टेनिसभक्तांचे चारधाम...

09 Feb 2026 12:46:02

टेनिसमधील ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धांना सुरुवात झाली असून, आता वर्षातील चारही स्पर्धा एकामागोमाग एक पार पाडतील. टेनिस हा श्रीमंताबरोबरच, ‌‘जेंटलमॅनचा खेळ‌’ म्हणून ओळखला जातो. मात्र, या खेळातही काही खोडकर खेळाडू असतात, त्यांच्या विक्षिप्त वागण्याचा त्रास क्रीडा जगताला होतो. या खेळातील स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीचा घेतलेला आढावा...

आपण चारधाम ही पवित्र ठिकाणे मानतो आणि तेथे जाऊन आल्यावर आपण स्वतःला कृतकृत्य मानतो. तसाच काहीसा प्रकार लॉन टेनिसभक्तांचाही असतो. या टेनिसपटूंचं चारधाम म्हणजे, चार प्रतिष्ठित ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा. ग्रॅण्ड स्लॅमच्या चार मोठ्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत, चौफेर विजय मिळवण्याचे आव्हान टेनिसपटूंना दिले जाते.

असे हे चारधाम : त्या ग्रॅण्ड स्लॅमच्या स्पर्धांमधली ‌‘ऑस्ट्रेलियन ओपन‌’ ही वर्षातील पहिली स्पर्धा, जानेवारीमध्ये निळ्या रंगाच्या हार्ड कोर्टवर खेळली जाते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे दरवष खेळवण्यात येणारी ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा, या वष दि. 12 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी या कालावधीत झाली. मे-जून या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे ‌‘फ्रेंच ओपन‌’ ही लाल मातीच्या मैदानावर खेळली जाणारी स्पर्धा, यावष दि. 18 मे ते दि. 7 जूनदरम्यान होईल. आंतरराष्ट्रीय टेनिस

स्पर्धेतील सर्वांत लोकप्रिय असलेली विम्बल्डन स्पर्धा जून-जुलै या कालावधीत, लंडनमधील गवताच्या मैदानावर खेळवण्यात येते. ही विम्बल्डन स्पर्धा यावष दि. 29 जून ते दि. 12 जुलैदरम्यान होणार आहे. या स्पर्धांमधील ‌‘यूएस ओपन‌’ ही चौथी आणि शेवटची ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा, न्यूयॉर्कमधील फ्लशिंग मिडोज येथील हार्ड कोर्टवर यावष दि. 31 ऑगस्ट ते दि. 13 सप्टेंबरदरम्यान होईल. तर, अशा त्या ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील, महिलांची 114वी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा शनिवार, दि. 31 जानेवारी रोजी झाली, तर पुरुषांची रविवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी झाली.

उन्हाळी टेनिस : मेलबर्न येथे ‌‘ऑस्ट्रेलियन ओपन‌’ स्पर्धेच्या काळात प्रचंड उन्हाळा असतो. त्यामुळे त्याचा त्रास टेनिसपटूंना सहन करावा लागतो. साधारणतः सकाळी 7-7.30च्या सुमारास सामने सुरु होत असल्याने, पहिल्या काही सामन्यांत त्रास होत नाही. पण ऊन चढल्यावर मेलबर्नचं किमान तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जातं. मैदानांवरील छप्पर उघडेच असल्याने, खेळाडूंना त्रास होतो. यानिक सिन्नरसारख्या दिग्गज टेनिसपटूच्या पायांचे स्नायू आखतात. प्रारंभीच्या सेटमधे उष्णतेमुळे त्याच्या शरीरातील बहुतेक ऊर्जा खर्च झाली होती. परिणामतः त्याच्यावर सामना गमावण्याची वेळ आली असती, पण त्याच्या विनंतीवरून खेळ थांबवून ‌‘रॉड लेवर‌’ मैदानात असलेले छप्पर मग लावण्यात आले. कोर्टवरील वातानुकुलन यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर मात्र सिन्नेरने नव्या जोमाने खेळ केला. पुढील सामने मात्र सावधगिरीने खेळवले गेले.

कार्लोस अल्कराझ ठरला ‌‘ऑस्ट्रेलियन ओपन‌’ विजेता : ‌
‘ऑस्ट्रेलियन ओपन‌’मधील अंतिम सामना, 25वा ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नांत असलेल्या, तसेच आपल्या कारकिदतील 11व्या ऑस्ट्रेलियन ओपन खेळणाऱ्या अनुभवी सर्बियन नोव्हाक जोकोविच आणि स्पेनच्या कार्लोस अल्कराझ यांच्यात झाला. त्यात अनुभवी जोकोविचचा पराभव करून, कार्लोस अल्कराझने ऑस्ट्रेलियन ओपन 2026चे विजेतेपद पटकावले.

करिअर ग्रॅण्ड स्लॅम : या विजयासह अल्कराझने आपला सातवा ग्रॅण्ड स्लॅम किताब जिंकला आणि करिअर ग्रॅण्ड स्लॅम पूर्ण करणारा, इतिहासातील सर्वांत कमी वयाचा पुरुष खेळाडूही ठरला. 22 वर्षे, 272 दिवस असे वय असणाऱ्या कार्लोस अल्कराझने, तब्बल 88 वर्षांपूव 22 वर्षे, 363 दिवसांच्या वयाच्या डॉन बज याचा विक्रम मोडला. अल्कराझने यापूव यूएस ओपन-2022, विम्बल्डन-2023, 2024, फ्रेंच ओपन-2024, 2025, आताची ऑस्ट्रेलियन ओपन-2026 असे चारही ग्रॅण्ड स्लॅम जिंकून करिअर ग्रॅण्ड स्लॅम पूर्ण केली. कार्लोसपूव डॉन बज, रॉड लेवर, रॉय एमर्सन, आंद्रे अगासी, रॉजर फेडरर, राफेल नडाल आणि नोव्हाक जोकोविच यांनीही करिअर ग्रॅण्ड स्लॅम पूर्ण केली. एका खेळाडूने आपल्या कारकिदत चारही प्रमुख स्पर्धांचे विजेतेपद मिळवणे, म्हणजेच करिअर ग्रॅण्ड स्लॅम होय. एकाच वर्षात या चारही स्पर्धा जिंकल्यास, त्याला ‌‘कॅलेंडर ग्रॅण्ड स्लॅम‌’ म्हणतात. रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच, आणि आत्ताचा कार्लोस अल्काराझ, हे सारे टेनिसपटू करिअर ग्रॅण्ड स्लॅम विजेते आहेत.

अहंकारी/रागीट टेनिसपटू :
जानेवारी 2022ची ‌‘ऑस्ट्रेलियन ओपन‌’ची एक घटना अनेकांना कदाचित आठवत असेल. ‌‘कोविड‌’चे लसीकरण न करण्याचा हट्ट धरून बसलेल्या जोकोविचला, ऑस्ट्रेलियन न्यायालयाने हद्दपार करण्याच्या सरकारी आदेशाचे समर्थन केले होते. जोकोविचने हा निर्णय स्वीकारत, काही तासांनंतर मेलबर्नहून संयुक्त अरब अमिराती गाठले.

‌‘यूएस ओपन‌’चा बोध घ्यावा खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, कुणीही विजयाचा सिकंदर नसतो. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून गोल्डन स्लॅम करण्यास निघालेल्या सिकंदर जोकोविचच्या हाती, ऑलिम्पिकचं कांस्यपदक तेव्हाही लागलं नव्हतंचं. काही वर्षांपूवच्या अमेरिकन ओपन स्पर्धेत लाईन रेफ्रींना चेंडू मारल्याबद्दल, जोकोविचवर कारवाई करण्यात आली आणि त्याला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले होते. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम संघटनांनी नियमाचा भंग केलेल्या जोकोविचला शिक्षा केली होतीच. जोकोविचप्रमाणे अजून दोघेजण अहंकारी मानले गेले आहेत. त्यातील एक आहे, जॉन मॅकेन्रो आणि दुसरा निक किर्गियोस. जॉन मॅकेन्रो हा आपल्या कारकिदत पंचांशी वाद आणि रागीट स्वभावासाठी प्रसिद्ध होता. निक किर्गियोस याने जरी एकेरी ग्रॅण्ड स्लॅम जिंकले नसले, तरी कोर्टवरील गैरवर्तन आणि वादग्रस्त विधानांमुळे त्याच्याही नावाची चर्चा असे. ऑस्ट्रेलियाचा निक किर्गियोसची 2019ची अशीच एक घटना आहे. अमेरिकन ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत, निक किर्गियोसने ॲण्टॉईन हाँगवर मात केली. या लढतीला सुरुवात होण्याआधीच त्याची पंचांशी शाब्दिक चकमक उडाली होती. निक किर्गियोसच्या जसच्या कॉलरवर ‌‘जस्ट डू यू...‌’ असा संदेश लिहिला होता, ज्यावर पंचांनी आक्षेप घेतला. “वर केलेली कॉलर दुमड; म्हणजे संदेश झाकला जाईल,” असे पंच सांगत होते. मात्र निक किर्गियोसने “असे मी का करू? त्य मागे कोणता नियम आहे, तो सांगा. पटले, तरच कॉलर दुमडणार,” अशी भुमिका घेतली. संबंधित खुलासा केला जात नाही, तोपर्यंत लढतीत भाग घेणार नाही, असाच काहीसा पवित्रा त्याने घेतला. अखेर नियम सांगितल्यावर लढतीला सुरुवात झाली. त्या ‌‘जस्ट डू यू‌’ या संदेशाचा मराठी मतितार्थ होतो, स्वतःसारखेच राहा, स्वतःची मज चालवा, स्वतःचेच ऐका!

हा संदेश निकच्या बंडखोर शैलीशी जुळणारा आहे हे कमी होते की काय, म्हणून निक किर्गियोसने आणखी एका मुद्द्यावरून पंचांशी भांडण उकरून काढले. त्याने सामना जिंकल्यावर पंचांनी ‌‘गेम‌’ अशी घोषणा केली; पण प्रतिस्पर्ध्याने निर्णयाविरुद्ध ‌‘रिव्ह्यू‌’ मागितला. यावर निक किर्गियोस अडून बसला. “पंचांनी ‌‘गेम‌’ पार पडल्याची घोषणा केल्यावर प्रतिस्पध ‌‘रिव्ह्यू‌’ मागूच कसा शकतो?” असा प्रश्न करून, त्याने पुन्हा आडकाठी केली. याचा विरोधही त्याने जोरदार ओरडून व्यक्त केला. “तुम्ही याविषयी निरीक्षकांशीच बोला,” या मागणीवरच निक अडून बसला. अखेर निकला पुन्हा नियम समजावण्यात आला अणि सामाना पुढे सरकला. बरेचसे खेळाडू त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसोबतच त्यांच्या अशा वादग्रस्त स्वभावासाठीही, क्रीडा इतिहासात ओळखले जातात.

‌‘ऑस्ट्रेलियन ओपन‌’ महिला एकेरी :
ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मधील महिला एकेरीचा अंतिम सामना दि. 31 जानेवारी रोजी झाला. या सामन्यात जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू असलेल्या एरिना सबालेंकाचा पराभव करून, एलिना रायबाकिना ‌‘ऑस्ट्रेलियन ओपन‌’ विजेतेपद जिंकणारी कझाकस्तानची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

आम्हीतरी मागे का! : अहंकारी व रागीट असणे, ही पुरुषांचीच मक्तेदारी नाही; काही स्त्रियाही या रांगेत आहेत. अमेरिकन कोको गॉफला, यावेळच्या ‌‘ऑस्ट्रेलियन ओपन‌’च्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा फटका बसला. या पराभवानंतर कोको गॉफने स्वतःची रॅकेट आपटत मोडून, नाराजी व्यक्त केली होती. “भावनेच्या भरात रॅकेट जमिनीवर आपटून मोडली, तर त्यात गैर ते काय,” असा उलट सवालही तिने केला. तसेच, ती घटना दूरचित्रवाणीवर वारंवार दाखवल्याबद्दल संबंधित वाहिनीलाही फटकारलं. “लहान मुलं-मुली टेनिस सामने बघत असतात; त्यांच्यापुढे असे वर्तन अयोग्यच ठरते. पण भावनांना वाट करून देणेही महत्त्वाचंच आहे; ते विचार मनात साठवून ठेवण्यापेक्षा अशा कृतीतून वेळीच काढून टाकलेले बरे,‌’ असे कोको गॉफचे म्हणणे. 2022मध्ये रोमानियाच्या इरिना कॅमोलिया बेगू हिनेही रागाच्या भरात, रॅकेट चक्क प्रेक्षकांत भिरकावली होती. ती एका लहान मुलाच्या जवळ पडली, अचानक झालेल्या घटनेनं तो मुलगा रडला होता.

सार्वजनिक खासगीपण :
“टेनिस कोर्टच्या पलीकडे खेळाडूंचे खासगी आयुष्य जपलं गेलं पाहिजे. आम्ही टेनिसपटू म्हणजे प्राणिसंग्रहालयात ठेवलेले प्राणी नव्हेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया, पोलंडची टेनिसपटू इया स्वियाटेक हिने व्यक्त केली. नोव्हाक जोकोविचसारखा अनुभवी टेनिसपटूही इयाशी सहमत आहे. टेनिसपटूंच्या या नाराजीस कारण ठरले, ते कोको गॉफने रॅकेटचे प्रकरण! “सध्या लॉकररुम वगळता टेनिसपटूंना खासगी आयुष्यच राहिलेले नाही. ही परिस्थिती खरोखरच वाईट आहे,” असे गॉफने म्हटले होते.

क्या हार मे क्या जित मे :
हा वरील प्रकार टेनिसमध्येच घडतो असे नाही. जिंकल्यावरही क्रीडासाहित्य सर्वांसमोर भिरकावतानाचा प्रकार ऑक्टोबर 2025 मध्ये आपण अनुभवला आहेच की!

बुद्धिबळात प्यादे किंवा राजा प्रेक्षकांमध्ये भिरकावणे ही खिलाडूवृत्ती नसलेली, उन्मादी वर्तणूक मानली जाते. जी अनेकदा रागाच्या भरात घडते. अमेरिकेचा ग्रॅण्डमास्टर हिकारू नाकामुरा याने भारताच्या डी. गुकेशविरुद्धची लढत जिंकल्यावर, आनंदाच्या भरात गुकेशचा राजा प्रेक्षकांमध्ये भिरकावला होता. बुद्धिबळासारख्या शांत आणि शिस्तबद्ध खेळातही अशी वर्तणूक दिसणे, हे अपेक्षित नसते. अशी कृती क्रीडाभावनांच्या विरोधी असल्याने, त्यावर टोकाची टीका होते. इंग्रजी शब्दकोशात ग्रॅण्ड स्लॅममधील ‌‘स्लॅम‌’चा अर्थ ‌‘खोलीत खोलीबाहेर फणकाऱ्याने जाणे,‌’ असा मराठीमध्ये आहे, तर ‌‘शक्तिशाली प्रहार‌’ असा हिंदीत आहे. या नात्याने ‌‘ग्रॅण्ड स्लॅम‌’ला असे वर्तन करणाऱ्यांचे तरी काय चुकलंय? असे उपहासाने आपण म्हणूच शकतो.

खेळाडूंची हीदेखील जबाबदारी : काही पालक आपल्या कुटुंबातील लहान मुलांसमवेत प्रत्यक्ष क्रीडांगणावर, तसेच दूरचित्रवाणीवरील सामने बघायला बसतात. ती मुलं ते सामने बघताना, दोन गोष्टी त्यातून नकळत शिकतात. एक म्हणजे त्या क्रीडाप्रकारातील बारकावे आणि दुसरे म्हणजे त्या खेळाडूंचे वर्तन. ते खेळाडू कसं खेळतात, त्या खेळाडूंची शैली, ढब, वेशभूषा, याचबरोबर ते खेळाडूंचे वर्तन याचेही निरीक्षण् करतात. ही मुलं त्यांच्यासारखेच वागण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत त्या खेळाडूंची जबाबदारी वाढते. कारण प्रेक्षकांमधील अनेक युवक-युवती त्यांना पाहूनच त्यांचे तंतोतंत अनुकरण करणारे, इंग्रजीत म्हणतात तसे ‌‘कॉपी कॅट‌’ होत असतात. म्हणून खेळाडू हा समाज घडवणारा एक महत्त्वाचा घटक असतो, हे क्रीडापटूने आवर्जून ध्यानात ठेवले पाहिजे. जसे तुमचे अनुकरण करणाऱ्यांवर वाईट प्रभाव पडणार नाही, असे वर्तन ठेवणे हीच एका खऱ्या चांगल्या खेळाडूची जबाबदारी असते. तसेच योग्य अयोग्यचे ज्ञान पुढच्या पिढीला देणे, ही पालकांचीही जबाबदारी आहे असे म्हणणे सयुक्तिक नाही का ठरणार!

- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704

Powered By Sangraha 9.0