धारणीय वेग निर्लज्जता ... (भाग ११)

10 Mar 2026 13:30:11

लहानपणापासून अनेकदा प्रत्येकाने ‘निर्लज्ज’ हा शब्द ऐकलेला असतोच. मात्र, त्याचा वापर इतका होतो, की ही निर्लज्जता म्हणजे काय, त्याचे गांभीर्यही कळेनासे होते. त्यामुळे ज्याला ‘निर्लज्ज वर्तन’ म्हणावे, असे वर्तन समाजामध्ये सर्रास होताना दिसते. त्यामुळे ही निर्लज्जतेची भावना म्हणजे नेमके काय, त्याचे परिणाम, त्याची उदाहरणे यांचा घेतलेला आढावा...

धारणीय वेगांचा परिणाम हा मनुष्याच्या केवळ मनावरच होत नाही, तर शारीरिक स्वास्थ्य आणि आरोग्यावरही त्याचा ’इम्पॅक्ट’ होतो. धारणीय वेग म्हणजेच, ‘मेन्टल इमोशनल अर्जेस’. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत मनामध्ये विविध भावनांचे तरंग निर्माण होणे, हे खूप स्वाभाविक असेच. संथ पाण्यात छोटासा खडा टाकला की जसे तरंग उत्पन्न होतात; तसेच मनुष्याच्या जीवनातही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अवतीभोवती घडणार्‍या घडामोडींबाबत मनात प्रतिक्रिया उत्पन्न होतात. होणार्‍या या प्रतिक्रिया, हे तरंग म्हणजेच ‘भावना’ होय. भावना कधी उत्कट असतात, तर कधी सौम्य. तसेच, एकाच परिस्थितीमध्ये, प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया ही भिन्न-भिन्न असू शकते. जरी एकच प्रतिक्रिया असली, तरी त्या प्रतिक्रियेची, तरंगाची तीव्रता ही कमी-अधिक असते. वारंवार एकच गोष्ट मनावर जर बिंबवत गेलो, तर त्या गोष्टीबद्दलची आत्मीयता किंवा घृणा इत्यादीदेखील बोथट होत जाते.
शोक, भय, क्रोध, लोभ, मान, निर्लज्जता, ईर्ष्या या भावनांचे प्रत्येक मनात कधी ना कधी, स्वल्प किंवा प्रभूत मात्रेत प्रकटीकरण होतेच. हे वेग/आवेग/अपरिहार्य वेग आहेत. पण या आवेगांच्या आहारी न जाणे, अधीन न होणे हे गरजेचे आहे. मानसिक आवेगांना रोखणे, त्यांचे स्वल्प मात्रेत असतानाच रोखणे, धारण करणे हेच अपेक्षित आहे.

आजचा मानसिक धारणीय वेग ज्याबद्दल थोडे सविस्तर मांडणार आहे, तो म्हणजे निर्लज्जता होय. वयात येताना प्रत्येक युवक-युवतीला आपल्या बाह्य रूपाची जाणीव होऊ लागते. मी कशी दिसते/कसा दिसतो, याबद्दल संवेदना/साक्षात्कार/आत्मबोध होऊ लागतो. त्याचबरोबर थोडे आकर्षण, थोडी लज्जाही निर्माण होते. हे स्वाभाविक असेच आहे. ‘सेल्फ-अवेरनेस’मधूनच हे उत्पन्न होते. पण, काही वेळेस कशाचीही पर्वा न करता, लाज न बाळगता वागले जाते, आचरण केले जाते. या निर्लज्जतेलाच बेशरमी, लज्जाहीनता असेही म्हणतात. आपल्या अवतीभोवती निर्लज्जतेची बरीच उदाहरणे आपण रोज बघत असतो. रोजच्या वागणुकीतून, वर्तनातून, विविध क्रियांमधून ते प्रत्ययास येते. काही ठळक उदा.- उघड्यावर, नजरेस पडेल अशा ठिकाणी लघुशंका करणे (रस्त्याचा वापर, पदपथाचा वापर टॉयलेट म्हणून करणे) प्रवासात जातेवेळी सेवन केलेल्या विविध पेयांचे, खाद्यपदार्थांचे आवरण रस्त्यात, रेल्वरुळांवर टाकून देणे, कुठेही थुंकणे, नाक शिंकरणे इ. तसेच, अभद्र बोलणे, शिवीगाळ करणे, बोलण्या-वागण्यात अश्लीलता, तोकडे कपडे, वयानुसार (वयाला साजेसे) कपडे न घालणे, अति तंग इन-अप्रोप्रिएट वेशभूषा असणे इ. त्याचबरोबर सभ्यतेला, शालीनतेला साजेसे न वागणे, बोलणे, राहणे, वर्तन करणे हे सर्व निर्लज्जतेमध्येच मोडते ‘अ‍ॅक्टिंग विदाऊट जिल्ट’, ‘मोडेस्टी ऑर डीसेन्सी इज शेमलेसनेस’.
निर्लज्जता ही काही वेळेस काहीतरी मिळविण्यासाठी, वाम मार्गावर जाऊन (इन्स्टन्ट नेम, फेम इ.) मिळविण्याच्या प्रगल्भ इच्छेतून प्रकट होणारी भावना आहे.

येन केन प्रकारेण किंवा ‘बाय हूक ऑर क्रूक’ इ. म्हणींनी हे सांगता येते. निर्लज्जता काही वेळेस सामूहिक वर्तनातून अधिक उफाळून येते. एका व्यक्तीचे वर्तन, वागणूक, राहणीमान बघून आपणही तसे केल्यास लोकप्रियता मिळेल, अशा गैरसमजुतीमुळे बर्‍याच शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चुकीचे ट्रेंड सुरू होतात. काही सवयी लागतात, व्यसनाधीनता येते. ‘स्मॉल टर्म अप्रिसिएशन/फन/डेअर’ इत्यादींमुळे सुरू झालेली गोष्ट नंतर जीवघेणीदेखील ठरू शकते. काही वेळेस ‘पिअर प्रेशर’ला बळी पडूनदेखील निर्लज्जतेच्या परिसीमा ओलांडल्या जातात. फ्रेंड्स विथ बेनिफिटस, ‘पार्टनर स्वॅपिंग’, ‘ऑबसेन’, ‘व्हल्गर बिहेविअर’ इ. समाजमान्य सभ्य वर्तनाला काट मारून, बेलगाम, बेशिस्त वागणे, बोलणे, वर्तन असणे म्हणजेच निर्लज्जता होय. चोरी, लाचखोरी, दादागिरी-भाईगिरी इ. देखील समाज मान्य वर्तन नव्हे.

निर्लज्जता ही भावना जेव्हा सुरू होते, तेव्हा स्वतःलाच स्वतःची लाज, तिरस्कार, घृणा, राग, भीती इ. वाटू लागते. तेव्हाच त्यावर आवर घालणे गरजेचे आहे. वारंवार या गोष्टी करत गेलात, तर मनदेखील बोथट होते. त्यावर परिणाम होणे देखील हळूहळू कमी होऊ लागते. निर्लज्जता आटोक्यात जेवढ्या लवकर आणता येईल, तेवढे चांगले. जर असे केले नाही, तर स्वतःच्या नजरेतून स्वतः उतरून जातो. स्वतःबद्दल लाज वाटू लागते, तोंड दाखविण्याच्या लायकीचे आपण नाही, ही भावना मनात घर करू लागते. स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ लागतो. अशा नकारात्मक भावनांमुळेच त्या शरमेतून बाहेर येणे, त्या व्यक्तीला खूप कठीण जाते. कुठल्याही नकारात्मक उत्कट भावनांना आवर घालणे कठीण असते. म्हणूनच मानसिक आवेगांना उत्पन्न होताक्षणीच आवरणे गरजेचे आहे. छोटेसे रोप मुळासकट उपटून काढणे जितके सोपे आहे, तेवढेच मोठे वृक्ष काढणेही कठीणच. मनात नकारात्मक भाव उत्पन्न झाला की त्याला तिथेच थांबविणे गरजेचे आहे. ‘उस में या’, ‘चलता है’, ‘जरा करून बघू’ असं म्हणता म्हणता, त्या व्यसनांच्या आहारी कधी जाऊ, हे त्या व्यक्तीलाच कळत नाही.

समाजात राहताना, वावरताना प्रत्येक व्यक्तीचा एक ‘इनर सर्कल’ आणि एक ‘आऊटर सर्कल’ असतोच. अगदी जवळची मित्रमंडळी, परिवारातील सदस्य यांचा ‘इनर सर्कल’ व अन्य नातेवाईक, ओळखी-पाळखी यांचा ‘आऊटर सर्कल’. या दोन्ही सर्कल्समध्ये वावरतानाही प्रत्येकाची वागणूक वेगळी असते. बोलण्याचे विषय, सांगायच्या गोष्टी, संकटांबद्दल चर्चा, आर्थिक-शारीरिक समस्यांबद्दल बोलणे इत्यादीदेखील भिन्न भिन्न असते. तसेच घरातील वर्तन, आपल्या इनर सर्कलमध्ये असलेले वर्तन आणि समाजात बाह्य जगात वावरतानाचे वर्तन हे भिन्न भिन्न असते. सगळ्याच गोष्टी जगजाहीर आणि समाजमाध्यमांवर सांगणे, करणे, दाखविणेही चुकीचे आहे. चुकीचे वर्तन कोण बघतंय, कोणापर्यंत पोहोचतंय आणि बालमनांवर त्याचा किती चुकीचा परिणाम होतोय आणि या सगळ्याला जबाबदार कोण, याचा विचार प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने करावा. स्वतः घडावे व इतरांनाही घडवावे.
मानसिक आवेग विशिष्ट मर्यादेपर्यंत जर असतील, तर त्याचा स्वतः त्या व्यक्तीला आणि त्याच्या परिसरातील व्यक्तींना खूप त्रास होत नाही. तसेच त्याला त्या अवस्थेत नियंत्रित ठेवणेही शक्य आहे. संथ पाण्यात/चिखलात मोठा दगड टाकला, तर चिखल आपल्याच अंगावर उडेल. तेव्हा ’थिंक बिफोर यू अ‍ॅट’ हेच मनी धरणे खूप महत्त्वाचे आहे. आदरणीय व्यक्तींचे बोल नेहमी ऐकावे आणि यम-नियमांचे पालन दैनंदिन जीवनात प्रत्येकाने करावे.


- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)



Powered By Sangraha 9.0