मुंबई : (BMC) मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या हायव्होल्टेज लढतीत अखेर सत्ताधारी महायुतीने बाजी मारत ११ समित्यांवर विजय मिळवला. (BMC)
सोमवार, ९ मार्च रोजी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना एस आणि टी प्रभाग समितीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण येथे महायुती आणि शिवसेना (उबाठा) समर्थित आघाडीचे संख्याबळ अगदी १०-१० मतांनी बरोबरीत होते. त्यामुळे निकाल लकी ड्रॉद्वारे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. (BMC)
मात्र मतदानादरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. ठाकरे गटाचे नगरसेवक सुरेश शिंदे आणि नगरसेविका दीपमाला बढे यांनी मतदान करताना तांत्रिक चूक केली. त्यांनी आपल्या उमेदवाराऐवजी भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या कॉलममध्ये सही केली. (BMC)
हेही वाचा : Sanjay Raut Press Conference: इराण- इस्त्रायल युद्धावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर तीव्र टीका! म्हणाले, ‘मोदी सरकारची ही शांतता म्हणजे...’
मतमोजणीदरम्यान ही चूक उघड झाली. निवडणूक नियमांनुसार चुकीच्या कॉलममध्ये केलेली सही वैध मानली जात नसल्याने दोन्ही मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाच्या खात्यात जाणारी दोन मते बाद झाली आणि महायुतीचा विजय जवळपास निश्चित झाला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दोन अनुभवी नगरसेवकांकडून अशी चूक कशी झाली? हा केवळ योगायोग होता की त्यामागे काही वेगळे राजकारण आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. (BMC)
दरम्यान, अंतिम निकालात १७ पैकी ११ समित्यांवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने विजय मिळवला. तर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांना प्रत्येकी २ समित्यांवर समाधान मानावे लागले. तसेच मनसे आणि एमआयएम यांनी प्रत्येकी एका समितीवर विजय मिळवला. विशेष म्हणजे एम पूर्व प्रभागात एआयएमआयएमच्या खैरनुसा हुसे यांनी शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधले. (BMC)
मात्र या संपूर्ण निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिल्या त्या एस आणि टी प्रभागातील ‘दोन सह्या’, ज्यामुळे ठाकरे गटाच्या हातात आलेला विजय शेवटच्या क्षणी निसटल्याची चर्चा रंगली आहे. (BMC)