आखातातील युद्धाने जगातील संपन्न देशांची झोप उडविली असून, इंधनाच्या संभाव्य टंचाईमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था भीतीने थरथरत आहेत. अमेरिकेसारख्या महासत्तेला दररोज अब्जावधी डॉलरचा चुराडा सहन करावा लागत असून, दुसरीकडे भारतात सर्वकाही आलबेल आहे. यामागे केवळ एका व्यक्तीचे अथक परिश्रम आणि मुत्सद्दी धोरण आहे.
पश्चिम आशियात, आखाती देशांमध्ये उडालेल्या युद्धाच्या आगडोंबामुळे जगावर तिसर्या महायुद्धाचे सावट पडले आहे. जगभराची इंधनाची गरज भागविणार्या या आखाती देशांमध्येच युद्ध सुरू असून, त्यामुळे खनिज तेलाचे, पर्यायाने पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनांचे भाव वाढतील आणि सारे जग महागाईच्या तडाख्यात सापडेल, याची चिंता जगाला भेडसावत आहे. युद्धाला दहा दिवस उलटल्यानंतरही इराण आणि अमेरिका-इस्रायल हे दोन्ही शत्रू माघार घेण्यास तयार नसून, दिवसेंदिवस हे युद्ध उग्र होत चालले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतातील स्थिती पाहिली, तर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसेल. भारतीयांमध्ये आजघडीला तरी महागाई आणि इंधनटंचाईबद्दल चिंतेची भावना पसरलेली नाही. युद्धाच्या पार्श्वभूमीवरही भारतात शांतता आहे. याचे कारण, भारतात सर्वत्र इंधन आणि स्वयंपाकाचा गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सरकारने अजूनही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केलेली नाही. उलट, भारतीयांचे दैनंदिन जीवन आणि सारे व्यवहार निर्वेधपणे सुरू आहेत. भारतात नुकताच होळीचा सण उत्साहात पार पडला. इतकेच नव्हे, तर देशात क्रिकेट-जगतातील मानाची ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धाही पार पडली. भारतीय संघाने अंतिम सामन्यात जबरदस्त खेळी करून, न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला आणि देशात युद्ध जिंकल्यासारखी विजयी आनंदाची लाट पसरली. दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था यंदाही सात टक्क्यांपेक्षा अधिक दराने विकास साध्य करील, असे अंदाज जागतिक वित्तसंस्थांनी व्यक्त केले आहेत. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आणि नेहमीप्रमाणेच विरोधी पक्षांनी पहिल्याच दिवशी गोंधळ घालून, लोकसभेचे काम बंददेखील पाडले. याचाच अर्थ, देशात सर्वकाही सुरळीत सुरू आहे.
देशात अशी सुरळीत स्थिती निर्माण करण्यासाठीच, एका व्यक्तीने आपली रात्रीची झोप घालविली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले एक तप जे राजनैतिक मुत्सद्देगिरीचे राजकारण केले, त्याची फळे आज देश चाखतो आहे. मोदी यांनी जगभर फिरून बहुसंख्य देशांच्या प्रमुखांशी सौहार्दाचे, क्वचित प्रसंगी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. विशेष म्हणजे जागतिक पटलावर एकमेकांचे शत्रू असलेल्या देशांच्या प्रमुखांचे, मोदी यांच्याशी मात्र सलोख्याचे संबंध आहेत. तसेच आपल्या शत्रूदेशाशी भारताने (म्हणजे मोदींनी) मैत्रीचे संबंध राखल्याबद्दलही, त्यांची मोदी यांच्या विरोधात कसलीच तक्रार नाही. भारताशी कृतघ्नपणे वागलेले देशही, आज मोदी यांच्याशी मैत्री करण्यास तयार असतात. परस्परविरोधी विचारांच्या देशांनी, मोदी यांना आपला सर्वोच्च नागरी सन्मानही दिला आहे.
या जागतिक युद्धाच्या पूर्वसंध्येला भारताची देशांतर्गत राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती हेवा वाटावी इतकी समतोल आणि शांत आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने धावत असून, देशात राजकीय स्थैर्य आहे. तसेच सामाजिक तणावही मर्यादेत आहेत. माओवादी हिंसाचार संपुष्टात आला आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्यामुळे, त्याच्याकडे वाकडी नजर करण्याचे धैर्य कोणातच नाही. हे सर्व मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने इतकी वर्षे घेतलेल्या अपार मेहनतीचेच फळ आहे.
मोदी यांच्या या कार्याची दखल घेणे तर सोडाच; पण त्यांच्या प्रत्येक निर्णयाची खिल्ली उडविणे इतकेच विरोधी पक्षांना काम उरले आहे. त्यातूनच त्यांचा बिनडोकपणा आणि कपटी वृत्तीचे दर्शन घडते. जे भारतीय मोदी यांच्या निर्णयांवर नाखूश आहेत, त्यांनी एकदा जगाची स्थिती काय आहे? त्यावर नजर टाकावी. जगात कुठेही युद्ध नसतानाही काँग्रेसच्या राजवटीत देशात गॅस सिलिंडर आणि पेट्रोलची टंचाई होत असे. परकीय चलनाची टंचाई तर पाचवीलाच पूजलेली होती. त्यासाठी काँग्रेसने देशातील सोनेही परदेशात गहाण ठेवले होते. मोदी यांनी आता यापैकी बरेचसे सोने पुन्हा भारतात आणले आहे. मोदी यांच्या काळात देशात कधीच गॅस व इंधनाची टंचाई उद्भवलेली नाही.
आज भारताकडे ७०० अब्ज डॉलरची विक्रमी परकीय गंगाजळी शिल्लक आहे. शिवाय, जगातील सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान कंपन्यांनी भारतात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या योजना आखल्या आहेत. त्यामुळे परकीय चलनाची गंगाजळी वाढणारच आहे. पण, केवळ डॉलरवर भारत अवलंबून राहिलेला नाही. डझनभर देशांशी भारत आजही रुपयातून व्यापार करीत असून, आणखी अनेक देशांशी रुपयात व्यवहार करण्याचे करार केले आहेत. अशा देशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ‘यूपीआय’च्या माध्यमाने भारत आणि अन्य काही देशांमध्ये होणारी पैशांची देवाणघेवाण फक्त सुलभच झाली आहे असे नव्हे; तर त्यामुळेही भारताचे डॉलरवरील अवलंबित्वही कमी होत चालले आहे. अशा निर्णयांचे दूरगामी परिणाम होत असतात. जगभरातील प्रगत देशांच्या अर्थव्यवस्था रडतखडत चालू असताना, भारताची अर्थव्यवस्था चौखूर उधळली आहे. जगभरातील अंधारलेल्या आर्थिक अवकाशात भारताची अर्थव्यवस्था हाच चमकणारा तेजस्वी तारा आहे, असे अर्थतज्ज्ञ म्हणत असतात. आता जग युद्धाच्या ज्वाळेत होरपळत असताना, भारतात मात्र बर्फासारखा गारवा आहे, असे म्हणावे लागते.
फ्रान्सचा सम्राट नेपोलियनने रशियावर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांनी लिहिलेली ‘वॉर अण्ड पीस’ ही कादंबरी विलक्षण गाजली. ती अभिजात कलाकृती मानली जाते. देशावर आलेल्या परचक्राच्या संकटातही मानवी कोमल भावना केवळ कायमच राहतात असे नव्हे, तर त्या व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यास प्रेरितही करतात, हे या कादंबरीचे सूत्र. मोदी यांचे निर्णयही हे भारतमातेबद्दल त्यांना असलेल्या अतीव प्रेमामुळेच प्रेरित असतात. भारताच्या सर्व शेजारी देशांमध्ये भयानक यादवी हिंसा होऊन सत्तापालट झाला आहे. भारतातही असेच घडावे, यासाठी बहुतेक विरोधी पक्ष, त्यातही काँग्रेस जीवाचे रान करीत आहेत. त्यात त्यांना यश येणे शक्यच नाही. जगात ‘वॉर’ असले, तरी भारतात मात्र ‘पीस’ आहे. कारण हा मोदी यांच्या मुत्सद्दी धोरणाचा लाभांश (डिव्हिडंड) आहे.
- राहुल बोरगांवकर