'तरुण' हत्याकांड प्रकरणी अभाविप आक्रमक; जेएनयूमध्ये पुतळा जाळून निषेध!

11 Mar 2026 16:04:24

Tarun Khatik Murder
 
मुंबई : (Tarun Khatik Murder) होळीच्या दिवशी नवी दिल्लीतील उत्तम नगर येथे तरुण खटीक यांची धर्मांध मुस्लिमांकडून झालेल्या निर्घृण हत्येमुळे समाजात तीव्र संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अमानुष घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जेएनयू युनिटने तीव्र निषेध करत दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय. या घटनेच्या निषेधार्थ अभाविपच्या जेएनयू कार्यकर्त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसरातील साबरमती ढाब्याजवळ निषेध प्रदर्शन करत पुतळा जाळला. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष आणि जलद चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
 
अभाविपने म्हटले, की, एका निष्पाप व्यक्तीवर झालेली अशी क्रूर हिंसा ही केवळ एका व्यक्तीविरुद्धचा गुन्हा नसून ती सामाजिक सलोखा, कायदा-सुव्यवस्था आणि मानवी मूल्यांवरही गंभीर आघात आहे. या घटनेत धार्मिक तणाव आणि सामाजिक वैमनस्याचे काही पैलू समोर येत असल्याच्या बातम्या समाजासाठी चिंताजनक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 
हेही वाचा : १०.६० लाख सदस्यांसह विद्या भारती माजी विद्यार्थी परिषद जगात अव्वल!
 
अभाविप जेएनयूचे अध्यक्ष मयंक पंचाल यांनी सांगितले की अशा भयानक घटनांबाबत समाजातील सर्व घटकांनी संवेदनशीलतेने प्रतिक्रिया द्यायला हवी. मात्र या गंभीर प्रकरणावर डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका निष्पाप व्यक्तीच्या हत्येबाबत मौन बाळगणे अत्यंत दुर्दैवी असून ते असंवेदनशीलतेचे लक्षण असल्याचे ते म्हणाले.
 
अभाविप जेएनयूचे सचिव प्रवीण पियूष यांनी तरुण कुमार यांच्या हत्येला अत्यंत निषेधार्ह कृत्य असल्याचे सांगत आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. समाजात शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अशा गुन्ह्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायाची मागणी ही कोणत्याही विचारसरणी किंवा राजकीय सोयीवर अवलंबून नसावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
Powered By Sangraha 9.0