देशात ‘लव्ह जिहाद’चे विष पसरत असताना, ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्यांदा त्याला चित्रपट क्षेत्रामध्ये जाहीर वाचा फोडली होती. आता त्याच चित्रपटाचा पुढील भाग असलेला ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामधून ‘लव्ह जिहाद’ची विविध रुपे, दाहकता मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटाचा घेतलेला आढावा...
कायदेशीर संघर्ष आणि अनेक वादांच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट, अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वास्तविक नियोजित तारखेनुसार दि. 27 फेब्रुवारीला सकाळीच चित्रपटगृहांमध्ये झळकायला हवा होता मात्र, न्यायालयीन स्थगितीमुळे दुपार ते संध्याकाळपर्यंत त्याबाबत अनिश्चिततेचंच वातावरण होतं. स्थगिती हटवण्याचा निर्णय उशिरा आल्याने काही ठिकाणी सायंकाळी 7 नंतर, तर काही ठिकाणी रात्री 8 वाजल्यापासूनच या चित्रपटाचे ‘शो’ सुरू झाले. कारण चित्रपट प्रदर्शित झाल्याची माहिती सर्व प्रेक्षकांपर्यंत वेळेत पोहोचू न शकल्याने, त्याचा फटका पहिल्या दिवशीच्या तिकीटविक्रीलादेखील बसला. अखेर शनिवार, दि. 28 फेब्रुवारीपासून चित्रपट ठरलेल्या वेळेत प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे. 2023 साली प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने कमी खर्चात, जवळपास 300 कोटी रुपयांचा गल्ला जमवत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरण, ‘इसिस’ ते केरळ राज्याचं होत असलेलं ‘इस्लामीकरण’ असे वास्तववादी मुद्द्यांचे दर्शन चित्रपटात झाले. सुदीप्तो सेन यांनी या पहिल्या भागाचं दिग्दर्शन केलं होत. त्यामुळे त्याचा सिक्वेल ‘द केरळ स्टोरी 2’बद्दल उत्सुकता आणि अपेक्षा दोन्हीही उंचावल्या आहेत. पहिल्या भागाच्या यशानंतर दुसरा भाग त्या यशाची पुनरावृत्ती करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनी केली असून, त्यांनी पहिल्या भागाचीही धुरा सांभाळली होती. दिग्दर्शनाची जबाबदारी यावेळी कामाख्या सिंह यांनी स्वीकारली आहे. प्रमुख भूमिकांमध्ये ऐश्वर्या ओजा, उल्का गुप्ता, अदिती भाटिया, पूर्वा पराग, सुमित गहलावत, अर्जन सिंह, युक्तम आणि अलका अमीन यांचा समावेश आहे. कथालेखनही विपुल शाह आणि अमरनाथ झा यांनी केले आहे. चित्रपटाचे शीर्षक 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’च्या प्रचंड यशामुळे, त्यावर आधारितच ठेवले आहे.
कथा तीन हिंदू मुलींभोवती फिरते; सुरेखा नायर (उल्का गुप्ता), नेहा संत (ऐश्वर्या ओझा) आणि दिव्या सिन्हा (अदिती भाटिया). तिघीही कुटुंबांच्या इच्छेविरोधात प्रेमाची निवड करतात; परंतु त्यांच्या वाटा शेवटी एकाच वळणावर येऊन मिळतात. कथेनुसार तिघीही मुस्लीम तरुणांकडून फसवल्या जातात आणि त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडले जाते.
चित्रपटामध्ये नेहा ही एक खेळाडू (भालाफेकपटू) म्हणून उज्ज्वल भविष्य असलेली मुलगी दाखवली आहे. कुटुंबाचे तिच्या करिअरवर पूर्ण लक्ष आहे. मात्र, तिला राजू नावाचा तरुण प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. राजूचे खरे नाव फैजान. पुढे तो तिचे धर्मांतरण करून तिला जबरदस्तीने देहविक्रीत ढकलतो. दिव्या एक ‘इन्फ्लुएन्सर’ असून तिला नृत्यांगना होण्याचे स्वप्न दाखवले जाते. पालकांच्या बंधनांपासून मुक्तीचे आमिष तिला दाखवले जाते. प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेलं नातं हळूहळू नियंत्रण, फसवणूक आणि शोषणाच्या जाळ्यात रूपांतरित होते, तर सुरेखा ही अतिशय पुरोगामी असलेली तरुणी. कुटुंबाची विचारसरणीही तीच, त्यानंतर ती सलीमसह ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेते. या मुलींचं पुढे काय होतं, हे सगळं तुम्हाला चित्रपटातच पाहावं लागेल. या सगळ्या प्रवासात चित्रपट अनेक भावनिक धक्के देतो.
‘द केरळ स्टोरी 2’ ही तीन तरुणींच्या आयुष्याभोवती फिरणारी कथा आहे. प्रेम, विश्वास आणि त्यानंतर होणारा विश्वासघात या भावनिक वळणांमधून, धर्मांतराचा संवेदनशील मुद्दा चित्रपटात उलगडला जातो. वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या हिंदू मुलींना, मुस्लीम तरुणांकडून फसवून लग्न आणि त्यानंतर धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केले जाते, असा कथानकाचा केंद्रबिंदू. प्रत्येक समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती असतातच, हा मुद्दा ही पात्र अधोरेखित करतात. तसेच समाज, मुलींवर अत्याधिक बंधने घालणारे पालक आणि स्वतःला उदारमतवादी म्हणवणाऱ्या समाजाच्या जबाबदाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांच्या संगोपन आणि जागरूकतेवरही चित्रपट गंभीरपणे भाष्य करतो.
चित्रपटाची एकंदर कथा पाहताना असे जाणवते की, दैनंदिन आयुष्यात आपण ऐकत असलेल्या बातम्या, समाजमाध्यमांवर होणाऱ्या चर्चा आणि कानांवर पडणाऱ्या धक्कादायक घटना यांचं एक वास्तवदश पडद्यावर उभं केलं गेलं आहे. उदा. उत्तर प्रदेशातील ‘छांगूर बाबा’ प्रकरण असो किंवा दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड, अशा वास्तवातील घटना या कथानकात आलेल्या दिसतात. यासंदर्भांची नोंद घेतल्यानंतरही चित्रपट अधिक सखोल नसल्याची खंत वाटते. धर्मांतरण, ‘लव्ह जिहाद’ हे मुद्दे अगदी खरे आणि जिवंत असले, तरीही चित्रपटातील मांडणी अधिक रंजक करता आली असती. चित्रपटामध्ये तिन्ही मुलींच्या कथा अनुक्रमे उलगडत जातात असे दाखवण्यात आले असून, ही मांडणी रंजक वाटत नाही. जर कथानकाची सुरुवात एखाद्या सामायिक घटनेतून किंवा गोष्ट स्वरूपात झाली असती, तर कदाचित आणखी प्रभावी ठरली असती.
प्रदर्शनापूवच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. समाज माध्यमांवर त्याची जोरदार चर्चाही रंगली. काहींनी याला ‘प्रपोगंडा’देखील संबोधलं, तर काहींनी हा गंभीर सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा धाडसी प्रयत्न असल्याचं मत मांडलं. अशा वातावरणात प्रेक्षक थिएटरमध्ये प्रवेश करताना, काही अंशी पूर्वग्रह घेऊनच जातो. त्यामुळे चित्रपट पाहताना त्यातील आशय आणि मांडणी यांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणं अधिक महत्त्वाचं ठरतं. ‘द केरळ स्टोरी’ या पहिल्या भागात दिग्दर्शकाने अनेक वर्षांचे संशोधन आणि वस्तुनिष्ठ मांडणी केल्याने, चित्रपटाची वास्तविकता प्रेक्षकांपर्यंत योग्यरीत्या पोहोचली होती; दुसऱ्या भागामध्ये याबाबतीत प्रगती करण्यास वाव असल्याचे जाणवते. सिनेमा नेमकं काय मांडतो, त्याची कलात्मकता, पटकथेची बांधणी आणि भावनिक प्रभाव यांचे मूल्यांकन करणंही आवश्यक आहे. विषय फार गंभीर आणि संवेदनशील असल्याने, या चित्रपटाच्या निमित्ताने त्यावर निदान चर्चा तरी होते आहे, हेच फार महत्त्वाचं म्हणावं लागेल. चित्रपटाच्या अखेरीस येणारं गीत कथानकाच्या गंभीर आणि संवेदनशील ‘टोन’पासून किंचित वेगळं वाटतं. त्यामुळे भावनिकतेला धरून नसल्याची जाणीव होते. याच तुलनेत पहिल्या भागातील गाणी अधिक उजवी आणि आजही लक्षात राहण्याजोगी आहेत.
तिन्ही प्रमुख अभिनेत्रींनी आपल्या भूमिकांमध्ये प्रभावी कामगिरी केली असून, भावनिक प्रसंगांमध्ये त्यांचा अभिनय प्रामाणिक वाटतो आणि काहीवेळा प्रेक्षकांना अस्वस्थही करतो. बहुधा, तोच दिग्दर्शकाचा हेतू आहे. इतर कलाकारांनीही आपापली जबाबदारी चोख पार पाडली आहे. एकूणच, ‘द केरळ स्टोरी 2’ हा असा चित्रपट आहे, जो पाहिल्यानंतर प्रेक्षक पूर्णतः उदासीन राहू शकत नाहीत. हा चित्रपट विचार करायला भाग पाडतो. खुलं मन ठेवून पाहिल्यास चर्चेसाठी अनेक मुद्दे सापडतात. सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. कदाचित, काही घटना आपल्या आसपास घडत नसतील किंवा आपल्याला दिसत नसतील; पण ज्याला त्या जाणवतात, त्याला ती कथा मांडण्याचा अधिकार आहे, तोही संविधानिक चौकटीत आणि ‘सेन्सॉर’ मंडळाच्या नियमांनुसार. त्यामुळे चित्रपट तुम्हाला हादरवू शकतो, गांभीर्याने सामाजिक वास्तवाचा विचार करायला भाग पाडू शकतो, हे निश्चित!
दिग्दर्शक : कामाख्या सिंह
निर्माते : विपुल शाह
कलाकार : उल्का गुप्ता, आदिती भाटिया, ऐश्वर्या ओझा, पूर्वा पराग, सुमित गहलावत, अर्जन सिंह, युक्तम, अलका अमीन
रेटिंग : ३
- अपर्णा कड