मुंबई : (Adv. Rahul Narvekar) विधानसभा सभागृहात महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरु असताना वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आ. दिलीप-वळसे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “सभागृहाच्या नियमानुसार, अर्थसंकल्पावरील चर्चा कमीत कमी चार दिवस झाली पाहीजे. आता त्याला कात्री लावून ती दोन दिवसांवर आणली आहे. दिवसाचे कामकाज घेताना या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. अर्थसंकल्प हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. इतर विषयांवर सभागृहातील अन्य मंत्री ऐकतील, नोंदी घेतील आणि पाठवतील. पण राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा होत असताना वित्त मंत्री साभागृहात उपस्थित असावे, तसेच त्यांच्यासोबतच राज्याचे मुख्य सचिव, वित्त सचिव आणि नियोजन विभागाचे सचिव या सगळ्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सभागृहात उपस्थित असले पाहिजे. अर्थसंकल्पावरील चर्चा किंवा खातेवाढ चर्चेमध्ये संबंधित विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी लॉबीमध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले की, “जरी ही अदृष्य गॅलरी असली तरीही महत्वाच्या चर्चांवेळी संबंधित सगळे वरीष्ठ अधिकारी इथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. यापूर्वीही प्रशासनाला लेखी पत्र लिहून मी कळवले आहे.”
“राज्याच्या नोकरशाहीला मी ही शेवटची संधी देत असून यापुढे महत्वाच्या चर्चेदरम्यान, मुख्य सचिव स्तरावरील अधिकारी गॅलरीमध्ये उपस्थित नसतील तर त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी सभागृह सक्षम आहे,” असा इशाराही विधानसभा अध्यक्षांनी दिला.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....