मुशाफिरीतून घडलेली उद्यमशीलता

09 Feb 2026 12:49:09

जाहिरात क्षेत्र, फोटोग्रॉफी, कथ्थक, स्पॅनिशसारखी परदेशी भाषा असो आणि त्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय अशा विविध प्रातांत मुशाफिरी करणाऱ्या अस्मि अमित नारगोलकर यांच्याविषयी...

अस्मि यांचा जन्म डोंबिवलीमध्ये झाला. आणि त्यांचे शिक्षण मालाड येथे झाले. अस्मि यांचे वडील मनोहर दळवी हे सरकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. आता ते नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर त्यांच्या आई रेखा या ‌‘बीएमसी‌’च्या कन्या शाळेत, शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मुख्याध्यापिका या पदावरून त्याही निवृत्त झाल्या. अस्मि यांचे संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षण गोरेगाव येथील पाटकर महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी ‌‘एमकॉम‌’चे शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. ‌‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ॲनालिटिक्स‌’ क्षेत्राचे शिक्षण त्यांनी, माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट येथून घेतले. तसेच पुढे ‌‘मास मीडिया कम्युनिकेशन‌’चा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’मधून करिअरला सुरुवात केली. दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’मध्ये एक वर्ष काम केल्यानंतर, इंग्रजी वर्तमानपत्र आणि जाहिरात एजन्सीमध्येही त्यांनी काम केले. मीडिया प्लॅनिंगमध्ये तज्ज्ञ म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. जाहिरात क्षेत्रात काम करत असतानाच, डोंबिवलीतील अमित यांच्याशी त्यांची लग्नगाठ बांधली गेली आणि मालाडकर अस्मि डोंबिवलीकर झाली.

डोंबिवलीत आल्यानंतरही जाहिरात क्षेत्रात त्यांनी काही काळ काम केले. अस्मि यांच्या सासू आणि अमित यांचे काका यांनी हॉटेल व्यवसायात आपला एक वेगळा ठसा उमटविला होता. अमित यांना पारंपरिक हॉटेल व्यवसाय बंद करू नये, असे वाटत होते. त्यामुळे ‌‘मैत्री फुड्स‌’ची धुरा त्यांनी अस्मि यांच्यावर सोपविली. अस्मि यांच्यासाठी नोकरी करणे हे एक पॅशन असले, तरी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि नेटाने सांभाळलीसुद्धा. नोकरीला पूर्णविराम देत घराची जबाबदारी सांभाळत, त्या ‌‘मैत्री फुड्स‌’ची जबाबदारीही सांभाळू लागल्या. अस्मि यांना व्यवसायाबरोबरच, ‌‘मैत्री फुड्स‌’ची चवदेखील सांभाळावी लागणार होती. तीच चव जपत विविधता आणायचा प्रयत्नही त्या करत आहेत. त्यांच्या भागीदार स्वाती आमकर आणि अस्मि दोघी असे मिळून, हा व्यवसाय पुढे नेत आहेत. तसेच अधूनमधून आवश्यकता भासल्यास अस्मि यांचे पती अमित, स्वाती यांचे पती संतोष, त्यांचे कर्मचारी ओमकार घाग यांचे मोठे सहकार्य लाभते. त्यामुळे कौटुंबिक आणि मित्र परिवाराच्या साहाय्यानेच हा व्यवसाय सांभाळणे शक्य होत असल्याचे अस्मि सांगतात.

‌‘मैत्री फुड्स‌’ने ‌‘कोविड‌’ काळातही अविरत सेवा सुरू ठेवली होती. ‌‘कोविड‌’मुळे संपूर्ण जग ठप्प झाले असताना, एकट्या-दुकट्याच्या तोंडात दोन घास जावे म्हणून ‌‘मैत्री फुड्स‌’ने कायम प्रयत्न केले. वृद्धांसाठी डब्बा पुरवण्याची सेवाही सुरू केली होती. ‌‘मैत्री फुड्स‌’ने केवळ ‌‘कोविड‌’ काळातच सामाजिक बांधिलकी जपली नाही, तर एरव्हीही वर्षातून एकदा ते आपल्या उत्पन्नातील एक ठरावीक रक्कम विविध वृद्धाश्रमांना दान करतात. त्यांचा हा सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांनी आजवर दरवष न चुकता जपला आहे. अस्मि यांनी हॉटेल व्यवसाय करत असतानाच आपली कलाही जोपासण्याचा प्रयत्न केला, त्यांनी कथ्थकमध्येही मास्टर पूर्ण केले. त्यांनी कथ्थकसह, स्पॅनिश भाषेचेदेखील ऑनलाईन क्लासेस सुरू केले. त्यामुळे त्यांना एकीकडे कला जोपासण्याचा आणि दुसरीकडे विद्याथ घडविण्याचाही आनंद मिळू लागला. त्यांनी तीन वर्षांपूव ‌‘अस्मित क्रिएशन‌’ नावाची एक कंपनीही सुरू केली. त्यांनी लघुपट दिग्दर्शक, लेखक, व्हिडिओ एडिटर यांसाठी फ्रीलान्सर म्हणून काम देखील केले आहे. फोटोग्राफीमध्येही त्यांनी सहा प्रकल्पांवर काम केले असून, त्यामध्ये त्यांनी मॉडेल शूट ते प्री-वेडिंग शूट असे विविधांगी प्रकल्पाचे काम पाहिले. त्यांच्या ‌‘देवबाप्पा‌’ या लघुपटाला ‌‘कोविड‌’मध्ये पुरस्कारदेखील मिळाला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शक अनुराग ठाकरे आहेत. अस्मि यांना पेंटिंग, फोटोग्राफी आणि कथ्थकची आवड आहे. सुरुवातीला डोंबिवलीतील ‌‘कस्तुरी प्लाझा‌’च्या समोर असलेले ‌‘मैत्री फुड्स‌’, आता काही महिन्यांपूव 90 फीट रस्त्यावर स्थलांतरित झाले आहे.

अस्मि यांचा फूडमध्ये पौष्टिक महाराष्ट्रीय, पण वेस्टर्न फूड फ्युजन आणण्याचा प्रयत्न असतो. पोळी आणि भाकरी पारंपरिक आहाराचे महत्त्वाचे भाग आहेत. काहीजण दररोज भाकरी खाण्याला प्राधन्य देतात, परंतु दररोज भाकरी खाणे कधीतरी कंटाळवाणे होते. अशा वेळी ज्वारीच्या भाकरीला थोडा ट्विस्ट देत, ज्वारीच्या पीठाचे फुलके हा पौष्टिक आणि चविष्ट खाद्यपदार्थ उत्तम पर्याय ठरतो. फुलके बनविण्यासाठी ज्वारीचे पीठ, पांढरे तीळ, जिरे, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, चटणीसाठी कांदा, शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट, लिंबू हे साहित्य लागते. त्यांचे हे ज्वारीचे फुलके यांच्यासह ग्रीन पीस वडा, ब्रेड व्हेज रोल आणि आंबोळी या पदार्थांना विशेष मागणी आहे.

अस्मि यांना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये भरीव कामगिरी करण्याची इच्छा असून, तळ कोकणात जाऊन तिथल्या मुलांसाठी ‌‘आर्ट ॲण्ड एज्युकेशन‌’साठी प्रयत्न करायचे आहेत. बहुआयामी असे व्यक्तिमत्त्व असलेल्या अस्मि यांना, तिच्या पुढील वाटचालीसाठी दि. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून हार्दिक शुभेच्छा.

Powered By Sangraha 9.0