‘गोरक्षणव्रती’ नैना

10 Mar 2026 12:44:37

समाजकार्य करताना संघर्ष करत, अनेक संकटांना तोंड देत, ध्येयाप्रती प्रामाणिक राहणार्‍या नैना सुभाष राजपूत यांच्याविषयी...

गोरक्षण आणि धर्मकार्याच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असणार्‍या नैना सुभाष राजपूत, या तरुण कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. एका साध्या कुटुंबातून आलेल्या नैना यांनी, आयुष्यातील अनेक अडचणींचा सामना करत, समाजकार्याची वाट हौसेने निवडली. गोरक्षण, प्राणिसंवर्धन आणि धर्मजागृती या विषयांवर कार्य करण्याचा त्यांचा संकल्प आजही तितकाच दृढ आहे. समाजात सकारात्मक विचार रुजवण्यासाठी आणि सांस्कृतिक मूल्यांविषयी जागृती करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नरत आहेत.

नैना राजपूत यांनी देशाच्या इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घेतली. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा स्वाभिमान आणि स्वधर्मासाठीचा संघर्षाचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव आहे. त्याचप्रमाणेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातूनही त्यांना धैर्य, संघटन आणि समाजासाठी जगण्याची प्रेरणा मिळाली. या महापुरुषांच्या विचारांनी त्यांच्या आयुष्याला दिशा दिली आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा नैना यांच्या मनात दृढ केली.

शिक्षणाच्या बाबतीत नैना यांनी हिंदी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून, शिक्षणामुळे विचारांची व्याप्ती वाढल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर शिक्षणामुळेच समाजातील वास्तवाचे आकलन होत, समाजकार्याची जाणीवही अधिक प्रबळ केल्याचेही त्या अधिरेखित करतात. समाजाला भेडसावणार्‍या अनेक प्रश्नांवर काम करण्यासाठी, कोणी तरी पुढाकार घेणे आवश्यक असल्याची भावनाच त्यांना सतत पुढे नेत राहिली. केवळ विचार मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावरच त्यांनी कायम भर दिला.

आज त्या ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघ’ आणि ‘प्राणिण फाऊंडेशन’ या संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. या संस्थाच्या माध्यमातून गोरक्षण, प्राणिसंवर्धन आणि समाजजागृतीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात. गोरक्षणाबद्दल समाजात योग्य माहिती पोहोचवणे, प्राण्यांबद्दल संवेदनशीलता वाढवणे आणि या कार्यामध्ये युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.

मात्र, नैना यांचा इथवरचा प्रवास सहजगम्य नाही. समाजकार्याच्या मार्गावर चालताना अनेक अडथळे त्यांच्या वाटेमध्ये आले. काहीवेळा अपेक्षित साथही लाभली नाही, तर कित्येकवेळा गैरसमजही निर्माण झाले. काही लोकांनी त्यांच्या कार्यावरच प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी टीकाही केली. अशा परिस्थितीत अनेकजण मागे हटतात; पण नैना राजपूत यांनी समाजसेवेचा मार्ग सोडला नाही. त्यांनी प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरे जात आपले कार्य सुरूच ठेवले.

नैना यांच्या मते, धर्मकार्य केवळ घोषणांपुरतेच मर्यादित नसून, ते आचरणातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून सिद्ध करावे लागते. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः गोरक्षणाच्या विषयाकडे समाजाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे त्या सांगतात.

भारतीय संस्कृतीमध्ये गाय ही केवळ एक पशू नसून, ती संवेदना, कृतज्ञतेचे प्रतीक मानले गेले आहे. त्या परंपरेचे जतन करण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असल्याचे त्या मानतात. गोरक्षणाच्या कार्यात युवकांनी सहभागी व्हावे आणि समाजाने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही त्या करतात. आज त्यांच्या कार्यात अनेक धर्मबंधू सहभागी झाले आहेत. सकारात्मक बदल घडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. संगठीत प्रयत्नांचा प्रभाव मोठा असल्याचे त्या सांगतात.

त्यांच्या मते, समाजातील अनेक समस्या अज्ञान आणि उदासीनतेमुळे निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जागृती आणि संघटनाची गरज आहे. देशातील विविध घटनांकडे पाहताना समाजाने सजग आणि सतर्क राहणे गरजचे आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून समाजहितासाठी प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक असल्याचेही मत त्या नोंदवतात. संघर्षाचा काळ हा माणसाची खरी परीक्षा घेतो. पण त्याचवेळी आयुष्यातील धैर्य आणि संयमाचे महत्त्वही त्या अधोरेखित करतात. नैना यांनाही त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभवांनी अधिक सक्षम केले. आज नैना राजपूत यांची वाटचाल एका स्पष्ट ध्येयाकडे होत आहे. गोरक्षण आणि धर्मकार्याविषयी समाजात जागृती निर्माण करणे, संस्कृतीचे जतन करणे आणि लोकांना सकारात्मक कार्यासाठी प्रेरित करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.

संघर्ष, जिद्द आणि ध्येयाशी असलेली निष्ठा यांचा संगम असलेली त्यांची ही वाटचाल, अनेकांसाठी प्रेरणादायी अशीच. प्रतिकूल परिस्थितीतही विश्वास आणि सातत्य कायम ठेवले, तर माणूस आपल्या ध्येयाच्या दिशेने निश्चितपणे पुढे जाऊ शकतो. समाजासाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक इच्छा असेल, तर मार्ग कितीही कठीण असला; तरी तो अशक्य राहत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नैना राजपूत. नैना राजपूत यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.



- सागर देवरे

Powered By Sangraha 9.0