राष्ट्रीय पर्यटन दिन - संस्कृती, समाज आणि अर्थव्यवस्थेला जोडणारा सेतू

    08-Feb-2026
Total Views |

पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नव्हे; ते समाजाला आत्मभान देणारे, संस्कृतीला जिवंत ठेवणारे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे एक सशक्त माध्यम आहे. नुकताच दि. २५ जानेवारी रोजी आपण ‘राष्ट्रीय पर्यटन दिवस’ साजरा केला. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, देशाची खरी ओळख केवळ आधुनिक शहरांमध्ये नसून ती मंदिरांमध्ये, वारसास्थळांमध्ये आणि लोकपरंपरांमध्ये दडलेली आहे. तेव्हा, आज अशाच काही मंदिरांची ओळख करून घेऊया...

जागतिक वारसा पर्यटन’ (हेरिटेज टुरिझम) भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, २०२३ मध्ये सुमारे ६.२ दशलक्षाहून अधिक परदेशी पर्यटकांनी भारतातील ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या होत्या. पर्यटनामुळे स्थानिक समुदायांना रोजगार मिळतो, हस्तकला आणि परंपरागत ज्ञानाला नवी बाजारपेठ मिळते आणि सांस्कृतिक अस्मितादेखील जागृत राहते. विशेषतः मंदिर पर्यटन भारताच्या आध्यात्मिक आणि स्थापत्य परंपरेचे जिवंत दर्शन घडवते. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर दगडात कोरलेली परंपरा, हजारो वर्षांचा इतिहास सांगत आजही दिमाखात उभी आहे. पर्यटन दिवसाच्या निमित्ताने प्रमुख शहरांपासून जवळ असणार्‍या महत्त्वाच्या पाच मंदिरांचा आढावा घेणार आहोत. यातले एखादे तरी मंदिर आवर्जून बघून या आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा.

१. कैलास मंदिर - वेरूळ; जवळचे शहर - छत्रपती संभाजीनगर

वेरूळमधील कैलास मंदिर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या स्थापत्य इतिहासातील एक अचंबित करणारे शिल्पकाव्य आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला (इ.स. आठवे शतक) याच्या काळात उभारलेले हे मंदिर एका अखंड पर्वतशिलेतून खाली उत्खनन करून साकारले गेले आहे. ही बाबच त्याला अद्वितीय बनवते. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेले हे मंदिर, दरवर्षी सुमारे दहा ते १५ लाख पर्यटकांना आकर्षित करते. वरून खाली कोरलेले हे मंदिर म्हणजे, मानवी बुद्धी, श्रद्धा आणि शिल्पकलेचा परमोच्च संगम आहे.

स्थापत्य वैशिष्ट्ये : हे मंदिर द्रविड-शैलीतील असून, यात शिखर, गर्भगृह, मंडप, नंदीमंडप आणि सभामंडप हे भाग प्रमाणबद्धतेने आढळतात. यातील सर्वात मोठे स्थापत्य वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराची रचना एकाच खडकातून कोरीवकाम करून तयार केली आहे, ज्यामध्ये भिंतीवरील ‘रामायण’-‘महाभारत’ शिल्पपट आणि खांबांवर कोरलेल्या सुंदर कलाकृती यांचाही समावेश आहे. हे पाहताना काळ थांबल्यासारखेच वाटते. आज हजारो पर्यटक वेरूळला भेट देतात; पण कैलास मंदिरात उभे राहिल्यावर हे केवळ पर्यटनाचे स्थळ न राहता, एक आध्यात्मिक अनुभूती देणारे केंद्र होते .

२. अंबरनाथ शिव मंदिर, मुंबई महानगर परिसर

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शिव मंदिर हे कोकणातील प्राचीन स्थापत्य-वैभवाचे तेजस्वी उदाहरण आहे. इ.स. ११व्या शतकात शिलाहार राजवंशाच्या काळात उभारलेले हे मंदिर, नागरशैलीचे उत्कृष्ट प्रतीक होय. भरीव काळ्या दगडात (बेसाल्ट) बांधलेले हे मंदिर, आजही उल्हास नदीच्या काठी शांतपणे उभे आहे.

स्थापत्य वैशिष्ट्ये : हे मंदिर भूमीज उपशैलीतील नागर स्थापत्याचे असून, याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, याचा अष्टाकृती मंडप होय. मंदिराच्या बाह्य भिंतींवर देवकोष्ठ आणि जंघा (बाह्य भिंतीवर शिल्पं असलेल्या भागाला ‘जंघा’ म्हणतात)मध्ये, नर्तक-अप्सरा, गंधर्व, शिवगण आणि दैवी आकृती अत्यंत सूक्ष्मतेने कोरलेल्या आहेत. मंदिराचे शिखर हे अनेक उरू-श्रृंग (छोटी शिखरे) यांनी वेढलेले आहे. शहराच्या गजबजाटापासून काहीसे दूर अंतरावर असलेले हे देवालय आज अनेक पर्यटकांच्या नजरेतून सुटते. पण, जे येथे येतात त्यांना समजते की, अंबरनाथ म्हणजे दगडात साठवलेली भक्ती आणि सौंदर्याचे एक समृद्ध काव्य आहे.

३. काशी विश्वेश्वर मंदिर, बारामती

भीमा नदीच्या काठी वसलेले काशी विश्वेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील दुर्लक्षित; पण अत्यंत महत्त्वाचे शैवतीर्थ. यादवकालीन स्थापत्याची छाप असलेले हे मंदिर बारामतीच्या सांस्कृतिक इतिहासाचे साक्षीदार आहे. ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे हे स्थान शैवपरंपरेतील महत्त्वाचे केंद्र मानले जाते.

स्थापत्य वैशिष्ट्ये : यादवकालीन मंदिरांची साधी आणि आकर्षक रचना येथे आढळते. मंदिरामध्ये गर्भगृह आणि सभामंडप हे मुख्य भाग आहेत. सभामंडपातील स्तंभ हे त्या काळातील शिल्पांचे उत्तम नमुने आहेत. या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असूनही, हे स्थळ अद्याप मोठ्या पर्यटन नकाशावर आलेले नाही. मात्र, स्थानिक आणि धार्मिक पर्यटकांसाठी हे महत्त्वाचे केंद्र असून, दरवर्षी महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे भेट देतात. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ अधिकाधिक प्रकाशात येणे आवश्यक आहे.

४. कोप्पेश्वर महादेव मंदिर - खिद्रापूर; जवळचे शहर - कोल्हापूर, सांगली

कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोप्पेश्वर महादेव मंदिर हे चालुक्य स्थापत्याचे एक अलौकिक रत्न आहे. इ.स. १२व्या शतकात बांधलेले हे मंदिर त्याच्या खुल्या मंडपांसाठी आणि स्तंभशिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. विशेष बाब म्हणजे, या मंदिरात नंदीची मूर्ती नाही, हे शैव मंदिर असूनही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

स्थापत्य वैशिष्ट्ये : चालुक्य स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ‘वितान’ अर्थात, छत नसलेला स्वर्गमंडप. मंदिराचे गर्भगृह आणि प्रदक्षिणापथ हे महत्त्वपूर्ण आहेत. मंदिरातील स्तंभांवरील ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, दिपाल आणि नृत्य-मुद्रांतील अप्सरा, हे शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. कृष्णा नदीच्या काठी उभे असलेले हे मंदिर आजही निरव शांततेत आहे, जणू काळाच्या विस्मृतीत गेल्यासारखे. पण, स्थापत्य अभ्यासकांसाठी आणि संवेदनशील प्रवाशांसाठी मात्र हे मंदिर एक सुखद अनुभव देणारे आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला स्वर्गमंडपाच्या मधोमध येणारा चंद्र बघण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमधून भाविक इथे आवर्जून येतात.

५. गोंदेश्वर मंदिर - सिन्नर; जवळचे शहर - नाशिक

नाशिकजवळील गोंदेश्वर महादेव मंदिर हे यादवकालीन स्थापत्याचे परिपूर्ण उदाहरण. काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेले हे मंदिर, उत्तर भारतातील नागरशैलीचे प्रभावी दर्शन घडवते. एकाच मोठ्या जगती (राईज्ड प्लॅटफॉर्म)वर उभारलेल्या या मंदिराची रचना पंचायतन प्रकारची आहे, म्हणजे एका मुख्य मंदिरासोबत चार उपदेवालये (सब श्रीन्स) आहेत. उंच शिखर, सुबक गर्भगृह आणि चार दिशांना असलेली उपदेवालये ही या मंदिराची वैशिष्ट्ये.

स्थापत्य वैशिष्ट्ये :
हे मंदिर नागरशैलीतील महामरू-गुर्जर स्थापत्याचे उदाहरण आहे, ज्यामध्ये अनेक स्तरांचे शिखर आढळते. मुख्य मंदिराचे गर्भगृह आणि समोरचा मंडप हे कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहेत. मंदिर परिसरातील शांतता आणि शिल्पांची शिस्तबद्ध रचना मनाला स्थैर्य देते. सिन्नर परिसरात असूनही हे मंदिर तुलनेने कमी ओळखले जाते. मात्र, त्याची स्थापत्य गुणवत्ता आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता, ते महाराष्ट्रातील प्रमुख मंदिर पर्यटन स्थळांमध्ये गणले गेले पाहिजे. नाशिक परिसरातील ‘धार्मिक पर्यटन सर्किट’मध्ये याचा समावेश असल्याने हे स्थळ दरवर्षी हजारो देशी पर्यटकांना आकर्षित करते.

‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ आपल्याला केवळ प्रवासाची प्रेरणाच देत नाही, तर आपल्या वारशाशी नाते जोडण्याची जबाबदारीही देतो. महाराष्ट्रातील ही मंदिरे दगडात कोरलेला इतिहास, श्रद्धेतून साकारलेली समाज केंद्रे आणि पर्यटनातून उभी राहाणार्‍या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ ठरतात. ही स्थळे पाहणे म्हणजे फक्त भेट देणे एवढेच नसून, आपल्या संस्कृतीला समजून घेणेही त्यात अंतर्भूत आहे. किमान एकदा तरी या मंदिरांपाशी थांबा. कारण, काही वास्तू पाहण्यासाठी नसतात, त्या अनुभवण्यासाठी असतात.



- इंद्रनील बंकापुरे