उन्हाळ्यात सडे आणि पठारावरील अधिवास निजव वाटत असला, तरीही त्यात एक वनस्पती सजीवपणा जिवंत ठेवते, ती म्हणजे कोच. अणकुचीदार टोक असणारे सरळ पात्याचे काटे आणि त्यातून अलगद उमललेले फूल अशी रचना असणारी ही वनस्पती म्हणजे ‘लेपडागॅथिस’ म्हणजेच कोच. या दुर्लक्षित वनस्पतीचा उलगडा करणारा लेख..
कारवी किंवा कोरांटी वनस्पतीचा canthaceae हा वर्ग तसा चमत्कारिक. हा वर्ग आपल्या वैविध्यासाठी बराच प्रसिद्ध आहे. कारवी, कोरांटी, गोलगोंडा यांसारख्या विविध रानवनस्पतींसोबत अनेक बागांत सुशोभीकरणासाठी लावल्या जाणाऱ्या वनस्पती या वर्गात येतात. याच वर्गात आढळणारे आणखी एक वनस्पती कूळ म्हणजे लेपडागॅथिस (Lepidagathes). या कुळातील वनस्पतींना मराठीत ‘कोच’ म्हणतात. जमिनीलगत अर्ध्या चेंडूच्या आकारात वाढणारी ही अतिशय लहान वनस्पती. यामधील काही प्रजाती या सड्यावर म्हणजेच पठारांवर पसरट किंवा उभ्यादेखील वाढतात. जगभरात कोच वनस्पतीच्या 156 प्रजाती बघायला मिळतात. भारतात 28 ते 33 प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यातील 22 प्रजाती या सामान्यपणे आढळतात. महाराष्ट्रात कोचच्या 17 प्रजाती आढळतात.
पावसाळ्यात वर्षायू वनस्पतींना आलेला बहर हा सड्यांना जिवंत ठेवत असला, तरी उन्हाळ्यात या सड्यांवर प्राण फुंकण्याचे काम कोच या वनस्पती करतात. कारण, महाराष्ट्रात आढळणाऱ्या या वनस्पतीमधील प्रजाती या हिवाळा आणि उन्हाळी हंगामामध्येच फुलतात. काळ्या कातळासारख्या कठीण अधिवाशाची जुळवून घेण्यासाठी या वनस्पती विकसित झालेल्या आहेत. प्रथमदर्शनी ही वनस्पती कातळावर पसरलेली दिसते. तिच्या फुलांच्या देठाशी लहानशी काटेरी पानं विकसित झालेली असतात, ज्यांना ‘ब्रॅक्ट’ म्हणतात. या ‘ब्रॅक्ट’मुळेच या फुलांचे रक्षण होते. पठारावरून चालताना हे ‘ब्रॅक्ट’ पायाला टोचल्यामुळे कोणीतरी कोचल्यासारखे वाटत असल्याने या वनस्पतील ‘कोच’ असे म्हणतात. कोचमधील काही प्रजाती या कोकण किनारपट्टीवरील लो अल्टिट्यूडच्या सड्यांवर सापडतात, तर काही प्रजाती घाटमाथ्यांवरील हाय अल्टिट्यूडच्या पठारांवर आढळतात. प्रजातींनुसार त्यांच्या बहरण्याच्या कालवधीमध्येही अनेक बदल झालेले दिसतात. या प्रजाती डिसेंबरपासून फुलायला चालू होतात. जानेवारी-फेब्रुवारी महिना हा यांचा फुलोऱ्याचा महत्त्वाचा महिना. काही वेळा इतर महिन्यांतसुद्धा कोचच्या काही प्रजाती या फुलोऱ्यात दिसतात.
फुले अतिशय छोटी, घंटेच्या आकाराची जमिनीलगत येतात. कोचच्या विविध प्रजातींचे फुलोरे बघणे, म्हणजे एक वेगळीच पर्वणी असते. सडे, पठारे सुकली की कोच वनस्पतीचा हंगाम सुरू होतो. कातळ/खडकावर चिकटून वाढणारी ही वनस्पती सहज दृष्टिक्षेपात येत नाही. मात्र, फुलांचे विविध आकार, रंग, तुऱ्यांच्या रचना हे या वनस्पतीला मनापासून बघण्याचे काही महत्त्वाचे आकर्षणबिंदू आहेत. अवर्षणभागात आणि कडक उन्हात पाण्याविना टिकणारे हे कूळ आहे. यामध्ये हिमालय भागात सापडणाऱ्याही प्रजाती आहेत. तसेच पश्चिम घाटमाथ्यावरदेखील कोचच्या प्रजाती बघायला मिळतात.
कोचबाबत कोकणातील एका प्रजातीवरचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार कोच वनस्पती मोनोकार्पिक प्लाएटेसिएल प्रकारात येतात. म्हणजे कारवीसारख्याच या सगळ्या एकदम फुलोऱ्यात येतात आणि फळं, बीजं तयार करून नष्ट होतात. अर्थात, कारवी व कोच यांचे लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वर्ग एकच आहे, म्हणून हे साम्य असू शकते का, याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. कोच वनस्पतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या टिटवीसाठी अनोखे कॅमोफ्लाज (छद्मावरण) तयार करतात. एका निरीक्षणानुसार माळटिटवीची पिल्लं सुरुवातीला जमिनीवर सरपटतात. त्यांच्या अंगावरील पंखाचे स्वरूप कोच वनस्पतीसारखेच दिसते. आईने धोक्याचा इशारा दिला की, ही पिल्लं आहे त्याच जागी दबकून चिकटतात व अगदी कोच वनस्पतीसारखेच दिसतात. स्वसंरक्षणासाठी हे छद्मावरण साम्य माळटिटवीच्या पिल्लांना सुरक्षा देते.
कोचच्या काही प्रजाती ‘लाल यादी’तदेखील आहेत. कोल्हापुरातील सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव व त्यांच्या पत्नी डॉ. उषा यादव यांच्या नावाने दोन कोच वनस्पती नोंद आहेत. यातील एक Lepidagathis shrirangii व दुसरी Lepidagathis ushae या नावाने नोंद आहेत. दोन्ही प्रजातीची फूले फारच आकर्षक विशेषतः दुसऱ्या प्रजातीच्या फुलाचा आकार फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोचचा एक प्रकार जो ‘भुईगेंद’ म्हणून ओळखला जातो, त्याचा वापर ताप, इन्फ्लेमेशन, मलेरिया यावर वापरतात. याव्यतिरिक्त जखमांवरसुद्धा दगडीपाल्याप्रमाणे याची पाने लावली जातात. Lepidagathis trinervis ही प्रजाती ‘सफेद रासना’ या नावाने आसेतू हिमाचलमध्ये ओळखली जाते. संधिवातावर उपयोगी असणाऱ्या या कोच प्रजातीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. कोचच्या बहुतांश प्रजातींची फुले ही पाऊस नसताना येतात. त्यामुळे माळरानावरील, सड्यावरील परिसंस्थेतील अन्नसाखळीतील महत्त्वाची भूमिका ही वनस्पती निभावते. जनावरांचे दूध वाढावे, यासाठी कोचच्या काही प्रजाती उपयुक्त ठरतात. कोच वनस्पतींच्या प्रजातींचे पुनरुज्जीवन गरजेचे आहे. कारण या कुळातील बहुतांश प्रजातींचे व्यापारी उपयोग आहेत. फक्त ते ओळखून त्याप्रमाणे संशोधन व संवर्धन वनस्पतीशास्त्रात काम करणाऱ्या संस्था व तज्ज्ञांनी करणे आजची गरज आहे.
लेपडागॅथिस महाकश्यपी
सातारा जिल्ह्यातील पठारांवर फुलणाऱ्या लेपडागॅथिस महाकश्यपी प्रजातीचा फुलोरा हा पाहण्यासारखा असतो. मार्च महिन्यात या प्रजातीला फूल येतात. यावेळी पठारावर गुलाबी रंगाच्या फुलांची चादर पसरलेली दिसते. त्यावर मधमाशा घोंगावत असतात. ही वनस्पती साधारण अडीच मीटरपर्यंत वाढते. बुद्धांच्या धुतांगधारीमधील अग्र श्रावक महाकाश्यप यांच्या सन्मानप्रीत्यर्थ या प्रजातीचे नाव महाकश्यपी ठेवण्यात आलाय. महाकश्यपीच्याच आजूबाजूला वाढणारी 2023 सालीच नव्याने शोधण्यात आलेली प्रजात आहे, लेपडागॅथिस डालझेलियाना. मार्च महिन्यामध्येच फुलणारी ही वनस्पती 50 ते 60 सेंमीपर्यंत वाढते.
लेपडागॅथिस क्लाव्हाटा
या प्रजातीचा समावेश धोक्यात असलेल्या वनस्पतींच्या यादीत नष्टप्राय (Critically endangered- IUCN) श्रेणीत होतो. 1851 साली एन. ए. डॅल्झेल याने या वनस्पतीचा शोध चोर्ला (बेळगाव) गावच्या सड्यांवरून लावला. नंतर जवळजवळ 166 वर्षांनी पुन्हा ही वनस्पती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळच्या सड्यांवरून डॉ. ऋतुजा कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधून काढली. त्यानंतर डॉ. ऋतुजा कोलते-प्रभूखानोलकर (द ग्रीन कॉन्सेप्ट, पुणेसोबत संलग्न) आणि त्यांचे सहकारी राहुल प्रभूखानोलकर (जी. एस. एस. कॉलेज, बेळगाव), प्रभा पिल्ले (केरळ), डॉ. शरद कांबळे (म. वि. प्र. समाज संस्थेचे कॉलेज, त्र्यंबकेश्वर), डॉ. ज्ञानशेखर (एम. सी. सी. कॉलेज, चेन्नई), डॉ. जनार्थनमं (गोवा) यांच्या आठ-नऊ वर्षे सुरू असलेल्या सखोल निरीक्षणांनुसार असे लक्षात आले की, ही प्रजाती दरवर्षी फुलत नाही. त्यांनी हे संशोधन ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’मध्ये प्रकाशित केले आहे. त्यांचे निरीक्षण असे आहे की, नोव्हेंबर 2016 मध्ये चौकुळ येथील कोचची सर्व झाडे फुलली होती. त्यानंतर 2017च्या पावसामध्ये सर्व झाडे मरून नवीन रोपे तयार झाली आणि सात वर्षांच्या कालावधीनंतर 2024 नोव्हेंबरमध्ये झाडे परत फुलली. या प्रजातीच्या जीवनचक्राबाबत अधिक निष्कर्ष काढण्यासाठी सविस्तर अभ्यास आणि सातत्यपूर्ण निरीक्षणांची आवश्यकता आहे.
लेपडागॅथिस कोकणेन्सिस
दापोलीतून शोधण्यात आलेली लेपडागॅथिसची ही प्रजात उन्हाळ्यात बहरणारी आहे. वनस्पतीशास्त्रांनी या प्रजातीचे नमुने दापोलीमधील निगडेच्या सड्यावरून गोळा केले होते. या वनस्पतीची तुलना लेपिडागॅथिस महाकश्यापी आणि लेपिडागॅथिस डालझेलियाना या दोन प्रजातींबरोबर करण्यात आली. या तुलनेनंतर नव्या प्रजातीचे फूल, त्याचा फुलोरा, बिया या दोन प्रजातींपेक्षा निराळ्या दिसल्याने दापोलीतील प्रजात नवीन असल्याचे त्यांचा लक्षात आले. त्यानंतर संशोधकांना ही प्रजात रत्नागिरी जिल्ह्यातील धातोंडी, कात्रादेवी, निगडे, पन्हाळे काजी, सागवे या गावांमध्येदेखील आढळून आली. त्यामुळे या प्रजातीचे नाव त्यांनी कोकणावरून लेपिडागॅथिस कोकणेन्सिस असे केले. या प्रजाती उन्हाळी हंगामात बहरते. ज्यावेळी सडा निजव दिसतो. मार्च आणि एप्रिलमध्ये तिला फूल येतात आणि मेपर्यंत फळ धरतात.
- रोहन पाटील
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत.)
7387641201