चलो अयोध्या...

01 Mar 2026 13:10:34

‘भारत रंग महोत्सव‌’ हा जगातील सर्वांत मोठ्या नाट्यमहोत्सवांपैकी एक मानला जाणारा हा महोत्सव. सांस्कृतिक मंत्रालय आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 25व्या भारत रंग महोत्सवात, ‌‘सियावर रामचंद्र की जय‌’ या बालमहानाट्याचा दिमाखदार प्रयोग नुकताच संपन्न झाला. देशविदेशांतून सुमारे दोन हजार कलाकृतींनी या महोत्सवासाठी अर्ज केले होते. त्यांपैकी निवडक 218 कलाकृतींना या नाट्यमहाकुंभात स्थान मिळालं. त्या निवडक कलाकृतींपैकी एकमेव बालमहानाट्य म्हणून ‌‘सियावर रामचंद्र की जय‌’ची निवड होणं, ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली. 75 बालकलाकार आणि 25 प्रौढ बॅकस्टेज कलाकार असा 100 जणांचा भव्य ताफा घेऊन, ‌‘राधिका क्रिएशन्स‌’ पुण्याहून दिल्लीला रवाना झालं.

राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या रंगमंचावर नाटक सादर करणं, हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. त्या पवित्र रंगभूमीवर बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. प्रयोग इतका देखणा, प्रभावी आणि अविस्मरणीय ठरला की, प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. एका भावूक प्रेक्षकाने प्रयोग संपताच ‌‘हा प्रयोग अयोध्येत व्हायलाच हवा,‌’ अशी घोषणादेखील केली! एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगाची हमी मिळणं, यापेक्षा मोठं यश काय असू शकतं! या महानाट्याचा पहिला प्रयोग तीन वर्षांपूव बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे ‌‘हाऊसफुल‌’ गदत पार पडला होता. दिल्लीतील हा आठवा प्रयोग ठरला आणि आता नववा प्रयोग अयोध्येत दिवाळीत साजरा होणार आहे. बालकलाकारांची इच्छा आहे की, हे नाटक केवळ अयोध्या किंवा दिल्लीपुरते मर्यादित न राहता, देशाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत आणि विदेशांतही पोहोचावं.

‌‘सियावर रामचंद्र की जय‌’ या बालमहानाट्याने मुलांना केवळ रंगमंचच दिला नाही, तर जीवनाचा व्यापक दृष्टिकोनही दिला. प्रभू श्रीरामांच्या आदर्श जीवनकथेच्या माध्यमातून मुलांनी आपला वैभवशाली इतिहास जाणून घेतला. अभिनय, संवाद, नृत्य, संगीत आणि शिस्त यांचा संगम अनुभवला. प्रेक्षकांची दाद, टाळ्या, कौतुकाची थाप या सर्वांनीच त्यांचा आत्मविश्वास दुणावला. नाटकाच्या प्रक्रियेतून त्यांच्यात प्रभावी संवादकौशल्ये, सर्जनशीलता, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित झाले आणि मोठी स्वप्नं पाहण्याची हिंमतदेखील त्यांना मिळाली.

पहिल्या प्रयोगावेळी उच्चारलेलं वाक्य होतं, “हे नाटक गल्लोगल्ली, गावोगावी, अयोध्येहून दिल्लीपर्यंत पोहोचो!” नियतीने जणू त्या वाक्याला आशीर्वाद दिला. गल्लोगल्ली प्रवास करण्याआधीच या नाटकाने थेट दिल्ली गाठली आणि आता अयोध्येचा मार्ग देखील खुला झाला आहे. दिल्ली ते पुणे असा हा विलक्षण प्रवास 75 मुलांनी आणि 25 बॅकस्टेज कलाकारांनी एकत्रितपणे पार पाडला. एवढ्या मोठ्या ताफ्याची व्यवस्था प्रवास, निवास, भोजन, तालमी, शिस्त हे सर्व सांभाळणं, ही मोठीच जबाबदारी. परंतु, संघभावना, समर्पण आणि कलाप्रेम यांच्या बळावरच सर्व अडचणींवर मात करण्यात आली. आज ‌‘सियावर रामचंद्र की जय‌’ ही संस्कार, इतिहास आणि कला यांचा संगम घडवणारी ही ‌‘रंगयात्रा‌’ आता अयोध्येकडे निघाली आहे.

चलो अयोध्या!

बालस्वप्नांच्या पंखांना नवी दिशा देत, श्रीरामकथेचा संदेश घेऊन ही रंगयात्रा पुढे चालली आहे. या संपूर्ण प्रवासात बालकलाकारांचं कौतुक करावं, तेवढं थोडंच. प्रत्येकाने स्वतःची तब्येत सांभाळली, एकमेकांची काळजी घेतली आणि जणू आपण प्रभू श्रीरामांचं कार्य पूर्ण करण्यासाठी, सीतेला अयोध्येत परत आणण्यासाठी निघालेल्या एका पवित्र मोहिमेवर आहोत, अशा भावनेने दिल्ली गाठली. त्या भावनेतूनच त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. कोणाची भूमिका खारुताईची असो, कोणाची वानराची असो किंवा एखाद्या प्रमुख पात्राची, प्रत्येकाने आपापलं कार्य अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने पार पाडलं.

या संपूर्ण उपक्रमाचा खर्च मोठा होता. लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून माझ्या खांद्यावर प्रचंड जबाबदारी होती. 2 तास, 12 मिनिटांचं दोन अंकी भव्य बालमहानाट्य देशाच्या राजधानीत जगप्रसिद्ध ‌‘भारत रंग महोत्सवा‌’सारख्या नामवंत महोत्सवात सादर करणं, ही कल्पनाच एखाद्याला दडपण आणणारी होती. परंतु, आम्ही दडपणाला बळी पडलो नाही. अथक परिश्रम केले. दिलेल्या संधीला न्याय देण्याचा निर्धार केला. बालरंगभूमीला एक उंची देणं, तिला वैभव प्रदान करणं आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक उंचावणं, हे ध्येय समोर ठेवूनच पुण्यातील या छोट्या कलाकारांनी मोठ्या धैर्याने काम पूर्ण केलं. बालरंगभूमीवर काम करताना नकळत माणूस घडवण्याचं कार्यही घडतं. अभिनय शिकताना मुलांमध्ये संवादकौशल्ये, आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्व आणि संवेदनशीलता विकसित होते. हीच खरी कमाई आहे. कलाकार, लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती म्हणून माझ्याही अपेक्षा आता द्विगुणित झाल्या आहेत. मोठी स्वप्नं पाहण्याची सुरुवात आम्ही केली आणि ती पूर्ण करण्यासाठी, प्रयत्नांची पराकाष्ठाही करणार आहोत. गेल्या वर्षभर चाललेली ही लेखमाला येथे संपत आहे. बालरंगभूमीबद्दल मनमोकळेपणाने भरभरून लिहिता आलं; तुम्ही ते प्रेमाने वाचलंत, यासाठी मी प्रभू श्रीराम, गणपती बाप्पा आणि नटराज यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

मागील 51 लेखांमधून मी बालरंगभूमीची ओळख करून दिली; तिच्यासमोरील समस्या मांडल्या, उपाय सूचवले आणि विविध उपक्रमांचा बालकलाकारांवर होणारा परिणामही मांडला. या वर्षभरात बालरंगभूमीच्या विविध पैलूंवर लिखाण झालं, जसं की, बालनाट्याचा विषय कसा असावा (चिऊ बाळाची गोष्ट), ‌‘षटकोन‌’ नावाचा बालएकांकिका महोत्सव, बालकलाकार आणि त्यांचे पालक, ‌‘रॅडी‌’ म्हणजे मी-म्हणजे नाट्यशिक्षिका, ‌‘कोणी घर देता का घर‌’ म्हणजेच बालनाट्याला जागेचा अभाव, मायबाप रसिक प्रेक्षकांबद्दल, संगीतनाटक संगीत ‌‘सियावर रामचंद्र की जय‌’, ‌‘सियावर रामचंद्र की जय‌’ बालमहानाट्य, बालनाट्य आणि भाषा संस्कार, बालरंगभूमी आणि युद्धभूमी, शंखनाद आणि नाटकाची तिसरी घंटा यांच्यातलं साम्य, मुलांनी लिहून बसवलेलं नाटक, बालरंगभूमी एक सुपीक जमीन, जिथे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, बालकलाकारांच्या मते, थिएटर टुरिझम, ‌‘टीरा‌’ नाटकातल्या कलाकारांविषयी, एक नायक दोन खलनायक आणि स्टार कलाकार, ज्यात सातत्याने बालनाट्यात काम करणाऱ्या काही कलाकारांची ओळख करून दिली, बोरन्हाण नावाचं इंप्रोव्हायझेशन, ‌‘हू ॲम आय‌’ म्हणजेच स्वतःची ओळख, व्यक्तिचित्रण, भावनांची अभिव्यक्ती, तालीम, रंगीत तालीम आणि नाट्यप्रयोग, बालनाट्य आणि त्याची प्रक्रिया, नाट्यवेद, आमचा दिवस (बालकदिन), बालनाट्य आणि तारखा मिळण्यात होणारा संघर्ष, बालनाट्याला शास्त्रीय आधार, थिएटर ‌‘एक्स‌’ नावाचा आगळावेगळा नाट्यप्रयोग, एजेंटिक ‌‘एआय‌’ ते अजेंडिक नाटक, पुण्याच्या चमूचं दिल्लीत नाटक, वाचिक अभिनय, रंग, वेश आणि कल्पनांचा जादूई अवकाश, ऑनलाईन नाट्यप्रयोग, आवाजाची भाषा, संगीत राजे शिवबा, राजे शिवबांची बिनविरोध निवड, मार्व्हलस मिस्टर मार्बल आणि राजे शिवबा बालमहानाट्य इत्यादि. या संवादातून बालरंगभूमीचं महत्त्व पटवून देता आलं, याच समाधान आहे.

अजून बरेच प्रयोग करायचे आहेत, अनेक संकल्पना साकारायच्या आहेत. लेखन जरी येथे थांबत असलं, तरी लेखणी मात्र माझ्या हातात कायम राहणार आहे. बोलण्यासाठी, सांगण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आणि पुन्हा तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी काम करत राहीन. तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास माझा ईमेल आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहे, तोपर्यंत माझा निरोप स्वीकारा. माझा रामराम घ्या, धन्यवाद.

- रानी राधिका देशपांडे
7767931123
(सदर समाप्त)
raneeonstage@gmail.com

Powered By Sangraha 9.0