मुंबई : (Devendra Fadnavis) पुढच्या वर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
आ. नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या उप प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. “महाराष्ट्रात सौर ऊर्जेद्वारे किती मेगावॅट विद्युत तयार होते? बऱ्याचदा शेतकऱ्याला दिवसा ८ तास वीज मिळण्याऐवजी ४ तास वीज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान १० तास निरंतर वीज दिली पाहिजे,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत ४ हजार मेगावॅटच्या माध्यमातून जवळपास ८ लाख शेतकऱ्यांना निरंतर वीज देत आहोत. या वर्षाच्या शेवटपर्यंत अतिरिक्त १० हजार मेगावॅट वीज तयार होईल आणि त्यानंतर ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ शकू. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुढच्या वर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
हेही वाचा : ममतांच्या 'त्या' व्हिडिओवरून राजकीय वातावरण तापले!
“तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने (इंटरनॅशनल सोलर अलायन्स) या योजनेला प्रमुख योजना म्हणून नेमले असून जवळपास ७ ते ८ आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देण्यात आले. यासोबतच केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना ही योजना अंमलात आणण्याचे आदेशही दिले आहेत. हळूहळू या सगळ्या योजनांचे बॅटरी स्टोरेज तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून सौर तासांमधील ऊर्जा २४ तास कशी वापरता येईल आणि इतर क्षेत्रांकरिता कशी वापरता येईल, असा प्रयत्न आम्ही पुढच्या काळात करणार आहोत,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.