झालेली आहे, असे दिसते.
 
अशीच घाई आता ममता बॅनर्जींना झाली असावी. कारण "हिंदूंना संपविण्यास या विशिष्ट समुदायाला एक सेकंदही लागणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी मुर्शिदाबाद येथे झालेल्या दंगलीत आणि बंगालमधील कोणत्याही निवडणुकांदरम्यान त्याचा अनुभव राज्यातील हिंदू समाजाला आलेला आहे. भारतातून हिंदूंना संपविण्याचे स्वप्न अनेक पाकिस्तानी दहशतवादी संघटना पाहात आहेत. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या दहशतवादी गुप्तचर संस्थेने तर ‘गझवा-ए-हिंद’ नावाचा कटच आखला आहे. त्यानुसार भारतात मुस्लिमांची संख्या वाढवून बहुसंख्याकांइतकी करायची आणि भारतावर इस्लामी धर्मसत्ता स्थापन करायची, हा या त्यांच्या कटाचा उद्देश आहे. ममता बॅनर्जी यांचा त्या कटाला पाठिंबा आहे की काय, अशी शंका त्यांच्या या वक्तव्यावरून येते. ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांची मते आणि आपल्या पक्षाच्या गुंडांकडून सर्रास मतदानात गडबड करूनच आपली सत्ता राखली आहे.
 
त्यासाठी त्यांनी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या मुसलमान यांना राज्यात उदार आश्रय दिला आहे. त्यांना सर्व सरकारी ओळखपत्रे बनवून दिली आणि मतदारयाद्यांमध्येही नावे घुसविली. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाच्या (एसआयआर) मोहिमेला ममतांकडून कडाडून विरोध होत आहे, तो यासाठीच! या मोहिमेमुळे राज्यातील मृत मतदारांची नावे या मतदारयाद्यांमधून काढून टाकली जात आहेत आणि बोगस मतदारही आढळून येत आहेत. परिणामी, ममतांचा मतांचा हक्काचा आधारच नाहीसा होत आहे. यामुळे मुस्लीमही नाराज होत असल्याचे पाहून, मुस्लिमांना चुचकारण्यासाठी त्यांनी या समाजाच्या आक्रमक वृत्तीचे अप्रत्यक्ष कौतुक केले आहे. यातून आपण त्यांच्या धर्मांध प्रवृत्तीला खतपाणी घालत आहोत, हे ममतांना समजत नसेल, असे नाही.
 
हिंदूंमध्ये आपल्या पक्षाबद्दल नाराजी वाढत चालल्याचे त्यांना जाणवले असून यावेळी फक्त मुस्लीम मतदारांवर अवलंबून राहून चालणार नाही, हेही त्यांनी ओळखले आहे. पण, हिंदू मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी त्यांनी त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे धोरण अवलंबिले आहे. एकीकडे मुस्लिमांची वाढती लोकसंख्या मतपेढी म्हणून वापरायची आणि त्याच लोकसंख्येची भीती घालून हिंदूंकडेही मते मागायची, असे त्यांचे दुटप्पी धोरण. पण, राज्यात झालेल्या हिंसाचारात आजवर फक्त हिंदूंचीच हत्या झाली असून, तेव्हा ममता बॅनर्जी कधीही हिंदूंच्या बाजूने उभ्या राहिल्या नव्हत्या, हेही हिंदू समाज जाणतो. तसेच राज्यातील इमामांना सरकारी तिजोरीतून मासिक वेतन देणे, ईदसाठी दुर्गापूजेवर निर्बंध आणणे, ‘जय श्रीराम’ घोषणेवर खटले दाखल करणे, संदेशखाली येथे हिंदू महिलांवर अत्याचार करणार्‍या आपल्या पक्षाच्या मुस्लीम नेत्यावर कारवाई न करणे, धर्मांध मुस्लीम नेत्यांना चुचकारणे यांसारख्या त्यांच्या कृतीही हिंदू समाजाच्या मनात ताज्या आहेत. हुमायून कबीर या तृणमूलमधून तोंडदेखले निलंबन केलेल्या आमदाराने राज्यात बाबरी मशीद उभारण्यास प्रारंभ केला असून, त्यापासून त्याला रोखण्यासाठी ममतांनी काहीही केलेले नाही, ही घटना तर ताजीच आहे. त्यामुळे ममतांचे हे ढोंग हिंदूंना फसवू शकणार नाही, असे भाजपने म्हटले आहे.
 
राज्यातील हिंदूंची मते मिळविण्यासाठी या पक्षाने एकीकडे हिंदूंना धमकाविताना दुसरीकडे बंगाली अस्मितेचा मुद्दा बाहेर काढला आहे. या पक्षाच्या एक वादग्रस्त नेत्या महुआ मोईत्रा यांनीही नुकतेच असे वक्तव्य केले की, "तुम्ही तृणमूल काँग्रेसला मत दिले नाही, तर तुम्ही बंगालीच नाही.” आपला पक्ष म्हणजेच बंगाल, अशी सांगड घालण्याचा त्यांचा हा प्रयत्न. आपला पक्ष म्हणजेच आपल्या राज्याची अस्मिता, असा समज काही प्रादेशिक नेत्यांना होत असतो. यापूर्वी महाराष्ट्रातही काहीजणांना असेच वाटत होते. पण, ‘मराठी अस्मिता’ ही कोणत्याही एका पक्षाची मिरास नाही, हे गेल्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत मराठी जनतेने दाखवून दिले. तृणमूलच्या नेत्यांच्या भ्रमाचा भोपळाही असाच येत्या विधानसभा निवडणुकीत फुटणार आहे आणि बंगालमधील हिंदू ममतांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित!