सिंधुदुर्गातील व्याघ्र प्रजननाच्या मुळावर 'रिअल इस्टेट'; तिलारीत होणार हा प्रकल्प

09 Feb 2026 16:33:11

 

sindhudurg tiger
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्गातील तिलारी संवर्धन राखीवच्या खोऱ्यात 'रिअल इस्टेट'चे खासगी प्रकल्प प्रस्तावित होत आहेत (sindhudurg tiger). फार्म हाऊस प्लाॅटिंगचे हे प्रकल्प सह्याद्रीतील एकमेव व्याघ्र प्रजननाचे नैसर्गिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलारी संवर्धन राखीवच्या मुळावर उठणार असल्याचे मत स्थानिक वन्यजीव अभ्यासकांनी मांडले आहे (sindhudurg tiger). महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पाच्या ठिकाणीच सिंधुदुर्ग वन विभागाला नुकतेच व्याघ्र प्रजननाचे पुरावे मिळाले आहेत. (sindhudurg tiger)

 

 

महाराष्ट्राच्या सह्याद्रीतील वाघांचे नैसर्गिक प्रजनन केंद्र म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरण खोऱ्याला ओळखले जाते. म्हणूनच या क्षेत्राच्या संवर्धनासाठी २०२० साली या परिसराला तिलारी संवर्धन राखीवचा दर्जा देण्यात आला. मात्र, आता संवर्धन राखीव क्षेत्राला लागूनच 'रिअल इस्टेट'चे खासगी प्रकल्प रेटले जात आहेत. संवर्धन राखीव क्षेत्राला लागून असलेल्या खासगी जमिनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधणीसाठी प्लाॅटिंग करण्यात येत असून त्यासंबंधीच्या अनेक जाहिराती जिल्ह्यात झळकवण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजेच याच ठिकाणी वन विभागाला व्याघ्र प्रजननाचे पुरावे मिळत आहेत. सध्या तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रातील पाट्ये नियतक्षेत्राला लागूनच साधारण हजार एकर जागेवर फार्म हाऊस प्लाॅटिंगचा एक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्ह्यात त्याच्या जाहिरात झळवण्यात येत आहेत. मात्र, वन विभागाला पाट्ये नियतक्षेत्रामध्येच नुकतेच व्याघ्र प्रजननाचे पुरावे मिळाले आहेत.
 
सिंधुदुर्गात पार पडलेल्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या पहिल्या टप्प्यात पाट्ये नियतक्षेत्रामध्ये वाघीण आणि तिच्या दोन पिल्लांची पदचिन्ह आढळून आली आहेत. याशिवाय 'डब्लूआयआय'ने सावंतवाडी-दोडामार्ग इको-सेन्सिटिव्ह झोनसंदर्भातील अहवालात देखील पाट्ये नियतक्षेत्राला लागूनच असलेल्या श्रीरंगे नियतक्षेत्रात वाघिणीचा अधिवास असल्याचे म्हटले आहे. सद्यपरिस्थितीत सह्याद्रीत वाघांचे नैसर्गिक प्रजनन हे केवळ तिलारीच्या खोऱ्यात आढळते. अशा परिस्थितीत याठिकाणी रिअल इस्टेटचे खासगी प्रकल्प राबवल्यामुळे व्याघ्र अधिवासावर गदा येणार असल्याचे दोडामार्गचे स्थानिक वन्यजीव निरीक्षक आणि वनश्री फाऊंडेशनचे संस्थापक संजय सावंत यांनी म्हटले आहे.


तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र हे वाघांचे नैसर्गिक प्रजनन क्षेत्र आहे. याठिकाणी आम्हाला अनेकदा व्याघ्र अधिवासाचे आणि व्याघ्र प्रजननाचे पुरावे सापडले आहेत. तिलारी संवर्धन राखीवमधील पाट्ये, श्रीरंगे, केंद्रे हे सर्व गाभा क्षेत्रातील भाग व्याघ्र अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून त्याठिकाणीच 'तिलारी इस्टेट'सारखे खासगी बांधकाम प्रकल्प प्रस्तावित झाल्याने वाघांच्या नैसर्गिक प्रजनन केंद्रावर गदा येण्याची भिती आहे. - संजय सावंत, स्थानिक वन्यजीव निरीक्षक

 


Powered By Sangraha 9.0