देवाभाऊंचा श्रद्धेय पुढाकार; बंजारा बांधवांसाठी एकात्मिक जयकार!

01 Mar 2026 13:26:08

मानवतेच्या कल्याणासाठी शीख धर्मगुरू आणि त्यांच्या भक्त- शिष्यांनी केलेला त्याग आणि दिलेलं बलिदान, आजच्या पिढीसमोर आदर्श रूपाने प्रस्तुत करण्यासाठी, धार्मिक परिघांच्या मर्यादेत आजच्या सरकारने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. यामुळे गत काही काळ असंवादात्मक स्थितीत विखुरलेले राज्यभरातील बंजारा बांधव, पुन्हा एकदा तेवढ्याच श्रद्धेने व आत्मीयतेने शीख समाजासमोर धर्म आणि राष्ट्रहित उद्घोषक कार्यासाठी एकवले आहेत. ते निश्चितच स्तुत्य आहे.

शीखांचे नववे गुरू परमपूज्य श्री गुरू तेग बहादूर देवजी यांच्या 350व्या शहिदी दिनाचे औचित्य साधत, केंद्र सरकारने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या संकल्पनेतून, देशभरातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणी ‌‘हिंद-दी-चादर‌’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोळसपणे आणि दूरदृष्टीने घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे महाराष्ट्रात नागपूर, नांदेड आणि नवी मुंबई अशा तीन ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड मधील हजूर साहेब अबिचलनगर हे स्थान, संपूर्ण जगातील शीख बांधव आणि विशेषतः बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान आहे. ही नांदेडची नगरी दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंग साहेबजींच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झाली असून, येथे शीख धमयांचे पवित्र तक्त हजूर साहेब गुरुद्वारा आहे. आतापर्यंत नागपूर आणि नांदेड येथे संपन्न झालेल्या ‌‘हिंद-दी-चादर‌’ या कार्यक्रमात देशभरातील मोठमोठे राजकीय नेते, धार्मिक संत-महंत आणि सामान्य जनता लाखोंच्या संख्येत नतमस्तक झाली. यात बंजारा समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. शनिवार दि.28 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत हा सोहळा साजरा झाला. येथेही राज्यभरातील बंजारा बांधव लाखोंच्या संख्येत उपस्थित होते.

अनेक पंथ आणि जातींना एकत्रित करून धार्मिक कार्य करणे, हेच खरे जिवंत कार्य आहे. या कार्यक्रमांद्वारे सरकार परमपूज्य शहीद गुरू तेग बहादूर साहिबजी, भाई मतिदास, भाई सतीदास आणि महापुरुष लखीशाहच्या इतिहासाची आठवण करून देत, श्रद्धात्मक अभिवादन करत आहे. परमपूज्य गुरू तेग बहादूर साहिबजींनी, हिंदू धर्मक्षेत्रात हस्तक्षेप करणाऱ्या एका मुस्लीम निरंकुश अशा शासकाला विरोध केला. राज्यात एकच धर्म राहणे उत्तम आणि तो धर्म फक्त इस्लाम राहू शकतो, ही तेव्हा राजाज्ञा होती. राजाज्ञेच्या विरोधात जाणे म्हणजे मृत्युदंड!

मुस्लीम निरंकुश धर्मांध शासकाचा मृत्युदंड म्हणजे शरीराचे तुकडे करणे, उकळत्या पाण्यात टाकणे किंवा शरीराचे दोन तुकडे करून शिर धडापासून वेगळे करणे, गरम माती अंगावर टाकणे, हत्तीच्या पायाखाली तुडवणे, उंच पर्वतावरून फेकून देणे असेच सारे शिक्षेचे अघोरी प्रकार असत. शिक्षेचे असे प्रकार परमपूज्य गुरू तेग बहादूर साहेबजींना माहीत असतानाही त्यांनी, जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या धर्म परिवर्तनच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. 1675 मध्ये दिल्ली लाल किल्लाच्या समोर गुरुजींना फाशी देण्यात आले. उच्च ब्राह्मणकुलीन त्यांचे भक्त भाई मतिदास, भाई सतीदास आणि भाई दयालाजी (कंबोज कुलीन) यांनीही, गुरू तेग बहादूर साहिबजींबरोबर बलिदान दिलं. गुरू तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानानंतर त्यांचे पार्थिव शरीर शिक्षेच्या जागेपासून लांब घेऊन जाऊन, त्यावर अंत्यसंस्कार करणाराही आपोआपच फाशीच्या शिक्षेस पात्र! कोण हे कार्य करणार? कोणीही या कार्यासाठी तयार होणे म्हणजेच स्वतःच मरण स्वीकारण्यासारखे होते. शेवटी वीर बहादूर बंजारा भक्त लखिशा यांनी मोठ्या हिमतीने जीवाची पर्वा न करता, गुरू साहिबजींचे पार्थिव शरीर उचलून बैलगाडीत टाकले आणि आपल्या घरी नेले. सरकारी सैनिक येण्याअगोदर या वीर भक्ताने, आपले घर स्वतःच आगीच्या स्वाधीन करून टाकले. अशा प्रकारे गुरू साहिबजींवर अंत्यसंस्कार केले गेले. दिल्लीत त्या पावन जागेवर आज पवित्र रकाबगंज साहेब गुरुद्वारा आहे. या घटनेपासूनच शीख आणि बंजारा बांधवांचे संबंध अधिक वृद्धिंगत झाले. जगभरातील सर्व शीख बांधवांसह समस्त बंजारावृंद आज रकाबगंज साहेब गुरुद्वाराचे दर्शन घेत असतात. भाई मतिदास, भाई सतीदास आणि भाई दयालाजींच्या समाधींचेही दर्शनही, सर्व शीख बांधव व बंजारा बांधव अत्यंत आदराने घेतात.

महाराष्ट्रातील या सोहळ्यांमुळे, राज्यभरातील सकल बंजारा बांधव एकवटण्यास मोठीच मदत झाली आहे. यासाठी ‌‘राष्ट्रीय बंजारा परिषदे‌’च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नागपूर, नांदेड आणि आता नवी मुंबईच्या सोहळ्यासाठी स्वतःला तन-मनाने सर्वस्वी झोकून दिले. देवाभाऊंच्या दूरदृष्टीचा हा सफल परिपाकच आहे. चाकोरीबद्ध कृती आणि विचारसरणीच्या एक पाऊल पुढे येऊन विद्यमान सरकार धार्मिक भावना, आस्था आणि भारतीय संस्कृतीचे रक्षण करत आहे. धर्माचा भाग सार्वजनिक जीवनाशी निगडित असतो. त्याचा धार्मिक आशय कमी करणे, म्हणजे राष्ट्रीय एकतेकडे वाटचाल करणे होय. गुरू साहिबांचे उपदेश एका समाजापेक्षा अन्य समाजांपर्यंत पोहोचवित, राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे कार्य निश्चितच स्तुत्य आहे.

- डॉ. मोहन चव्हाण
(लेखक ‌‘राष्ट्रीय बंजारा परिषदे‌’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)


Powered By Sangraha 9.0