निसर्गाच्या शाळेतील नेतृत्वाचा धडा...

10 Mar 2026 13:44:29

नेता हा कोणत्याही समूहासाठी महत्त्वाचा भाग. जर नेतृत्व योग्य असेल, तर समूहाचा विकास वेगाने होतोच, पण सदस्यही आनंदी आणि समाधानी असतात. मात्र, सध्या ‘अल्फा’ होण्याच्या नादामध्ये मानवाला, मूळ आणि नैसर्गिक नेतृत्वगुण म्हणजे काय, त्याची गरज याचाच विसर पडला आहे. त्यामुळे आज नेतृत्वकला शिकवणारे अनेक शिकवणी वर्ग असूनही, अनेक कंपन्यांमध्ये संघर्ष आढळतो. यासाठी आदर्श नेतृत्व शोधण्यासाठी निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण पुरेसे ठरणारे आहे. निसर्गातील नेतृत्वाचे गुण, कोणाकडून काय शिकावे, कसे शिकावे, अशा विविध मुद्द्यांच्या आधारे नेतृत्वगुणांच्या आदर्शत्वाचा घेतलेला आढावा...

गेल्या अनेक दशकांपासून आपण नेतृत्वाचे धडे कॉर्पोरेटजगतात, लष्करी हालचालीत किंवा राजकारणात शोधत आलो आहोत. पण, कदाचित आपण चुकीच्या ठिकाणी त्याचा शोध घेत आहोत. निसर्गाकडे ३.८ अब्ज वर्षांचा ‘संशोधन आणि विकासाचा’ (RD) अनुभव आहे. निसर्गातील प्रत्येक जिवंतप्रणाली टिकून आहे; कारण ती कार्यक्षम, परिस्थितीशी जुळवून घेणारी आणि शाश्वत आहे. मानवाच्या आगमनापूर्वीच प्राण्यांनी नेतृत्व, सहकार्य आणि सामूहिक जीवन जगण्याची कला आत्मसात केली. आपल्याला माहीत आहे की, आपण त्यांच्यापेक्षा तसे फार वेगळे नाही. प्रख्यात प्राणिशास्त्रज्ञ फ्रान्स डी. वाल यांनी संशोधनातून सिद्ध केल्याप्रमाणे मानवी श्रेणीरचना, मैत्री आणि युती ही चिम्पांझी आणि बोनोबो माकडांसारखीच असते. आपण आज ज्याला ‘राजकारण’ किंवा ‘टीम डायनॅमिस’ म्हणतो, ती फक्त प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनाची मानवी आवृत्ती आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर केलेल्या हल्ल्याचे परिणाम, जगभर दिसत आहेत. त्यावर आजच्या नेत्यांच्या वागण्याबद्दलच्या बर्‍याच चर्चाही रंगताना दिसत आहेत. म्हणून, जर आपल्याला नेतृत्व कसे करावे (आणि कसे करू नये,) हे समजून घ्यायचे असेल, तर निसर्गाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण ‘पंच-कुन’च्या उदाहरणातून ‘कॉन्टॅट कम्फर्ट’विषयी बोललो. म्हणजेच, एकमेकांच्या उबेची आणि स्पर्शाची आपल्याला असलेली गरज. पण आजच्या जगात एक दुसरीच स्पर्धा सध्या सुरू आहे: ती म्हणजे ‘सर्वांत वर’ पोहोचण्याची स्पर्धा. आपण सर्वांना ‘अल्फा’ व्हायचे आहे. पण जपानमधील प्रसिद्ध ‘पंच-कुन’ माकडांच्या टोळीचा अभ्यास केला असता, एक धक्कादायक वास्तव समोर आले. आपल्याला वाटते की ‘अल्फा’ असणे म्हणजे सर्वांत ताकदवान असणे, इतरांवर हुकूमत गाजवणे. पण जीवशास्त्राच्या दृष्टीने ‘अल्फा’ असणे, हे सर्वांत जास्त तणावाचे काम आहे. एक तर टोळीतील मुख्य माकडाला सतत लक्ष ठेवावे लागते की, कोणी आपली जागा तर घेत नाही ना?; कोणी नियम तर मोडत नाही ना? संशोधनात असेही दिसून आले आहे की, निम्न स्तरावरील माकडांपेक्षा, ‘अल्फा’ माकडाच्या शरीरात तणावाचे प्रमाण अधिक असल्याने, त्यात ‘कोर्टिसोल’ अर्थात तणावाचे हार्मोन जास्त असतात.

जेव्हा माकडांच्या जगातील एखादा ‘अल्फा’ फक्त ताकदीचा वापर करतो आणि प्रेम विसरतो, तेव्हा टोळी अस्ताव्यस्त होते आणि विखुरतेही. मग त्याला अपेक्षित असलेले नियंत्रण त्या टोळीवर ठेवता येत नाही. आज मानवी समाजातही असेच घडते आहे. आपण ‘स्टेटस’ आणि ‘करिअर’ नामक शिडीच्या इतक्या मागे लागलो आहोत की, आपण आपल्याला सुरक्षित ठेवणारी ‘कॉन्टॅट कम्फर्ट’ अर्थात ती ऊबच गमावून बसलो आहोत. गेल्या आठवड्यात आपण पाहिले की, स्पर्शामुळे आपल्याला शांतता मिळते. पण सत्तेच्या स्पर्धेत जेव्हा आपलेपणाचा स्पर्श कमी होतो, तेव्हा संशय मात्र नक्की वाढतो. ‘अल्फा मेल’ हा शब्द गेल्या काही काळात अनेक वेळा वापरला गेला आहे. १९४०च्या दशकात, पिंजर्‍यातल्या तणावग्रस्त लांडग्यांच्या अभ्यासातून हा शब्द आला. पुढे व्यवसायात आणि राजकारणात याचा अर्थ ‘आक्रमक आणि हुकूमशहा’ असा रूढ झाला. पण निसर्गात ‘अल्फा’ म्हणजे हुकूमशहा नव्हे. लांडग्यांचा किंवा चिम्पांझींचा ‘अल्फा’ केवळ शक्तीच्या जोरावरच नव्हे, तर ‘सहानुभूती’ दाखवूनही नेतृत्व करतो. तो कमकुवत सदस्यांचे रक्षण करतो, भांडणे सोडवतो आणि आपल्या कळपात सुसंवाद राखतो. या गुणांशिवाय त्याची सत्ता टिकूही शकणार नाही.

बोनोबो माकडांमध्ये तर नेतृत्व अनेकदा मादीकडेच असते, जे शारीरिक ताकदीपेक्षा सामाजिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असते. थोडक्यात, शारीरिक शक्ती हे प्राण्यांमध्ये नेतृत्वाचे सर्वांत दुय्यम साधन आहे. तिथे नेतृत्व ही सेवा असून, वैयक्तिक गौरवापेक्षा संरक्षण आणि स्थिरतेला यामध्ये जास्त महत्त्व आहे. उच्च दर्जाचे नर चिम्पांझी केवळ ताकदीनेच नव्हे, तर युती-बांधणीद्वारे त्यांचे प्रभुत्व टिकवून ठेवतात. सत्ता टिकवण्यासाठी ते बळाचा वापर करण्याऐवजी मित्र जोडतात, ते समर्थकांना जोपासतात, ते कमकुवत सदस्यांना गुंडगिरीपासून वाचवण्यासाठी अनेकदा हस्तक्षेप करून विश्वासार्हता निर्माण करतात. ज्यामध्ये गटाच्या मतावर प्रभाव टाकणार्‍या उच्च दर्जाच्या महिलांचाही समावेश आहे.

बोनोबो समाजात, हे गट अनेकदा मादी-प्रधान असतात. ते संघर्षाऐवजी भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावर गट बांधून ठेवतात. मादी मजबूत बंध तयार करतात आणि अनेकदा गटाचे नेतृत्वही करतात. त्या सहकार्य, युती नेटवर्क आणि भावनिक बुद्धिमत्तेद्वारे सुव्यवस्था राखतात, संघर्ष वाढण्यापूर्वीच तो कमी करतात. एकमेकांशी केलेले सहकार्य आणि युती-बांधणी, ही आज्ञा आणि नियंत्रणाइतकीच शक्तिशाली असू शकते. हत्तींच्या कळपाचे नेतृत्व सर्वांत वयस्कर मादी (Matriarch) करते. तिचा अनुभव आणि स्मृती कळपाच्या अस्तित्वासाठी अत्यंत कळीची ठरते. त्यांच्या स्थलांतराचे मार्ग, अन्नस्रोत आणि धोके यांची आठवण जीवन आणि मृत्यूमधील फरक दर्शवू शकते. निर्णय आरामात, विचारपूर्वक आणि समावेशक असतात.अनुभवातून आलेले शहाणपण आणि दीर्घकालीन स्मृती, ही कोणत्याही नेतृत्वाची धोरणात्मक संपत्ती आहे. नेत्याचे भूतकाळातील बरे-वाईट अनुभवच, त्या गटाचे भविष्य सुरक्षित करू शकतो.

आजही अनेक संस्था ‘आक्रमक’ नेतृत्वाला महत्त्व देतात आणि प्रभावी मानतात. मात्र, गुगलच्या ‘प्रोजेक्ट अरिस्टॉटल’नुसार, ज्या संघात कर्मचार्‍यांना मानसिक सुरक्षितता मिळते, त्यांची कामगिरी सर्वोत्तम असते. गॅलपच्या संशोधनानुसार जेव्हा कर्मचार्‍यांच्या मताला किंमत मिळते, तेव्हा त्यांची उत्पादकता १२ टक्के वाढते आणि नोकरी सोडण्याचे प्रमाण २७ टक्क्यांनी घटते. आपल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा या प्रवृत्तीचे उत्तम उदाहरण आहेत. जे. कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे, जेव्हा आपण सत्तेची पूजा करू लागतो, तेव्हा आपली बुद्धी काम करणे थांबवते. आपण इतरांना मित्र न मानता, स्पर्धक मानू लागतो आणि भीतीचे राजकारण सुरू होते. असेच काहीसे सध्या जगात चाललेले दिसून येते. ‘अल्फा’ होण्याच्या शर्यतीत आपण कधी कधी इतके वर पोहोचतो, जिथे फक्त एकटेपणा असतो. तिथे मानवी प्रेमाची ऊबच नसते, फक्त सत्तेची थंड हवा असते.

प्राण्यांच्या या उदाहरणातून एक संदेश नक्की मिळतो की, नेत्याची शक्ती ही केवळ बळात नसते, ती सहानुभूतीतही असते. संरक्षणामुळे निष्ठा निर्माण होते आणि सहकार्यामुळे समूह समृद्ध होतो. जर निसर्ग जुन्या आणि चुकीच्या नेतृत्व कल्पनांना चिटकून राहात नाही; मग आपण का राहावे? उत्तम नेता तो नाही, जो  समूहाच्या वर उभा राहतो; तर तो आहे, जो समूहाचा आधार बनून उभा राहतो.

(‘पंच-कुन’च्या कथेमुळे मला प्रेरणा मिळाली, म्हणून या लेखात थोडे अधिक प्राण्यांच्या जगात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. कुणी यातील संदर्भ व उदाहरणे वैयक्तिक मानू नये.)




- डॉ. शुभांगी पारकर


Powered By Sangraha 9.0