मुंबई : (Maharashtra State Power Generation Company Limited) राज्याच्या वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महानिर्मिती)ने ११,४५२ मेगावॅट इतकी सर्वोच्च वीज निर्मिती करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याच दिवशी राज्याची एकूण वीज मागणी ३०,४०० मेगावॅटपेक्षा अधिक नोंदवली गेली.
राज्याच्या वाढत्या विजेच्या मागणीची पूर्तता करताना महानिर्मितीचे सर्वच्या सर्व २८ औष्णिक वीज निर्मिती संच कार्यान्वित करून त्यातून वीज निर्मिती साध्य करण्यात यश मिळवले आहे. महानिर्मितीने मागील काही काळामध्ये सातत्याने वीज निर्मितीमध्ये नवनवीन विक्रम स्थापित केले असून याच कालावधीत महानिर्मितीच्या कोयना जल विद्युत प्रकल्प तसेच अन्य लघु जलविद्युत प्रकल्पामधील वीज निर्मिती संच आणि उरण वायु वीज निर्मिती केंद्र याद्वारे गरजेनुसार वीज निर्मिती साध्य करण्यात आली आहे.
औष्णिक प्रकल्पांबरोबरच कोयना हैड्रोइलेकट्रीक प्रोजेक्ट तसेच इतर लघु जलविद्युत प्रकल्पांमधूनही गरजेनुसार वीज निर्मिती करण्यात आली. याशिवाय उरण येथील वायू वीज निर्मिती केंद्राचा देखील पूरक वापर करून राज्याच्या वीज व्यवस्थेला स्थैर्य देण्यात आले. विविध स्रोतांचा संतुलित वापर करत मागणी-पुरवठा समतोल राखण्यात महानिर्मितीला यश आले आहे.
या विक्रमी कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., संचालक (संचलन) अभय हरणे तसेच वरिष्ठ व्यवस्थापन, अभियंते आणि तंत्रज्ञ यांचे अभिनंदन केले आहे. राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महानिर्मितीची ही कामगिरी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“राज्यातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करताना महानिर्मितीने ११,४५२ मेगावॅट इतकी विक्रमी वीज निर्मिती साध्य केली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. महानिर्मितीच्या सर्व अधिकारी-कर्मचारी, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या समर्पित व अथक प्रयत्नांमुळेच स्थापित क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून राज्यातील जनतेला दिलासा देणे शक्य झाले आहे. पुढील काळातही कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महानिर्मिती आपले योगदान अधिक दृढपणे देत राहील.”
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.