गोष्टी ‌‘बांबूच्या पडद्या‌’च्या आणि ‌‘पोलादी पडद्या‌’च्या!

01 Mar 2026 12:18:40

जगामध्ये साम्यवाद, भांडवलशाही व्यवस्था यांच्यातील हाडवैर प्रसिद्ध आहे. पुढे या वैराचे रूपांतर जागतिक संघर्षात झाले. त्यातूनच अनेक महायुद्धे जगाला पाहायला मिळाली. या सगळ्यामध्ये चीन आणि रशिया हे दोन देश साम्यवादी देश म्हणून कायम राहिले. सध्या रशियाची अवस्था बिकट असली, तरी चीन मात्र त्याचे अस्तित्व राखून आहे. सध्या हाच चीन पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून नव्या स्वप्नांचे बीजारोपण करण्याचा विचार करतो आहे. या पार्श्वभूमीवर साम्यवादाच्या जागतिक प्रवासाचा घेतलेला मागोवा...

सध्या बांबूच्या पडद्याआड म्हणजेच चीनमध्ये बरेच काही घडते आहे, किंवा घडू घातले आहे. दि. 4 मार्च ते दि. 11 मार्च 2026 या कालावधीत, चीनमध्ये ‌‘टू सेशन्स‌’ नामक जंगी राजकीय बैठक होत आहे. या बैठकीत चीन सरकार आपली 15वी पंचवार्षिक योजना (सन 2026 ते 2030) सादर करणार असून, संपूर्ण जगावर तांत्रिक सार्वभौमत्व (टेक्निकल सॉव्हरिंटी) मिळवण्याची चीनची महत्त्वाकांक्षा त्यात उघडपणे मांडण्यात येणार आहे. तसेच चीन-जपान आणि चीन-तैवान यांच्यातील तणाव अगदी कळसाला पोहोचला असून, चीन केव्हाही तैवानवर सैनिकी आक्रमण करण्याची शक्यता दिसते आहे. त्याचवेळी आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून, चीनने आपल्या सैन्यातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचीही हकालपट्टी केली आहे. त्यावरूनच चीनविषयक निरीक्षकांना असे वाटत आहे की, बांबूच्या पडद्याआड बरेच काही घडते आहे, घडणार आहे.

चिनी साम्यवादी सरकारच्या आत्यंतिक गुप्ततेच्या धोरणाला ‌‘बांबूचा पडदा‌’ असे म्हटले गेले. कारण मुळात सोव्हिएत साम्यवादी सरकारच्या अशाच आत्यंतिक गुप्तता बाळगण्याला ‌‘पोलादी पडदा‌’ असे म्हटले गेले. दि. 5 मार्च 1946 या दिवशी दस्तुरखुद्द विन्स्टन चर्चिल यांनी, “सोव्हिएत रशियामुळे युरोपचे दोन तुकडे झालेले असून, त्यांच्या दरम्यान एक ‌‘पोलादी पडदा‌’ उभा राहिला आहे,” असे उद्गार काढले होते. या घटनेला यंदा 80 वर्षे पूर्ण होत आहेत. ‌‘पोलादी पडदा‌’ आता कोसळला आहे; पण ‌‘बांबूचा पडदा‌’ अजून शाबूत आहे.

चर्चिल यांचे हे शब्द, त्यांचे भाषण या सगळ्याचा संबंध एकंदर जगाच्या गेल्या दीड-दोनशे वर्षांच्या इतिहासाशी जाऊन पोहोचतो. त्यामुळे भविष्यातील घटनांचा वेध घेताना, अशा भाषणांचा पुनःपुन्हा विचार करावा लागतो.

सन 1588 मध्ये 16व्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडने स्पेनचा निर्णायक आरमारी पराभव करून, युरोपवर वर्चस्व स्थापन केले. पुढच्या शतकात ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात चुरस सुरू राहिली. दोघांनीही आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेत मनसोक्त मुलुखगिरी केली. पण, त्याच शतकात त्यांना एक तगडा प्रतिस्पध निर्माण झाला, तो म्हणजे रशिया. अफाट मुलूख आणि अमाप लोकसंख्या असलेला रशिया हा एक मागास देश होता पण, पीटर या राजाने रशियाला अत्याधुनिक बनवण्याचा चंग बांधून, ते काम जवळपास पूर्ण केले. रशिया नाविक बळात ब्रिटन-फ्रान्सच्या पासंगालाही पुरत नसला, तरी त्याचे लष्करी संख्याबळ प्रचंड होते. रशियालाही आपले साम्राज्य उभारण्याची लालसा होतीच. इथून ब्रिटन आणि रशिया यांच्यातली स्पर्धा सुरू झाली.

त्याच्या पुढच्या म्हणजे 18व्या शतकात रशियाने आपले साम्राज्य चौफेर वाढवले; फ्रान्सने आशिया-आफ्रिकेत अनेक देश गिळले; तर ब्रिटनने हिंदुस्थान जवळजवळ जिंकला. पण, त्याच शतकाच्या अखेरच्या कालखंडात ब्रिटनने अमेरिका गमावली. ब्रिटनविरुद्ध क्रांती करून अमेरिका स्वतंत्र राष्ट्र बनली; तर फ्रान्समध्ये राजसत्ताक पद्धतीविरुद्ध जनक्रांती होऊन, फ्रान्स मुळापासून हादरून निघाला. पुढच्या म्हणजे 19व्या शतकात ब्रिटनने फ्रान्सचा निकाल लावला; हिंदुस्थान पूर्णपणे जिंकला आणि आपण जगातली एकमेव महासत्ता आहोत, हे सिद्ध केले. रशियाला हे बघवत नव्हतेच. शिवाय, युरोपातही एक नवी प्रबळ सत्ता उदयाला आली. प्रिन्स बिस्मार्क या नेत्याने प्रशिया व अनेक लहान-मोठी जर्मन संस्थाने, यांना ‌‘जर्मनी‌’ या नावाने एकत्र केले. 19व्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात या नवोदित जर्मन राष्ट्राने, पहिल्याच दणक्यात फ्रान्सला आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावली. म्हणजे आता ब्रिटनला रशियाबरोबरच ‌‘जर्मनी‌’ हा नवा प्रतिस्पध निर्माण झाला.

याच शतकात राजकारणावर प्रभाव पाडणारा एक नवा भिडू रिंगणात उतरला; तो म्हणजे औद्योगिक क्रांतीमुळे एकदम प्रचंड भरभराटलेला व्यापार. औद्योगिक क्रांतीमुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे सर्वच क्षेत्रांतील उत्पादन क्षमता व उत्पादन यांच्यात वाढ झाली. सहाजिकच व्यापार वाढला. आतापर्यंत कोणत्याही देशात व्यापारउदीम हा एक महत्त्वपूर्ण महसूल मार्ग असला, तरी व्यापाऱ्यांनी राजकारणावर वर्चस्व गाजवावे असे कधीच, कुठेही घडले नव्हते. पण, आता तो काळ सुरू झाला. नुसता व्यापारी नव्हे, तर भांडवलदार हा एक नवाच प्रभावी वर्ग उदयाला आला आणि तो राजकारणावर प्रभावही टाकू लागला. सामाजिक क्षेत्रात तर भांडवलदार मंडळींनी पूवच्या जुलमी राजे आणि सरदारांचीच भूमिका वठवायला सुरुवात केली. कमीत-कमी मोबदल्यात अधिकाधिक उत्पादन करवून घेण्यासाठी, ते सर्वसामान्य कामगारांना पिळून काढू लागले.

या विरुद्धची चळवळ इंग्लंडमध्येच, म्हणजे सगळ्यात मोठ्या व्यापारी देशातच सुरू झाली. ती चळवळ म्हणजेच ‌‘समाजवाद‌’. ‌‘असोसिएशन ऑफ क्लासेस ऑफ ऑल नेशन्स‌’ या संघटनेने सन 1833 साली, इंग्लंडमध्ये समाजवादी विचारांचा उद्घोष केला. ‌‘पुअर मॅन्स गार्डियन‌’ या मासिकाने, त्या विचारसरणीला ‌‘सोशालिझम‌’ म्हणजे ‌‘समाजवाद‌’ असे नाव दिले. सन 1845 साली ब्रुसेल्स इथे भरलेल्या ‌‘जर्मन वर्किंगमेन्स असोसिएशन‌’मध्ये, कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी एका जाहीरनाम्याद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजवादाचा उद्घोष केला. हाच तो प्रख्यात ‌‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो‌’.

संपूर्ण युरोपभर; इतकेच नव्हे, तर अटलांटिक समुद्रापार असलेल्या अमेरिकेतही समाजवादी विचारसरणीने असंख्य लोक भारावून गेले. त्यांनी आपापल्या देशात समाजवादी राजकीय पक्ष स्थापन करून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न केले. पण, या पक्षांना एका मर्यादेपर्यंतच यश मिळाले. प्रत्यक्ष सत्ता तर कुठेच मिळाली नाही. पुढच्या काळात या समाजवादी विचारसरणीतूनच ‌‘साम्यवाद‌’ ही अधिक कडवी विचारसरणी निर्माण झाली पण, तिचे यशही मर्यादितच राहिले.

अशा स्थितीत 20वे शतक उजाडले आणि त्याच्या सुरुवातीच्या काळातच, युरोपात प्रचंड महायुद्ध पेटले. जर्मनी इतका प्रबळ झाला की, पश्चिमेकडे फ्रान्सचे कंबरडे एका तडाख्यात मोडून त्याने, पूर्वेकडच्या विशाल रशियावर बेगुमानपणे आक्रमण केले. एकाच वेळी दोन्ही आघाड्या पेटवल्या. एवढेच नव्हे, तर लगातार विजयी आगेकूचही सुरू केली. जर्मनीची मुसंडी कशी रोखावी, हे रशियन सम्राट झार निकोलस याला समजेचना.

हीच संधी साधून, रशियातल्या लेनिन आणि ट्रॉटस्की यांच्या साम्यवादी पक्षाने एकदम क्रांती केली. झारला उलथून सत्ता बळकावली. आता रशियात समाजवादी-साम्यवादी समाजव्यवस्था लागू करण्यात आली. समाजवादी विचारसरणीला प्रथमच राजाश्रय मिळाला. या राज्याचे वर्णन ‌‘श्रमिकांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, शोषित-पीडितांचे राज्य‌’ अशा शब्दांत केले गेले. शिवाय, ही राज्यव्यवस्था अत्यंत कल्याणकारी सिद्ध होत आहे, असा जोरदार प्रचारही केला गेला. त्यामुळे जगभरचे विचारवंत अक्षरशः झपाटून गेले.

परंतु, हे खरे नाही, हे लवकरच शहाण्या लोकांना कळून चुकले आणि विन्स्टन चर्चिल हे अशा शहाण्या लोकांपैकीच एक होते. चर्चिल हे प्रभावी वक्ते आणि उत्कृष्ट संसदपटू होते. त्यामुळे संसदेमधील आपल्या भाषणांमध्ये कधी खुसखुशीत नर्मविनोदाने ते समाजवाद्यांची रेवडी उडवत; तर कधी घणाघाती शब्दप्रयोग करीत त्यांच्यावर तुटूनही पडत. साम्यवाद्यांना तर ते मोजीतच नसत.

असे असूनही मे 1940 मध्ये पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जेव्हा आपले मंत्रिमंडळ बनवले, तेव्हा त्यात मजूरपक्षीय म्हणजे समाजवादी मंत्रीही घेतले. कारण ते चर्चिल यांच्या हुजूर पक्षाचेच फक्त मंत्रिमंडळ नसून, सर्वपक्षीय मंत्रिमंडळ होते. या सर्वांनी युद्धकाळात एकदिलाने काम करून, ब्रिटनला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. हा विजय चर्चिल यांच्या खंबीर आणि कणखर नेतृत्वाचा तर होताच;पण त्यांना तशीच साथ देणाऱ्या सर्वपक्षीय सहकाऱ्यांचाही होता.

परंतु, हा विजय ‌‘एनकॅश‌’ करण्यासाठी, चर्चिलनी नव्याने निवडणुकांना सामोरे जायचे ठरवले आणि मजूर पक्षावर जबरदस्त टीका सुरू केली. ब्रिटिश समाजवादी हे रशियाप्रमाणेच इथेही सर्वंकष बोल्शेव्हिक सत्ता लागू करू पाहत आहेत, असा हल्ला त्यांनी चढवला.

प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र चमत्कार घडला. चर्चिलचा हुजूर पक्ष चक्क पराभूत झाला आणि समाजवादी मजूर पक्ष सत्तेवर आला. संपूर्ण जगच आश्चर्याने थक्क झाले. सर्वात कुंठित अवस्था झाली ती अमेरिकेची. मुख्यतः चर्चिल यांच्या अथक प्रयत्नांमुळे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी अमेरिकेला युद्धात उतरवले होते. आता रूझवेल्ट मरण पावले होते आणि हिटलरचा पराभव झाला असला, तरी त्याच्याच इतकी आसुरी महत्त्वाकांक्षा बाळगून असलेला स्टॅलिन जगाला भेडसावत होता. साम्यवादी विचारांच्या आडोशाने संपूर्ण जगावर रशियन साम्राज्य पसरवू पहात होता. अर्धा युरोप तर त्याने गिळलाच होता, आणि त्याला पुरून उरण्याची क्षमता बाळगून असलेला एकमेव माणूस- चर्चिल- सत्तेवरून बाजूला झाला होता.
अशा त्या स्थितीत चर्चिल यांनी अमेरिकेचा दौरा केला. दि. 5 मार्च 1946 या दिवशी फुल्टन इथल्या भाषणात त्यांनी, रशियन ‌‘आयर्न कर्टन‌’ने उभ्या केलेल्या आव्हानाचा जाहीर उच्चार करून; या आव्हानाविरुद्ध ब्रिटन, अमेरिका आणि सर्व राष्ट्रकुल देशांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. जगाचे स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्था आणि शांती यासाठी आपण अधिक शक्तिसंपन्न झाले पाहिजे; रशियाला शक्तीचीच भाषा कळते, हा सूर त्यांनी दौऱ्यातील सर्व भाषणांमध्ये कायम ठेवला.

तेव्हापासून सोव्हिएत रशियाला ‌‘पोलादी पडदावाला देश‌’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. पुढे 1949 साली माओने चीनमध्ये क्रांती घडवून, साम्यवादी शासन सुरू केले. तेव्हापासून चीनला ‌‘बांबूचा पडदावाला देश‌’ असा शब्दप्रयोग सुरू झाला. आता ‌‘पोलादी पडदा‌’ इतिहासजमा झाला आहे. ‌‘बांबूचा पडदा‌’ थोडासा विरविरीत झाला आहे; पण संपलेला नाही.

- मल्हार कृष्ण गोखले

Powered By Sangraha 9.0