'संस्कृतानुभव' प्रदर्शनातून सर्वसमावेशकतेचा जागर!

एसएनडीटी महिला विद्यापीठात दोन दिवसीय प्रदर्शन उत्साहात संपन्न

    08-Feb-2026   
Total Views |
Sanskrutanubhav Exhibition 2026
 
मुंबई : ( Sanskrutanubhav Exhibition 2026 ) एसएनडीटी महिला विद्यापीठात आजीवन अध्ययन, शिक्षण व विकास तसेच विस्तार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय संस्कृतानुभव प्रदर्शन २०२६ अत्यंत उत्साहात संपन्न झाले. हा उपक्रम केवळ उत्पादन, हस्तकला वा सेवांचे प्रदर्शन न राहता विद्यापीठ आणि समाज यांच्यातील जिवंत संवाद घडवणारे एक प्रभावी सामाजिक–शैक्षणिक व्यासपीठ म्हणून उदयास आला आहे. हा संपूर्ण उपक्रम एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मा. कुलगुरू प्रा. (डॉ.) उज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक व समाजकार्य विभागाचे (अतिरिक्त कार्यभार) विभागप्रमुख प्रा. (डॉ.) प्रभाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. विभागातील प्राध्यापकवृंद व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
 
दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या उद्घाटन समारंभास प्रा. (डॉ.) विजय फुलारी, मा. कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यापीठांनी तळागाळातील सामाजिक उपक्रमांना बळकटी देण्याच्या भूमिकेवर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव आणि विकास देसाई, वित्त व लेखा अधिकारी, एसएनडीटी महिला विद्यापीठ यांची मान्यवर उपस्थिती लाभली. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्थापनेच्या १११ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचे प्रतीक म्हणून यावर्षी या प्रदर्शनात १११ स्टॉल्स उभारण्यात आले असून, विद्यापीठ–समाज–स्वयंसेवी संस्था–उद्योग यांच्यात १११ सामंजस्य करार (MoUs) करण्यात येत आहेत.
 
हेही वाचा : नवोदित साहित्यिक पुरस्कार पोलिस उपनिरीक्षक अर्जुन डोमाडे यांना जाहीर
 
हे केवळ संख्यात्मक यश नसून, विद्यापीठाच्या दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या प्रदर्शनासोबतच विभागातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक विषयांवरील पथनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली. दोन दिवसांच्या या उपक्रमात ५,००० हून अधिक नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन १११ स्टॉल्सना भेट दिली, विविध संस्थांशी संवाद साधला, उत्पादने खरेदी केली व सामाजिक उपक्रमांविषयी माहिती घेतली.
 
दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमास मोक्षदा पाटील, उपमहानिरीक्षक पोलीस, राज्य राखीव पोलीस बल मुख्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी, नेतृत्वगुण व समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, संस्थांचा सक्रिय सहभाग आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे ‘संस्कृतानुभव प्रदर्शन २०२६’ हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.