निस्वार्थ सेवाभावाचे प्रतीक म्हणजे सुषमा देशपांडे होय. अखंड सेवाव्रताचे ब्रीद अंगीकारणाऱ्या आणि सर्वांची काळजी घेणाऱ्या सुषमा यांचे गेल्या महिन्यामध्ये अकाली निधन झाले. त्यांचे जाणे हे अनपेक्षित आणि देवाचा निष्ठूर न्यायच म्हणावा लागेल! पण, दैवगतीपुढे सारेच हतबल असतात. सेवाव्रत धर्माची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या सुषमा यांच्या निधनापर त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारे हे श्रद्धांजलीपर लेख...
मूळचे नागपूरचे असणारे सुषमा आणि विवेक देशपांडे हे दाम्पत्य, नोकरीनिमित्ताने भाग्यनगरला स्थायिक झाले होते. पुढे मुलगा आणि मुलगी दोघेही नोकरीच्या निमित्ताने विवाहानंतर बंगळुरु येथे स्थिरावल्याने, हे दोघेही बंगळुरुला गेले. प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत, वानप्रस्थाश्रमातील सेवाकार्यामध्ये सुषमा आणि विवेक दोघेही 2021च्या सप्टेंबर महिन्यात रुजू झाले. ‘कुर्तकोटी शंकराचार्य न्यासा’च्या श्री बालाजी मंदिर, पद्मावती मंदिर, मोरोपंत पिंगळे गोशाळा या प्रकल्पावर, गणेश चतुथच्या दिवशीच विवेक आणि सुषमा यांनी त्यांच्या कामाचा श्रीगणेशा केला. न्यासाच्या विश्वस्त मंडळींकडून कामाचे स्वरूप समजावून घेत, हळूहळू काम सुरू केले. श्री बालाजीचा अभिषेक, पद्मावती देवीचा अभिषेक, पूजा आदी कार्यक्रमाची तयारी करणे, यजमानांशी संपर्क करणे, सर्व काही व्यवस्थित होण्याकडे लक्ष देणे अशी कामे सुरू झाली. दररोज किमान 35 लोकांसाठी ‘अन्नपूर्णा कक्ष’ सज्ज ठेवणे, तेथील स्वच्छता, भांडी व्यवस्थापनाचे कार्यही केले जात असे. सुषमा यांच्या नेतृत्वात दोन्ही वेळचा चहा, नाश्ता, भोजनात वैविध्य, सकसपणा, साधेपण रुचकर भोजन तयार होत असे. तेथे काम करणाऱ्या सेवेकरी भगिनींना सुषमा यांनी अनेकविध पदार्थ करण्यास शिकवले देखील. स्वयंपाकघरातील स्वच्छता राखणे, वस्तूंची काळजी घेणे, त्या कशा जागेवर ठेवायच्या, अन्नधान्याची साठवणूक कशी करायची, धान्याची नासाडी होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यायची, असे सारेच सुषमा भगिनींना समजावून सांगत आणि प्रत्यक्ष दखवतही.
दररोज उरलेलं अन्न घंटागाडीत न जाता, तेथील परिसरात खड्डा करून खतनिर्मितीदेखील त्यांनी सुरू केली होती. दररोज जेवणासाठी तयार झालेले अन्नपदार्थ सर्वांना भोजनाच्या वेळी व्यवस्थित वाढून घेता यावे, यासाठी त्याची मांडणी टेबलवर कशी करावी, टेबल स्वच्छच असावे यासाठी सुषमा आग्रही असत. भाज्या स्वच्छ निवडणे, निगुतीने जपणूक करणे, अनेक प्रकारचे लोणची, चटण्या तयार करणे यात तर त्यांचा हातखंडा. अभिषेकावेळी मंदिरात आलेली फळे, सुकामेवा याचा विविध पदार्थांमध्ये वापर करायलाही सुषमा यांनी शिकवले. मंदिरात आलेले काहीही वाया जाऊ न देता, त्याचा प्रसाद करून सर्वांच्या मुखी लावण्याचा सुषमा यांचा आग्रह असे. स्वयंपाकघरात त्यांच्यासोबत असणाऱ्या मदतनिसांनाही त्यांनी पाककलेमध्ये तयार केले. गोशाळेतील दूध वाटप करून उरल्यास त्याचे दही लावणे, ताक करणे, लोणी कढवून तूप करणे, दूध नासले तर त्याचे पनीर तयार करणे, त्याची विक्री करणे हे सर्व काम सुषमा यांच्या देखरेखित केले जाई.
मंदिरातील समयांच्या ज्योती पेटवण्यापूव तेलात भीमसेनी कापूर घालावा, समयांच्या ज्योती कागदाने स्वच्छ केल्याने वात काळी होत नाही, तसेच काळा धूरही येत नाही, हे सेवेकरांना सांगणाऱ्या, शिकवणाऱ्या सुषमा होत्या. ‘शंकराचार्य न्यासा’च्या विश्वस्त मंडळींच्या यादीत एक तरी भगिनी असावी, असा जबरदस्त आग्रहदेखील सुषमा यांनी धरला होता. यामुळे महिलांच्या कामात सुलभता येईल, असा त्यांचा विश्वास होता.
गंगापूर गावातील तरुणींना संपर्क करून त्या मुलींना शिकविणे, घडविण्याचे कार्य सुषमा यांनी केले. यासाठी मुलींना ‘संस्कार भारती’च्या रांगोळ्या शिकवणे, फुलांच्या रांगोळ्या शिकवण्यचे कार्य त्या करीत असत. तसेच या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावे, यासाठी ‘राष्ट्र सेविका समिति’च्या सेविकांच्या सहकार्याने अभ्यास वर्गदेखील घेतला होता. कलासक्त असणाऱ्या सुषमा सर्व काम करताना, आपली आवड-छंदही जोपासत असत.
साड्या आणि ड्रेसेसवर सुंदर रंगसंगतीने नक्षीकाम करणे, ओढणीवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षी काढणे असे वेगवेगळे प्रयोगही त्या हौसेने करत. नैसर्गिक पानाफुलांचा वापर करून रेझीनच्या साहाय्याने सुंदर सुबक दागिने कानातले, गळ्यातल्याची निर्मिती त्या अत्यंत कलाकुसरीने करीत.
मंदिर व्यवस्थापन, गोशाळा व्यवस्थापन, कार्यालयीन कामकाज संपूर्ण परिसरावर देखरेख करणारे विवेक हे अविश्रांत परिश्रम करतात. ते या परिसरात आपल्या सहज संवादातून सर्वांना आपलेसे करतात, हा तर आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. मोरोपंत पिंगळे गोशाळेतील गोमातांसाठी मका लावणे, कापणी करणे असो किंवा गोमातांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांशी सहज संवाद साधणे असो, ते सतत सक्रिय असतात. डॉक्टरांशी झालेल्या त्यांच्या संवादातूनच गायीच्या आहारात गहू-ज्वारीचा भरडा आणि गूळ याचा समावेश करण्यात आला. बालाजी मंदिरात अभिषेकावेळी सेवा देणारे विवेक, तेथील काम झाले की लगेच कार्यालयात जाऊन पावतीदेखेल करतात. गणेशोत्सव, ब्रह्मोत्सव असू देत किंवा एक लाख दिवे लावणारा त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव असू दे, वाहनतळ व्यवस्थेपासून सजावटीपर्यंत, प्रसादवाटपापासून पावती करेपर्यंत सर्वत्र सुनियंत्रित करण्यासाठी विवेक प्रयत्नशील असतात. वसतिगृहातील आदिवासी पाड्यांवरील मुलांना स्तोत्र, लोक शिकवणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना शिकवणे, सेवाकार्य म्हणून आवारातील स्वच्छता करायला शिकवणे, हेपण त्यांचेच काम. प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन अशांसारख्या मदतनिसांची न्यासाच्या आवारात नेहमीच आवश्यकता असते. यासाठी विवेक यांनी गंगापूर गावातील लोकांशी परिचय करून, सगळ्यांशी सुसंवाद साधत अनेकांना जोडले आहे. कोणत्याही कार्यासाठी स्वतः पुढाकार घेणे, काम करणे, काम करवून घेणे हे सर्व ते सातत्याने चालू ठेवतात. प्रत्येक काम हे व्यवस्थितच झालं पाहिजे, ही आग्रही भूमिका असणारे विवेक आणि सुषमा यांनी अवघ्या सव्वाचार वर्षांत आपल्या कार्याने, बोलण्याने चांगलाच ठसा उमटवला.
मंदिर परिसरात अनेक प्रकारचे गुलाब, जास्वंदी, शेवंती, सोनटक्का, चाफा, अबोली अशी अनेक झाडे लावून परिसर रंगीबेरंगी आणि सुगंधी केला. तसंच फ्लॉवर, कोबी, मुळा, पालक अशांसारख्या वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करून, परिसर हिरवागार आणि समृद्ध केला. न्यासाचा बराच मोठा परिसर वापरात आणला. ‘कृतकोटी शंकराचार्य न्यासा’चे विश्वस्त आणि या विश्वस्त मंडळींच्या सहधर्मचारिणींच्यासोबत निर्माण झालेले या दोघांचे संबंध, हे रक्ताच्या नात्याच्या पलीकडचे आहेत. तसेच तेवढेच तोलामोलाचे संबंध हे न्यासाच्या आवारात असणाऱ्या प्रत्येकाशी आहेत. आपुलकीचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आहेत.
सिक्युरिटी गार्ड, गोशाळातील गोसेवक, वसतिगृहातील मुले, स्वयंपाकघरात काम करणाऱ्या भगिनी, पूजा अभिषेक करणारे पुरोहित, कोणत्याही प्रकारची सेवा देणारे सेवेकरी अशा अनेकांना त्यांनी आपलेसे केले. ‘आधी केले मग सांगितले,’ या उक्तीनुसार सर्व प्रकारच्या कामात या दोघांनी स्वतःला झोकून दिलं. पावसाळ्यात साचलेले पाणी काढण्यापासून, तर रात्री 1.30 वाजता भोजनालयातील सर्व भांडी घासण्यापर्यंत अगदी पडेल ते काम केलं.
सुरुवातीच्या काळात तर अनेक आव्हाने झेलली. त्यावेळी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तीनवेळा काम थांबवून परत जावे आपल्या घरी, असा विचारही या दोघांच्या मनात आला. पण नावातच ‘विवेक’ असणाऱ्या त्यांना सर्व कामांमध्ये सुषमा यांनी उत्तम आणि भक्कम साथ दिली. सेवेकरी म्हणून आलो आहोत; ही तर आपली परीक्षा आहे. इथे सेवा करण्याची संधी मिळत आहे, या संधीचं सोनं करू, असं म्हणून ‘पुनश्च हरि ॐ’ म्हणत कामाला सुरुवात केली . नागपूर, भाग्यनगर, बंगळुरु करत नाशिकला आले. इथे येऊन स्वतःला रुजवून, तन-मन-धनाने, समर्पित भावनेने, सेवा करणे हे निश्चितच सोपं नव्हतं. सुस्थितीत असणारा आपला कौटुंबिक परिवार मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंड बंगळुरुला स्थायिक आहेत. देशपांडे दाम्पत्याने त्यांनाही जपत इथेही मोठा सामाजिक परिवार उभा केला आहे.
गोमातापूजन, श्री बालाजी, श्री पद्मावतीची पूजा, अभिषेक उत्साहाने मनापासून आनंदाने करत, सेवा करत भगवंताचे आशीर्वाद दोघांनीही घेतले. या दोघांनी चित्रपट ‘धुरंधर’ भाग एक बघून आल्यावर भाग दोनही बघायचा, कोकण समुद्रकिनाऱ्यावर सहलीला जायचं, संक्रांतजवळ आली आल्याने देवी पद्मावतीसाठी हलव्याचे दागिने करायचे, असे दि. 28 डिसेंबर रोजी बालाजी मंदिर परिसरात धुंदुर मासाच्या कार्यक्रमाच्या दिवशी म्हणणाऱ्या, लाल काठाची काळी साडी नेसलेल्या सुषमा तेथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच आठवतात. दि. 29 डिसेंबर 2025 रोजी शुद्ध हरपलेल्या सुषमा यांना जेव्हा श्रीगुरुजी रुग्णालयात भरती केलं, तेव्हा डॉक्टरही म्हणाले, “अरे, काल तर त्यांच्याशी गप्पा मारल्या!” श्रीगुरुजी रुग्णालयातील डॉक्टर्सनी योग्य ते औषधोपचार केले. वेळोवेळी योग्य शब्दांत समजावून सांगत धीरपण देत असतात डॉक्टर. कारण डॉक्टरांनाही आशा होती. मंगळवारी, दि. 13 जानेवारी रोजी श्री पद्मावती देवीला अभिषेक झाला. भोगीच्या दिवशी श्रृंगार करताना, देवीला हलव्याचे दागिनेपण घातले गेले आणि त्याचवेळी नाशिकच्या पवित्र भूमीत सुषमा यांनी अंतिम श्वास घेतला. सर्वच सुहृदांना त्यांचं हे अचानक जाणं खूप चटका लावून गेलं. ‘तन समर्पित, मन समर्पित और अपना जीवन समर्पित’ असे जीवन जगणाऱ्या सुषमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- सुहासिनी रत्नपारखी
7588316510