PM Kisan 22nd Installment: शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; १३ मार्चला खात्यात जमा होणार २ हजार रुपये, ई-केवायसी पूर्ण आहे का तपासा

    10-Mar-2026   
Total Views |

 
मुंबई : (PM Kisan 22nd Installment) देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. होळीच्या सणापूर्वी हा निधी खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आता सरकारकडून याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
 
१३ मार्चला जमा होणार २२ वा हप्ता
केंद्र सरकारने PM-Kisan सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च २०२६ रोजी जारी होणार असल्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असताना रिमोट बटण दाबून देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपये वर्ग करणार आहेत. काही अहवालांनुसार गुवाहाटी किंवा कोकराझार येथून संध्याकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ही रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते. होळीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
 
पीएम-किसान योजना काय आहे?
केंद्र सरकारने २०१९ मध्ये लहान व सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी PM-Kisan सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे जमा केली जाते.
हप्ता उशिरा का आला?
PM-Kisan योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबर २०२५ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. साधारणपणे या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो, त्यामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये २२ व्या हप्त्याची अपेक्षा होती. मात्र यावेळी लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी, ई-केवायसी तपासणी आणि तांत्रिक पडताळणी प्रक्रियेमुळे हप्त्याच्या वितरणाला काहीसा विलंब झाला.

‘या’ कारणांमुळे तुमचे २ हजार रुपये अडकू शकतात
तारीख जाहीर झाली असली तरी काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. खालील कारणांमुळे हप्ता रोखला जाऊ शकतो.
  • ई-केवायसी (e-KYC) पूर्ण नसणे
  • फार्मर आयडी तयार नसणे
  • आधार कार्डाशी बँक खाते लिंक नसणे
  • खाते क्रमांक किंवा IFSC कोडमध्ये चूक असणे
  • जमिनीच्या नोंदींची पडताळणी अपूर्ण असणे
  • कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असणे
  • कुटुंबातील सदस्य आयकर भरत असणे
  • कुटुंबातील सदस्याला १०,००० रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळत असणे
लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे?
  • अधिकृत PM-Kisan वेबसाइटला भेट द्या. - https://pmkisan.gov.in/homenew.aspx
  • ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  • ‘Submit’ बटणावर क्लिक करून यादी तपासा.
जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असेल आणि सर्व पडताळणी पूर्ण झाली असेल, तर २२ व्या हप्त्याचे २,००० रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाइटवर आपली माहिती आणि स्टेटस तपासत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.