केवळ एक पत्ता नाही, ऐतिहासिक वारसा

    08-Feb-2026
Total Views |

महापुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूंचे महत्त्व राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अनन्यसाधारण असेच. राजधानी दिल्लीतीतील अशाच अनेक वास्तूंपैकी एक वास्तू म्हणजे ‘१, हार्डिंग एवेन्यू.’ भारताचे कायदामंत्री असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या वास्तूत काही काळ वास्तव्य होते. आज या ठिकाणी ‘डॉ आंबेडकर नॅशनल मेमोरियल’ची (‘डीएएनएम’) भव्य दिमाखदार वास्तू उभी आहे. तेव्हा, अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूविषयी...

नवी दिल्लीत ‘जनपथ’सारख्या उच्चभ्रू भागात ‘डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर’ (डीएआयसी)ची भव्य वास्तू उभी आहे. ही सुसज्ज वास्तू केवळ एक ‘कन्व्हेंशन सेंटर’ आहे; इथे कार्यक्रमासाठी तीन सभागृह बुक करता येतात, एक प्रशस्त ‘भीम’ आणि दोन छोटी अनुक्रमे ‘नालंदा’ आणि ‘समरसता’; हा दिल्लीकरांचा सामान्य समज.
इथे मराठी भाषिक डायरेटर, कर्नल आकाश पाटील दोन वर्षांपूर्वी आले आणि या वास्तूला तिचे मूलगर्भ, ‘सामाजिक-परिवर्तन विषयाशी संबंधित संशोधन संस्था’ हे स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिले. भारतीय संविधानाच्या ‘मसुदा समिती’चे अध्यक्ष आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने निर्मित या वास्तू परिसरात काही भव्य पुतळ्यांची स्थापना करण्यात आली आहे, ते बनविण्यात ‘महाराष्ट्रभूषण’ राम सुतार यांचा मोठा हातभार लागला आहे.

इथे भगवान बुद्धांची करुणामय मूर्ती आहे, डॉ. आंबेडकरांच्या दोन भव्य मूर्ती आहेत. शिवाय, इतर जातक कथा दृश्य दर्शविणारी भित्तिचित्रे, सांची स्तूप व अशोक स्तंभ यांच्या प्रतिकृती आहेत. सगळेच काम सुबक व उठावदार आहे. एकूणच, परिसरात भव्यता आणि शांततेचा अनुभव येतो. ही शांतता अभ्यासातून अर्जित केलेल्या ज्ञानाच्या खोलीमुळे प्रस्थापित झाली आहे, असे वाटण्यासारखे वातावरण पाटील यांनी मागील दोन वर्षांत इथे निर्माण केले आहे.

कल्पनातीत वाटावी अशी या वास्तूच्या निर्मितीची कथा आहे. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आधुनिक भारतनिर्मितीत असलेल्या योगदानाला व त्यांच्या विचारांना त्यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशी वास्तू उभारावी, ही कल्पना २०१५ मध्ये मांडली आणि केवळ दोन वर्षांत या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन केले. हे एक ‘सेंटर ऑफ एसलन्स फॉर सोशिओ इकोनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन अ‍ॅण्ड बुद्धिस्ट स्टडीज’ म्हणून प्रख्यात व्हावे, हा त्यांचा मूळ उद्देश होता. ‘सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालया’अंतर्गत आता ही संस्था चालविण्यात येते. सध्या केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांचे मार्गदर्शन या संस्थेला लाभते आहे.

आता हे एक संशोधन केंद्र म्हणून आकारास येत आहे. येथे सुसज्ज वाचनालयदेखील आहे. सामान्य माणसासाठी ते निःशुल्क उपलब्ध आहे. या वाचनालयात आठ हजार ५०० पुस्तके असून, जगातील १०० देशांच्या संविधानाच्या प्रतीसुद्धा उपलब्ध आहेत. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, कित्येक केंद्रीय मंत्री, मुख्य न्यायमूर्ती, ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ हे व इतर मान्यवर इथे कार्यक्रमांच्या निमित्ताने येत असतात. या वास्तूत कायम ‘हूज हू’चा राबता असतो. तरीही, सामान्य प्रामाणिक वाचकांनाही तेवढीच आपुलकी मिळते, हे विशेष. सध्या मूलभूत संशोधनावर या केंद्राचा भर आहे, त्यादृष्टीने त्यांनी अभ्यासू लोकांची भरती येथे केली आहे. सामाजिक-आर्थिक-न्यायिक विषयात रस असणार्‍या युवकांना इथे महिन्याभराची ‘इंटर्नशिप’ पण दिली जाते.

भारताचे कायदामंत्री असताना डॉ. आंबेडकर ‘१, हार्डिंग एवेन्यू’ येथे राहत असत, नंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ‘२६, अलीपूर रोड’ येथे वास्तव्यास गेले, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे, हे ‘परिनिर्वाण स्थळ’ आहे. याच जागेवर त्यांचे स्मारक व्हावे, असा निर्णय झाल्यावर २०१८ मध्ये या वास्तूचे पुनर्निर्माण करण्यात आले व आजचे ‘डीएएनएम’ अस्तित्वात आले.

प्रवेशद्वारानंतरच्या प्रांगणातला भव्य अशोक स्तंभ आणि त्यामागे एक अतिभव्य संविधानाच्या (पुस्तकाच्या) आकाराची इमारत, अशी आहे दिल्लीतील ‘डॉ आंबेडकर नॅशनल मेमोरियल’ची (‘डीएएनएम’) वास्तू. ती दिल्ली विधानसभेजवळ आहे. इथे एक मोठे सभागृह आहे, डिजिटाईज्ड पद्धतीने डॉ. आंबेडकरांच्या जीवनचरित्राचे, आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदानाचे दर्शन विद्यार्थ्यांना घडते. आजपर्यंत जवळजवळ ३०० शाळांच्या विद्यार्थ्यांनी इथे भेट दिली आहे, संविधानासंबंधी माहिती समजून घेतली आहे; इथे असलेल्या टच-स्क्रीन्सवर आज ‘काय नवे कळले’ याबद्दल परीक्षा दिली आहे व सर्टिफिकेट्स पण प्राप्त केली आहेत. हे सगळे योजनाबद्ध रीतीने इथे राबवण्यात येते. तसेच चर्चासत्रे आयोजित करण्यात येतात.

‘१, हार्डिंग एवेन्यू’ हा केवळ एक पत्ता नाही; ही अशी ऐतिहासिक जागा आहे, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काहीकाळ वास्तव्य होते, आज तिथे पोलंडचा भारतातील दूतावास आहे. एकदा ‘डीएआयसी’च्या डायरेक्टरना एक साधा ई-मेल आला पोलिश दूतावासातून, ‘१ हार्डिंग एवेन्यू’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते, याचा काही पुरावा आपल्याकडे आहे का? आकाश पाटलांसारखा सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील निर्देशक तिथे होता म्हणून बरे, नाहीतर सरकारी कामाच्या गोंधळात हा मेल अनुत्तरितच राहायचा. पण, कर्नल साहेबांनी महिनाभर विविध सुगाव्यांचा मागोवा घेत डॉ. आंबेडकरांचे ते कायदामंत्री असतानाचे हस्तलिखित शोधून काढले. अर्थात, ते ‘भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागारा’त होते; पण जी काही धावपळ आवश्यक होती, ती केल्यानंतर त्यांना कार्यालयीन प्रक्रिया पार पडून काही छायाप्रती प्राप्त झाल्या, त्यात डॉ. आंबेडकरांचे सुंदर इंग्रजी हस्ताक्षर आणि प्रत्येक पत्राला दिलेले ‘हेडिंग’ होते, ‘१, हार्डिंग एवेन्यू’ आणि दिनांक स्पष्टपणे दिसत होता. मग, या दस्तावेजासंबंधी माहिती पोलिश एम्बसीला कळवण्यात आली.

हा एक उत्कंठावर्धित करणारा प्रसंग सांगताना आकाश पाटलांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटणे स्वाभाविक होते, त्यांनी एका ऐतिहासिक नोंदीचा पाठपुरावा केला होता, सनदशीर मार्गाने माहिती पुरवली होती. खरेतर सरकारी कामाच्या ओझ्याखाली त्यांनी या ईमेलकडे दुर्लक्ष केले असते, तरी चालण्यासारखे होते. कोणी त्यांना प्रश्न विचारायला आले नसते; पण एक कर्त्यव्यदक्ष अधिकारी जेव्हा जबाबदारीने अधिकारांचे व कर्तव्याचे निर्वहन करत असतो, तेव्हा तो काय चमत्कार करू शकतो, हे या प्रसंगातून अनुभवास येते. असाच चमत्कार त्यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात या दोन वास्तूंची प्रतिष्ठा राखण्यात व उंचावण्यात केला आहे. दिल्लीला भेट देणार्‍या प्रत्येक मराठी माणसाने तरी आवर्जून या दोन वास्तूंना भेट द्यावी, तरच हा लेख सार्थकी लागेल.



- जीवन तळेगावकर