
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नाशिक शहराला नगरसेवकांच्या रूपाने लोकनियुक्त कारभारी मिळाले असून, त्यांच्यामार्फत नुकत्याच सादर करण्यात आलेल्या नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकाने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी सादर केलेल्या यंदाच्या अंदाजपत्रकात, कोणतीही करवाढ न करता, विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती महागाई, जीवनमानाचे खर्च आणि आर्थिक ताण या पार्श्वभूमीवर, नागरिकांना करांच्या स्वरूपात अतिरिक्त भार न टाकण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करतानाच, खर्चावर नियंत्रण ठेवण्यावरही भर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे करवाढ न करताही, विकास साधण्याचा हेतू यातून स्पष्टपणे दिसून येतो.
या अंदाजपत्रकात शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. रस्तेसुधारणा, पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणे, स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा उंचावणे आणि हरित उपक्रमांना चालना देणे यावर या अंदाजपत्रकात विशेष भर देण्यात आला आहे.
तसेच वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि सार्वजनिक सोयीसुविधा वाढवण्याचेही नियोजन, पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नाशिक हे वेगाने विकसित होणारे शहर असून, त्यामुळे या शहरातील पायाभूत सुविधांचा विस्तार करणे अत्यावश्यक आहे. महापालिकेच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकातून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देतानाच, नागरिकांवरील आर्थिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्नही पालिका प्रशासनाचा दिसून येतो. पालिका प्रशासनाच्या यानिर्णयामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे. एकूणच, करवाढ टाळत विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणारे यावर्षीचे अंदाजपत्रक, नाशिककरांसाठी सकारात्मक पाऊल मानले जात आहे. आता या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी झाली; तर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महापालिका निवडणुकीत, नाशिकला दत्तक घेण्याचा दिलेला शब्दही सत्यात येण्यास आणखी पाठबळ मिळेल.
सिंहस्थ तयारी वेगात
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात, नाशिकच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेषतः ‘रामकालपथ’ प्रकल्प आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तरतुदींमुळे, शहराच्या पायाभूत विकासाला नवी दिशा मिळणार आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या नाशिकसाठी, या घोषणा निश्चितच लाभदायक ठरणार आहेत. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक शहर, देशभरातील भाविकांसाठीचे श्रद्धास्थान आहे. जगभरातून कोट्यवधी भाविक सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सिंहस्थासाठी नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकासकामे होणे अत्यावश्यक ठरणार आहेत.
त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘रामकालपथ’ हा नाशिकच्या विकासातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प! याअंतर्गत गोदावरी नदीच्या दोन्ही काठांचे सुशोभीकरण, घाटांचे संवर्धन, पादचारी मार्ग, सांस्कृतिक केंद्रे, पर्यटन सुविधा आणि पर्यावरणपूरक विकास यांचा संगम साधण्यात आला असून, त्याचे संपूर्ण चित्र हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर दिसणार आहे. या प्रकल्पामुळे गोदावरी नदीचा परिसर अधिक आकर्षक आणि सुशोभित होणार आहे. यामुळे केवळ धार्मिक पर्यटनच नव्हे, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनालाही चालना मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच सिंहस्थाच्या तयारीच्या दृष्टीने रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसुविधा आणि सुरक्षाव्यवस्थेत
सुधारणा करण्यासाठी, अर्थसंकल्पात विविध घोषणाही करण्यात आल्या आहेत. सिंहस्थ काळात लाखो भाविकांच्या व्यवस्थापनाचे आतापासूनच नियोजन करून, कामांना गती दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांमुळे नाशिकच्या विकासाला केवळ धार्मिकच नव्हे, तर आर्थिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. ‘रामकालपथ’ प्रकल्प आणि सिंहस्थाच्या तयारीमुळे, शहराचा चेहरामोहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे. सुरू असलेली ही कामे पूर्णत्वास आल्यानंतर नाशिकचा चेहरामोहरा बदलला जाईल, यात काही शंका घेण्याचे कारण नाही.