शहाणपण देगा देवा!

09 Feb 2026 12:21:46

जगभरामध्ये सध्या ‌‘जेन-झी‌’चा बोलबोला सुरू आहे. एका बाजूला ही पिढी करिअरच्या दृष्टीने नवा विचार मांडत, नवीन वाट निर्माण करीत आहे. तर, दुसऱ्या बाजूला देशविदेशांतील राजकीय शक्तींना, दमनशाहीला आव्हान देण्याचे कामसुद्धा यांच्याच माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक नवी पिढी ही आशेचा किरण असते. समाजासमोरचे कठीण प्रश्न नवी पिढी सोडवेल या आशेने, या पिढीतील तरुणांकडे बघितले जाते. यात लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, प्रत्येक पिढी ही त्या त्या काळाचे आपत्य असते. त्यामुळे त्या त्या पिढीच्या कार्यशैलीचे, यश-अपयश समजून घेण्यासाठी तत्कालीन समाजव्यवस्था लक्षात घेणे गरजेचे. ‌‘जेन-झी‌’च्या या विविध कंगोऱ्यांना स्पर्श करण्याचे कारण म्हणजे, एका अहवालानुसार ‌‘जेन-झी‌’ ही कदाचित अशी इतिहासातील पहिलीच पिढी आहे, जिची शैक्षणिक प्रगती आणि बुद्ध्यांक त्यांच्या आधीच्या पिढीपेक्षा कमी आहे.

अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञ तथा न्यूरोसायंटिस्ट असलेले डॉ. जेरेड कूनी हॉर्व्हथ यांनी, अमेरिकन सिनेटसमोर यासंदर्भातील माहिती सप्रमाण नुकतीच प्रस्तुत केली. हॉर्व्हथ यांनी काही काळ यावर संशोधन केले असून, त्यांच्या या दाव्यानंतर आता शैक्षणिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. वास्तविक 20व्या शतकामध्ये ‌‘फ्लिन इफेक्ट‌’ नावाचा एक सिद्धांत मांडला गेला. त्यानुसार, चांगल्या पोषण आहारामुळे आणि सुधारलेल्या शिक्षण पद्धतीमुळे, प्रत्येक नवीन पिढीचा बुद्ध्यांक आधीच्या पिढीपेक्षा जास्त असतो. मात्र, 21व्या शतकामध्ये हा आलेख खाली आलेला दिसतो. संशोधकांच्या मते, ‌‘जेन-झी‌’च्या बाबतीत हा वेग वेगाने मंदावला असून, त्यांची शैक्षणिक कामगिरी खालावली आहे. आता या घसरणीचे सर्वांत मोठं कारण म्हणजे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा अति वापर! इंटरनेटच्या युगामध्ये जन्मलेल्या या पिढीच्या हातात स्मार्टफोन तुलनेने लवकर हाती आला. पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये प्रत्यक्षात शिकणे, लोकसमूहाच्या सान्निध्यात शिक्षण घेणे, यातून व्यक्तीचा सर्वांगीण विकासाला चालना मिळे. मात्र, तंत्रज्ञानचा शिरकाव ज्यावेळी वर्गामध्ये झाला, त्याक्षणी या प्रत्यक्ष अनुभूतीचे शिक्षण टप्प्याटप्प्याने बंद होऊ लागले.

‌‘कोविड‌’ काळात तर शिक्षणक्षेत्र पूर्णपणे ढवळून निघाले. स्मार्टफोन, इंटरनेट, या गोष्टींचं रूपांतर मूलभूत गरजांमध्ये झालं. लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष वर्ग बंद होऊन, ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. परिणामी विद्यार्थ्यांच्या मूलभूत गणिती क्रिया, वाचन आणि लेखनाच्या कौशल्यात मोठीच तफावत निर्माण झाली. केवळ परीक्षेसाठी अभ्यास करणे आणि माहिती ‌‘गुगल‌’वर शोधणे या सवयींमुळे, त्यांच्या स्वयंशिक्षणाला मर्यादा आल्याचे निरीक्षण, तज्ज्ञांनी नोंदवले आहे. यासंदर्भात एड-टेक कंपन्यांवरसुद्धा हॉर्व्हथ यांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात की, आजच्या घडीला अर्ध्याहून अधिक वेळ हा स्मार्टफोनवरून गोष्टी शिकण्यात जात आहे. वास्तविक हा पारंपरिक शिक्षणाला पर्याय असू शकत नाही; कारण आपल्या मेंदूची मूळ रचना ही सक्रिय शिक्षणातून गोष्टी समजून घेण्याची आहे. 30 सेकंदाच्या एखाद-दुसऱ्या रिलमुळे आपल्याला माहिती मिळू शकेल; परंतु त्या माहितीचे ज्ञानामध्ये रूपांतर कसे होईल, याचा यानिमित्ताने विचार होणे आवश्यक आहे. यासंदर्भात कॉर्पोरेट कंपन्यांमधील व्यवस्थापकांच्या मते, या पिढीच्या तरुणांमध्ये तांत्रिक ज्ञान उत्तम असले तरी त्यांच्यात कौशल्यांचा अभाव, समोरासमोर बसून संवाद साधणे, टीका सहन करणे किंवा कामाच्या ठिकाणी शिस्त पाळणे या बाबतीत ही पिढी संघर्ष करताना दिसते. स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी जी कौशल्ये आवश्यक आहेत, ती कमावण्यासाठी त्यांना वेळ देणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

याचा अर्थ ‌‘जेन-झी‌’ पिढी अक्षम आहे, असे नव्हे. मात्र परिवर्तनाची वाट जोखताना, तंत्रज्ञान आणि अनुभूती या दोन्ही गोष्टींचा मेळ साधण्याचा विचार करणे आवश्यक आहे. हॉर्व्हथ यांचा विरोध हा शिक्षणातील तंत्रज्ञानाला नाही. मात्र, त्याचबरोबर मुलांची जिज्ञासा टिकवणारी शिक्षणव्यवस्था कशी निर्माण करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे, असं ते सांगतात. तंत्रज्ञानात सर्वाधिक प्रगत आणि सामाजिक प्रश्नांवर जागरूक असलेली आपली पिढी आता ‌‘शहाणपणा‌’च्या वाटेवर नवी दिशा कसा प्रवास करणार, हे येणारा काळच ठरवेल.
Powered By Sangraha 9.0