मुंबई : (LPG Cylinder Booking) घरगुती गॅस वापरणा-या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्वाची सूचना जारी केली असून गॅस जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, आता दोन सिलेंडर बुक करण्यामध्ये किमान २५ दिवसांचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गॅसचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे.(LPG Cylinder Booking)
मध्य पूर्वेतील युद्धामुळे उद्भवलेल्या इंधन संकटानंतर एलपीजी गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत. सरकारने हॉटेल, कंपन्यांसाठीच्या गॅसवर बंदी आणण्यात आली आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती देखील ६० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांकडून साठा करण्याची किंवा हे सिलेंडर हॉटेल व्यावसायिकांना दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यामुळे अचानक कंपन्यांनी आधीचा १५ दिवसांचा वेटिंग पिरिएड आता थेट २५ दिवसांवर नेऊन ठेवला आहे.(LPG Cylinder Booking)
७ मार्चपासून हे नवीन नियम लागू झाले आहेत. दोन सिलेंडर असलेल्या ग्राहकांकडे एक सिलेंडर रिकामा असतो. त्या ग्राहकांनी दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तेव्हा १५ दिवसांचा मेसेज दाखविण्यात येत होता. परंतु, १६-१७ दिवस होऊनही सिलेंडर बुक होत नव्हता. अखेर ९ मार्चला कंपन्यांनी सिलेंडर डिलिव्हरीपासून २५ दिवसांचा गॅप असल्याचा संदेश दाखवण्यास सुरुवात केली. यामुळे एखादा ग्राहक २५ दिवसांच्या आत बुकिंग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याचे बुकिंग सिस्टिम स्वीकारणार नाही. गॅस सिलेंडर मागणीमुळे वाढलेला दबाव कमी करण्यासाठी कंपन्यांनी ही नीती वापरली आहे.(LPG Cylinder Booking)
१) २५ दिवसांचे अंतर : एका सिलेंडरच्या डिलिव्हरीनंतर पुढचे बुकिंग करण्यासाठी २५ दिवस थांबावे लागेल.
२) काळ्याबाजारावर लगाम : घरगुती सिलेंडरचा हॉटेल किंवा इतर व्यावसायिक कामांसाठी होणारा वापर कमी होईल.
३) डिलिव्हरी सिस्टिममध्ये सुधारणा : रांगेत असलेल्या ग्राहकांना आता अधिक जलद गतीने सिलेंडर मिळणे शक्य होईल.