मुंबई : (Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या राजकारणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा समुदायाधारित राजकारणावर चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी एका सभेत बोलताना, “मी मुख्यमंत्री आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. जर तुम्ही मला हटवून भाजपला मतदान केले तर एक समुदाय आहे जो तुम्हाला एका सेकंदात संपवेल,” असे म्हणत असल्याचे ऐकू येत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.
दरम्यान, अनेकांनी या वक्तव्याची तुलना खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या '१५ मिनिटं'च्या वादग्रस्त वक्तव्याशी केली आहे. त्या वक्तव्यामुळे त्यावेळी देशभरात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता आणि समुदायांमधील तणावावरही चर्चा झाली होती. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान याविषयी भाष्य केलंय.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांत विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत आणि विशेषतः हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळात येणारी भडक किंवा समुदायाधारित वक्तव्ये अधिक संवेदनशील ठरतात. त्यामुळे राजकीय नेतृत्वाकडून समाजात भीती किंवा अविश्वास निर्माण होणार नाही, अशी जबाबदार भाषा अपेक्षित असल्याचे मत अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसतेय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याचा राजकीय वातावरणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ममता बॅनर्जी यांनी अखेर न बोललेले बोलून दाखवलेच; अल्पसंख्याकांच्या संरक्षणाच्या नावाखाली चालवलेले त्यांचे तुष्टीकरणाचे राजकारण प्रत्यक्षात अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी नव्हते; तर असुरक्षिततेची भावना राजकीय हत्यार म्हणून वापरणे, राष्ट्रीय एकात्मतेत विघ्न आणणे आणि अखेरीस पश्चिम बंगालमधील शांतताप्रिय हिंदूंच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणे ही त्यामागील एक नियोजित रणनीती होती.
- अमित मालवीय, राष्ट्रीय प्रभारी, माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, भाजप
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक