कर्णबधिरतेवर मात करताना....

    11-Mar-2026
Total Views |
Deaf Students
 
कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणातून सर्वांगीण विकास व पुनर्वसन हे उद्दिष्ट साध्य करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘विजय शिक्षण संस्था’ ही संस्था १९६० पासून सदोदित कार्यरत आहे. आधुनिक पद्धतीचा उपयोग करत विद्यार्थ्यांना सक्षम बनणार्‍या या संस्थेचा मागोवा घेणारा हा लेख...
 
‘विजय शिक्षण संस्थे’ची स्थापना विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दि. २ ऑक्टोबर १९६० रोजी मैना गोखले यांनी केली. मैना यांनी त्यांच्या राहत्या घरी दोन कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. नंतर थोड्याच दिवसांत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी तेथे कर्णबधिर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. १९६४ साली या शाळेस शासनमान्यता मिळाली. ही शाळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारत, दुसरा मजला, दादर अग्निशमन दलाच्या मागे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, दादर (पूर्व), मुंबई येथे कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचा भाषा विकास करणे, त्यांना ऐकण्यास व बोलण्यास शिकवणे, तसेच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे शिक्षण व पुनर्वसन करून त्यांना देशाचा जबाबदार नागरिक बनविणे ही शाळेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यानुसार संस्थेच्या शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात.
 
सर्वसामान्य मूल ऐकून व आजूबाजूच्या वातावरणातील घटनांचे संदर्भ जोडून भाषा सहज आत्मसात करते. मात्र, कर्णबधिर मुलांसाठी विविध उपाय व प्रात्यक्षिकांची योजना करावी लागते. प्रत्येक मुलाला त्याच्या उर्वरित श्रवणशक्तीचा वापर करण्यासाठी योग्य श्रवणयंत्र किंवा ’कॉक्लिअर इम्प्लांट’ देऊन शिकवले जाते. वाचा-श्रवण प्रशिक्षण, संभाषण यांना प्रोत्साहन देऊन, गोष्ट सांगून, मार्गदर्शित व्यवसाय, प्रत्यक्ष कृतीद्वारे व स्थळांना भेटी देऊन भाषेची ओळख करून दिली जाते. तसेच इतर आकर्षक व व्यवसायांची जोड भाषावाढीसाठी दिली जाते. या सर्वांचा मुख्य उद्देश असा की कर्णबधिर मुलांनी उत्स्फूर्तपणे बोलावे व इतरांशी संवाद साधावा. अशा रितीने शाळेत पायाभूत शिक्षण देऊन कर्णबधिर विद्यार्थ्यास प्राथमिक शिक्षणासाठी सक्षम बनवले जाते.
शाळेमध्ये या विद्यार्थ्यांचे श्रवणालेख काढण्यासाठी व त्यांना वैयक्तिक भाषा व वाचा प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक उपकरणांनी सुसज्जित अशी साऊंड ट्रीटेड रूम उपलब्ध आहे.
 
तसेच शाळेमध्ये पूर्णवेळ वाचातज्ज्ञ उपलब्ध आहेत. ’ऑडिटरी व्हर्बल थेरपी’द्वारे कर्णबधिर विद्यार्थ्यास त्याच्याकडील श्रवणयंत्र व कॉक्लिअर इम्प्लांटचा उपयोग करून त्याला वाचा व भाषेचे अधिक प्रभावीरित्या शिक्षण दिले जाते. याद्वारे विद्यार्थ्याचे श्रवणकौशल्य वाढविण्यास मदत होते. शिक्षणप्रक्रियेत सतत होणारे बदल जाणून घेण्यासाठी शिक्षक, समाजसेविका, वाचातज्ज्ञ विविध सेमिनार, रिफ्रेशर कोर्स, सीआरई इ. मार्गांचा अवलंब करून मुलांची प्रगती साधतात. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी शिक्षक व वाचातज्ज्ञ विशेष प्रयत्नशील असतात. शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच क्रियाशील असतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असणार्‍या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कला व क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मुलांची तयारी करून घेतली जाते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, विद्यार्थी या स्पर्धांमध्ये निर्भीडपणे भाग घेऊन पारितोषिक मिळवतात.
 
दि. ३ मार्च हा ’जागतिक श्रवण दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि. ३ मार्च ते दि. ९ मार्च हा ‘जागतिक श्रवण दिन सप्ताह’ म्हणून शाळेत साजरा केला जातो. या दिनाची यावर्षीची संकल्पना आहे, ‘समुदायापासून वर्गापर्यंत सर्व मुलांसाठी श्रवण काळजी.’ कानांच्या किंवा श्रवणविषयक समस्यांमुळे कोणतेही मूल मागे राहणार नाही, यासाठी ‘आताच कृती करा,’ ही मध्यवर्ती कल्पना असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेद्वारे जाहीर करण्यात आले. यानुसार शाळेत सर्वसमावेशित शाळा-महाविद्यालयाच्या वर्गात श्रवणदोष असलेल्या मुलांना-मित्राला आधार देण्याचे मार्ग या विषयाला अनुसरून व्हिडिओ तयार करून फेसबुकवर पोस्ट करणे, कर्णबधिरत्वाचे त्वरित निदान व उपचार करण्यासाठी लागणार्‍या उपाययोजना, कर्णबधिर मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न याबाबतची जनजागृती, सर्वसमावेशित शाळा-महाविद्यालयामध्ये प्रवेश दिल्यानंतर तेथील शिक्षक, विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्र, जनजागृती रॅली आणि स्टॉल इ. उपक्रम राबविण्यात आले.
 
साधना विद्यालयात मराठी व हिंदी या दोन्ही माध्यमांतून इ. सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. काळाची गरज पाहता, इ. दहावीची तयारी करून घेतली जाते आणि १७ नंबरचा फॉर्म भरून विद्यार्थ्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून घेतले जाते. आतापर्यंत शाळेचा इ. दहावीचा १०० टक्के निकाल लागलेला आहे. शाळेकडून मोफत गणवेश व शालोपयोगी वस्तूंचे वाटप, श्रवणयंत्रासाठी लागणारी आर्थिक मदत, श्रवणयंत्र बॅटरी बॅन्क, मोफत वैद्यकीय तपासणी, सकस आहार योजना व दत्तक पालक योजना इ. मोफत सुविधा या संस्थेमार्फत पुरविल्या जातात. दिव्यांगांच्या विकासाकरिता राबविण्यात येणार्‍या शासनाच्या विविध योजना, उदार लोकाश्रय व हितचिंतकांच्या सदिच्छा लाभल्याने संस्थेची अनेक अडचणींवर मात करून यशस्वी वाटचाल सुरू आहे.
 
शाळेशी संपर्क साधण्यासाठी
 
शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुलाच्या वयाची किमान मर्यादा अडीच ते तीन वर्षे आणि कमाल मर्यादा सात ते आठ वर्षे असणे जरुरीचे आहे. प्रवेशअर्जासोबत शासकीय रुग्णालयाचा श्रवणलेख व कर्णबधिरत्वाचे प्रमाणपत्र (अलि यावर जंग/सर जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल/कूपर हॉस्पिटल/सिव्हिल हॉस्पिटल), युडीआयडी कार्ड, आधारकार्ड, जन्मप्रमाणपत्र/पूर्वीची शाळा सोडल्याचा दाखला, जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. शाळेच्या प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी ९३२६४७६७१० या नंबरवर संपर्क करू शकता.
 
 
- स्वाती जिरांगे