रंगांच्या सणावर वैरभावनेचे डाग!

10 Mar 2026 11:47:01

कोणताही सण म्हटले की आनंद आणि उत्साह हा आलाच. त्याशिवाय कोणताही सण साजरा होऊच शकत नाही. त्यात होळीचा सण म्हणजे, रंगांची उधळणच. या रंगांच्या माध्यमातून यावर्षीही देशभरात आनंदाची चौफेर उधळण झाली. मात्र, अनेकांना या आनंदावरच पाणी फिरवण्यास धन्यता वाटल्याने, त्यांनी या हिंदू सणाला विवादाचे गालबोटही लावले.

देशभर होळीचा सण आनंदात साजरा केला जात असतानाच, राजधानी दिल्लीमधील उत्तमनगर भागात या सणास गालबोट लागले. होळीच्या दिवशी एका ११ वर्षे वयाच्या मुलीने, रंगाने भरलेला फुगा फेकण्याचे निमित्त झाले. तो फुगा फुटून त्यातील रंग शेजारच्याच घरातील एका महिलेच्या अंगावर उडाला. ती महिला मुस्लीम असल्याने, त्या दोन कुटुंबात भांडत जुंपले. त्यातून दोन समाजात हिंसाचार उसळला. या संघर्षात तरुण नामक एका २५ वर्षे वयाच्या तरुणास, जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीमुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे उत्तमनगर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. हिंसक जमावाने अनेक वाहने पेटवून दिली. तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ ‘रास्ता रोको’ही करण्यात आला. या परिसरात उसळलेल्या हिंसाचारामुळे, तेथील वाहतूक काही तास बंद होती. जमावाने एक मोटार, एक दुचाकी वाहन पेटवून दिले. घटनास्थळी जमावदेखील मोठ्या संख्येने जमला होता. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात होता.

उत्तमनगर हा नवी दिल्लीतील द्वारका जिल्ह्यातील दाट लोकवस्तीचा परिसर आहे. रंगाचा फुगा फेकण्याच्या किरकोळ घटनेवरून, उत्तमनगरमध्ये दोन समाजांमध्ये संघर्ष उसळला. त्यात एका हिंदू तरुणाचा बळी गेला. दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणाने हिंसक वळण घेतले. या हिंसाचारात उभय बाजूचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी, या हत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

दिल्ली पोलिसांनी या घटनेची तातडीने चौकशी सुरू केली असून, याप्रकरणी चारजणांना अटकही करण्यात आली आहे. हिंसाचार नेमका कशामुळे उसळला, याचा अभ्यास पोलिसांकडून केला जात आहे. दि. ४ मार्च रोजी घडलेली घटना लक्षात घेऊन, संबंधित परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याची माहिती द्वारका जिल्हा पोलीस उपयुक्त कुशल पाल सिंह यांनी दिली. त्या भागात आमच्याकडून सातत्याने गस्त घातली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंसाचारास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

लंडनमध्ये इस्लामी गुंडांचा
होळी समारंभात धुडगूस!

लंडनमधील हॅरो सिव्हिक सेंटरच्या पार्किंग जागेमध्ये, गेल्या दि. ३ मार्च रोजी पूर्वअनुमती घेऊन शेकडो हिंदू होळीचा सण साजरा करण्यासाठी जमले होते. पण, या जमलेल्या लोकांवर जवळच्या मशिदीतून आलेल्या मुस्लीम गुंडांनी हल्ला केला आणि या रंगांच्या सोहळ्याचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला. होलिकादहनाचा कार्यक्रम ‘इंटरनॅशनल सिद्धाश्रमशक्ती सेंटर’ने आयोजित केला होता. स्थानिक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच विशेष निमंत्रितही आवर्जून आले होते. दोन विद्यमान महापौर, कौन्सिल सदस्य, ‘लंडन फायर ब्रिगेड’चे कमांडर असे विविध क्षेत्रांतील मान्यवर, या कार्यक्रमास उपस्थित होते. पण, या होलिकादहन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या लोकांना, इस्लामी तरुणांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे तेथील परिस्थिती तणावपूर्ण झाली. या घटनेनंतर एका १४ वर्षांच्या तरुणास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती, पोलिसांकडून देण्यात आली. ज्या तरुणांनी या कार्यक्रमात घुसखोरी केली होती, त्यांच्याकडून रिकामे कॅन फेकण्यात आले. तसेच त्यांनी उपस्थितांना शिवीगाळही केली. या गोंधळामुळे उपस्थितांपैकी काही जण तेथून निघून गेले.

ब्रिटनमध्ये हिंदू समाजावर हल्ले होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. सप्टेंबर २०२२ मध्ये लिस्टरमध्ये ‘भारत-पाकिस्तान एशिया कप’ सामन्यावरून हिंसाचार उसळला होता. त्यावेळी हिंदूंच्या घरांना आणि काही व्यक्तींना हिंसक जमावाने लक्ष्यही केले होते. हिंदू समाजावर हल्ले होण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत, हे या ताज्या घटनेवरून दिसून येत आहे. ब्रिटिश सरकारने अशा गुंडांचा तातडीने बंदोबस्त केला पाहिजे. तसेच ब्रिटनमधील हिंदू समाजाने या अन्यायाविरुद्ध एकमुखाने आवाज उठविला, तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.

हम्पीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण होळी साजरी!

विजयनगर साम्राज्यातील हम्पी आणि अन्य परिसर ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळ सूचित समाविष्ट केला आहे. यावर्षी हम्पी परिसरात स्थानिक जनता आणि सुमारे एक हजार विदेशी पर्यटकांच्या उपस्थितीत होळी साजरी करण्यात आली. या होळीच्या सणाच्या निमित्ताने, हजारो स्थानिक आणि अन्य विदेशी पर्यटन उपस्थित होते. प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिराच्या लगत सर्व नागरिक होळी साजरी करण्यासाठी जमले होते. परंपरागत वाद्यांच्या गजरात आणि रंगीबेरंगी वातावरणात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. विजयनगर साम्राज्याच्या अवशेषांच्या साक्षीने होळीचा सण साजरा करण्यात आला. यानिमित्ताने परंपरा, संस्कृती यांचे दर्शन सर्वांनाच झाले. गेल्या दि. ४ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने, हम्पी परिसरात हजारो लोक एकत्रित आले होते.  हम्पीला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. भगवान शंकरांनी याच ठिकाणी मन्मथास जाळले, असे सांगण्यात येते.

त्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासूनच भाविक, स्थानिक युवक आणि विदेशी पर्यटक रथमार्गावर एकत्रित येऊ लागले. होळीचा सण असल्याने तेथील वातावरण लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या, गुलाबी अशा रंगांनी व्यापून गेले होते. हम्पीतील शतकांपासून उभे असलेले दगडी मंडप, उंच गोपुरांच्या मूकसाक्षीने हा आधुनिक सांस्कृतिक उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित सर्व विविध रंगांमध्ये एवढे रंगून गेले होते की, कोण विदेशी आणि कोण स्थानिक हा फरकच ओळखता येत नव्हता. विरुपाक्ष मंदिरापासून निघालेली मिरवणूक वाद्यांच्या गजरात मार्गक्रमण करीत होती. या मिरवणुकीत लाऊडस्पीकर किंवा अन्य कोणतीही कृत्रिम यंत्रणा नव्हती. मिरवणुकीत विविध रंगांची जी उधळण केली जात होती, त्याचा आनंद विदेशी पर्यटक लुटत होते. तीन तास चाललेल्या या मिरवणुकीची सांगता, तुंगभद्रा नदीच्या किनारी झाली. युरोप, दक्षिण अमेरिका आणि जगाच्या अन्य भागांतील पर्यटक या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. एकेकाळी संपूर्ण विश्वास ज्या विजयनगर साम्राज्याचे आकर्षण होते, त्या विजयनगर साम्राज्याचा वैभवशाली इतिहास आठवत, स्थानिक आणि विदेशी जनतेने होळी साजरी केली.

मुधोळमध्ये ‘लव्ह जिहाद’!

कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे राहणार्‍या एका महिलेने तिचा नवरा साविफ पट्टे याच्या विरुद्ध पोलीस अधीक्षक एस. पी. सिद्धार्थ गोयल यांच्या कार्यालयात धाव घेतली. आपल्या नवर्‍याने आपले सक्तीने धर्मांतर करून आपल्याशी विवाह केला आणि नंतर त्याने आपल्यावर हल्ला करून, आपल्याकडील चार लाख रुपये आणि सोने हिरावून घेतले, अशी तक्रार त्या महिलेने केली आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यात येईल आणि पुढील तपास करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या पीडित महिलेचे मूळ नाव श्रीदेवी असे असून, ती ‘कुरुबा’ समाजाची आहे. बागलकोट येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या महिलेने आपली ही कहाणी सांगितली. आपल्याशी विवाह आणि आपले धर्मांतर केल्यानंतर, सर्व संपत्ती त्या मुस्लिमाने काढून घेतली आणि त्यानंतर आपल्याला घराबाहेर काढले, असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले. त्या महिलेचा दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘निकाह’ लावण्यात आला. तिचे नाव ‘हबिबा’ असे ठेवण्यात आले. "माझ्याशी लग्न करण्याचे वचन त्याने मला दिले होते. तसेच धर्मांतर करण्यासाठी माझे मन त्याने वळविले. पण, लग्न केल्यानंतर त्याने आपले खरे दात दाखविले आणि मला घराबाहेर काढले,” असे त्या महिलेने, पोलिसांना सांगितले. त्या मुस्लीम व्यक्तीचा आधी एक विवाह झाला होता, असेही त्या महिलेने तक्रार दाखल करताना सांगितले. ‘लव्ह जिहाद’ची एवढी चर्चा होत असताना, काही महिला अजूनही मुस्लीम व्यक्तींच्या जाळ्यात सापडत आहेत. अशा घटना लक्षात घेऊन हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येते.


Powered By Sangraha 9.0