Trump warning to Iran : खामेनींच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करत ट्रम्प यांचा इराणला इशारा!

01 Mar 2026 13:31:49
Trump warning to Iran
 
वॉशिंग्टन : (Trump warning to Iran) अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने इराणमध्ये प्रचंड अशांतता निर्माण केली आहे. खामेनेई समर्थक शिया मुस्लिममध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, रिव्होल्यूशनरी गार्ड्सने देखील खामेनींच्या मृत्यूची पुष्टी करत इस्रायल आणि अमेरिकेला बदल्याचा इशारा दिला आहे.
 
इराणचा इशारा
 

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला गंभीर इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी ट्रुथ सोशल मीडियावर केली. यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट करत इराणला गंभीर इशारा दिला. त्यांनी म्हटले की, "इराणने अमेरिका किंवा इस्रायलवर प्रतिहल्ला केल्यास आम्ही अशा शक्तीने हल्ला करु की जगाने आजवर पाहिला नसेल” डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानामुळे जागतिक पातळीवर तणाव वाढला असून इस्रायल-इराण संबंध शिगेला पोहोचले आहेत.
 
इराणच्या निशाण्यावर इस्रायलचे पंतप्रधान
याच वेळी इराणकडून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना मारण्याची धमकी मिळाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून संकेत मिळाले आहेत की नेतन्याहूंच्या जीवाला धोका असून लवकरच त्यांचा खात्मा होण्याची शक्यता आहे. तसेच खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे, तर काही अरब देशांमध्ये ३० दिवसांचा शोक घोषित करण्यात आला आहे.
 
तात्पुरती कमान मोजतबा खामेनींच्या हाती
अयातुल्ला अली खामेनी यांचा धाकटा मुलगा मोजतबा खामेनीने देशाची तात्पुरती कमान हाती घेतली आहे.
 
जगभरात खळबळ
इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती मारली गेली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले असून, त्यांच्या विधानावरुन ते खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी असल्याचे स्पष्ट झाले. तर, इराणने प्रतिहल्ल्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे मध्यपूर्वेत आणि जागतिक स्तरावर सुरक्षा आणि स्थैर्याच्या दृष्टीने गंभीर चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
 

सध्या इराणमध्ये परिस्थिती अस्थिर असून, खामेनींच्या मृत्यूनंतर होणाऱ्या पुढील कारवाईवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जागतिक शक्तींनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आपले धोरण आखण्यास सुरुवात केली आहे.
Powered By Sangraha 9.0