कासवांना संशोधनाची जोड

09 Feb 2026 13:14:27

दोन दशकांहून अधिक काळ कोकणात सागरी कासव संवर्धनाला बळकटी देण्यात आली. मात्र, त्याला संशोधनाची जोड नव्हती. परंतु, गेल्या पाच वर्षांमध्ये कोकणातील सागरी संवर्धनकामाला विविधांगी पद्धतीने शास्त्रीय आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन राबविण्यात येणाऱ्या संशोधनकामाची जोड मिळाली आहे. त्याचा मागोवा घेणारा हा लेख...

समुद्री कासवे हे आपल्या महासागरांचे प्राचीन रक्षक आहेत. सागरी परिसंस्थेचे संतुलन राखण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. 1981 ते 2021 या कालावधीतील सागरी कासवांच्या बाबतीत राज्यात नेमके काय घडले, हे प्राची हटकर आणि इतर संशोधकांनी 2023 मध्ये एका पुनरावलोकन शोधनिबंधाद्वारे प्रकाशित केले. या अभ्यासाने अरबी समुद्रात ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्सबिल, लॉगरहेड आणि लेदरबॅक या पाच प्रजाती आढळत असल्याचे समोर आले. यांपैकी ऑलिव्ह रिडले ही सर्वाधिक दिसणारी प्रजात असून ती कोकणात वीण करते. संशोधनाने समुद्री कासवांचे मृतदेह किनाऱ्यावर वाहून येणाच्या (स्टॅण्डिंग) प्रसंगांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवली. 2017 ते 2021 या कालावधीत, महाराष्ट्रात अशा प्रसंगांची वारंवारता जास्त होती. 2018 (62 प्रसंग) आणि 2020 (59 प्रसंग) मध्ये विशेष वाढ दिसून आली. चिखले, निवती, चिंचणी आणि जुहू ही स्टॅण्डिंगचे विशिष्ट हॉटस्पॉट्स आहेत, असे या अभ्यासातून दिसून आले. तसेच या अभ्यासात महाराष्ट्रातील समुद्री कासवांसाठी प्राथमिक धोके हे मोठ्या प्रमाणात मानवनिर्मित असल्याचे आढळले. गिलनेट्स आणि ट्रॉल नेट्ससारख्या मासेमारी जाळ्यांमध्ये अडकणे (बायकॅच) हे सागरी कासवांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण असल्याचे समोर आले. तसेच या पुनरावलोकन लेखामध्ये आणखी काही बाबी नमूद करण्यात आल्या होत्या. जसे की टर्टल एक्सक्लूडर डिव्हाईस (टीईडी) अजूनही मच्छीमारी बोटींमध्ये व्यापकपणे वापरले जात नाही.

2026 मध्ये आज आपण जेव्हा कोकणच्या किनारपट्टीवर कासवांच्या यशस्वी संवर्धनाबद्दल बोलतो, तेव्हा दि. 27 ऑक्टोबर 2020 हा दिवस विसरून चालणार नाही. याच दिवशी ‌‘मँग्रोव्ह फाऊंडेशन‌’च्या वार्षिक बैठकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच सागरी कासवांना ‌’सॅटलाईट टॅग‌’ लावून त्यांच्या प्रवासाचा अभ्यास करण्याच्या ऐतिहासिक प्रकल्पास मान्यता देण्यात आली होती. त्या निर्णयाने काय बदलले, तर या तंत्रज्ञानामुळे अरबी समुद्रातील कासवांच्या 14 महिन्यांच्या स्थलांतराचे गुपिते उलगडण्यास मदत झाली. दि. 25 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पहिल्यांदाच सागरी कासवांना ‌‘सॅटलाईट ट्रान्समीटर‌’ लावण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. कासवांच्या पाठीवर बसवलेल्या 400 ग्रॅमच्या यंत्राद्वारे त्यांच्या स्थलांतर मार्गांची, खाद्याच्या जागांची आणि अधिवासाची 500 दिवस इत्थंभूत माहिती मिळवण्यात येईल अशी अपेक्षा होती. परंतु, दि. 5 जून 2022 पर्यंत सावनी नामक टॅग केलेल्या मादी कासवाने 1 हजार, 960 किमी अंतर पार केले आणि तिचे सिग्नल बंद झाले. कर्नाटकजवळ कुमटा येथे तिची शेवटची नोंद झाली. तर याच्या काही दिवस आधी प्रथमा नामक टॅग केलेल्या मादीचेदेखील सिग्नल मिळणे बंद झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीपासून गुजरातच्या सागरी क्षेत्रात प्रवेश करून प्रथमा परतीचा प्रवास करत पुन्हा आपल्या राज्यात आली होती. तिची शेवटची नोंद सिंधुदुर्ग जवळील कुणकेश्वर येथे करण्यात आली. अशा पद्धतीने 2021-22 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सात कासवांना सॅटलाईट टॅग बसवण्यात आले होते. या सॅटलाईट माहितीमुळे कासवे खोल समुद्रात कोठे जातात, याचा अंदाज आला. मात्र, हे महागडे सॅटलाईट टॅग काही महिन्यांतच अकार्यान्वित झाले. त्यामुळे संशोधकांनी आपली रणनीती बदलली.

नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) आणि ‌‘कांदळवन प्रतिष्ठान‌’ने कोकणात 500 कासवांना ‌‘फ्लिपर टॅगिंग‌’ करण्याची एक मोठी मोहीम हाती घेतली. कासवांच्या पाठीवर सॅटलाईट टॅग लावण्याऐवजी, त्यांच्या ‌’फ्लिपर‌’वर (परांवर) सांकेतिक क्रमांकाची धातूची पट्टी बसवण्यात आली. यालाच ‌‘फ्लिपर टॅगिंग‌’ म्हणतात. गुहागर, आंजर्ले, वेळास या तीन प्रमुख किनाऱ्यांवर पहिल्या टप्प्यात 62 कासवांना हे टॅग लावण्यात आले. जरी हे टॅग सॅटलाईटप्रमाणे दररोजची लोकेशन देत नसले, तरी कासव किती वर्षांनंतर पुन्हा येते आणि कोणत्या प्रदेशातून प्रवास करते, याची लाईफटाईम नोंद ठेवते. अशी फ्लिपर टॅग लावलेली कासवे यंदा पुन्हा आपल्या हक्काच्या ‌‘माहेरघरी‌’ म्हणजेच गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी परतली. यातून हे सिद्ध झाले की, ही कासवे हजारो मैलांचा प्रवास करूनही आपल्या विणीसाठी ठरावीक किनाऱ्यावरच परततात.

या मोहिमेमुळे हे स्पष्ट झाले की, अरबी समुद्रात कितीही लांबवर प्रवास केला, तरी ही कासवे आपल्या मूळ अधिवासात परततात. 2026 मध्ये या माहेरवाशिणींच्या पुनरागमनामुळे आपल्या संवर्धन प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे. गुहागरच्या किनाऱ्याने दिलेला हा पुरावा सागरी संशोधनातील खऱ्या अर्थाने एक सुवर्णक्षण ठरला आहे.

नोव्हेंबर 2025 मध्ये डहाणूमध्ये पहिल्यांदाच समुद्री कासवाचे सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले. या एका प्रयोगामुळे उत्तर कोकणातील कासवे अंडी घातल्यानंतर नेमकी कुठे जातात आणि त्यांचा समुद्री मार्ग कोणता, हे अनेक वर्षांपासूनचे गुपित अखेर जगासमोर आले. या सॅटेलाईट टॅगिंगद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, डहाणूच्या किनाऱ्यावरील कासवे उत्तर अरबी समुद्राच्या दिशेने आणि गुजरात किनारपट्टीच्या समांतर प्रवास करत असल्याचे दिसून आले. 2021-22 मध्ये प्रथमा आणि सावनी या कासवांनी दक्षिण कोकणचा नकाशा उलगडला होता, तर 2025 मधील डहाणूच्या धवललक्ष्मी या कासवाने उत्तर कोकणातील समुद्री अधिवासाची माहिती दिली. आज फेब्रुवारी 2026 मध्ये जेव्हा आपण कोकणच्या किनारपट्टीवर कासवांच्या संवर्धनाचे यश साजरे करत आहोत. समुद्री कासवे आणि इतर मोठे समुद्री प्राणी ज्याना संशोधक मंडळी ‌‘मरीन मेगा फाऊना‌’ म्हणतात (समुद्री कासव, समुद्री पक्षी, व्हेल आणि डॉल्फिन, व्हेल शार्क इत्यादि) त्या सागरी अधिवासात एकमेकांवर कसा परिणाम करतात आणि त्याबाबत आपल्या राज्यात कशी परिस्थिती आहे, हे पुढच्या लेखात जाणून घेऊया.

- प्रदीप चोगले

Powered By Sangraha 9.0