लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध; बहुआयामी गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचे मत

    08-Feb-2026
Total Views |
Dr. Mridula Dadhe-Joshi
 
ठाणे : (Dr. Mridula Dadhe-Joshi) स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या आपल्या सर्वांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत. लतादीदींच्या प्रत्येक गाण्यामागे एक विचार होता. तो विचार आपण समजून घेतल्यास आपले जीवन समृद्ध होईल, असे मत बहुआयामी गायिका व संगीत अभ्यासक डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी व्यक्त केले.
 
ठाणे पूर्व येथील सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात सलग २२ व्या वर्षी व्याख्यानमाला भरविण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत शनिवारी प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी `अमृतलता' भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गायकीचे मर्म उलगडणारे दुसरे पुष्प गुंफले. शैला परब व अर्चना अनाप यांनी स्वागत केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष मधुसुदन संजीवा, कार्यवाह सतीश सावंत, पदाधिकारी समीर चव्हाण, अनंता सुर्वे, गुरु स्वामी, अंजन दांडेकर, शिरीष अनाप, सुभाष नाईक यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण, सीए संजीव ब्रम्हे यांच्यासह मान्यवरांचीही उपस्थिती होती.
 
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाला मंत्रोपचाराचे सामर्थ्य व पावित्र्य आहे. त्यांचे नाव उच्चारल्यास त्यांचा स्वर्गीय आवाज, माधुर्य, तेज आणि असंख्य गाणी कानात गुंजायला लागतात. त्यांचे गाणे म्हणजे सर्व घटकांचे प्रमाणबद्ध मिश्रण असून, त्यांची गाणी कधीही भावविव्हळ झाली नाहीत, असे डॉ. जोशी यांनी नमूद केले.
 
हेही वाचा : कल्याणात ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन
 
लतादीदींची गायकी ही ओमकारयुक्त असून, त्याला विविध छटा होत्या. त्यांनी गाण्यात मनाचे सूक्ष्म पदर, भावना तसेच, व्यामिश्र किचकट जागा टिपल्या. दु:खालाही अनेक छटा असतात, हे लतादीदींनी संगीत क्षेत्राला गाण्यांमधून दाखवून दिले. त्यांनी गीतातील अनुस्वारांचाही वापर करून स्वराला हळवा स्पर्श मिळवून दिला. संगीतकार श्रीनिवास खळे यांची अनेक कठीण गीते त्यांच्या गळ्यामुळे सोपी झाली, असे त्या म्हणाल्या.
 
प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांनी लतादीदींमधील प्रतिभा हेरली. सुरुवातीला त्यांचा आवाज नाजूक, बारीक आणि पातळ असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. मात्र, गुलाम हैदर यांनी ही लता इतिहास घडवेल, असे भाकीत केले. ते खरे ठरले. लतादीदींच्या आगमनाने भारतीय संगीत क्षेत्राचा कॅनव्हास मोठा झाला किंबहुना, लतादिदींमुळे अनेक संगीतकार बहरले. वेगवेगळ्या पातळयांवर त्यांचा आवाज काम करीत असे, त्यामुळे अनेक गायकांना शिकायला मिळालं. अनिल विश्वास यांच्याकडून लतादीदींनी श्वासाचे तंत्र शिकून घेतल्यानंतर एका श्वासात गाणे गाण्याची त्यांनी क्षमता प्राप्त केली.
 
प्रत्येक गाण्यातील त्यांची उच्चार करण्याची पद्धत व त्यातील प्रवाह पाहून आपण स्तिमित होतो. प्रत्येक गाण्यासाठी त्यांच्याकडे वेगळा आवाज होता. गाण्यातील काही विशिष्ट ठिकाणी आवाज कंपन करण्याची त्यांची क्षमता होती, ६ फेब्रुवारी हा त्यांचा प्रथम पुण्यस्मरण होता. ज्या गायिकेच्या श्वासाला जगात तोड नाही, त्यांना अखेरच्या क्षणी मात्र कृत्रिम श्वासावर ठेवले होते, अशी करूण आठवणही डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी जागवली. डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी विविध गीतांच्या माध्यमातून लता मंगेशकर यांच्या आवाजातील वैशिष्ट्ये सादर केली. त्याला रसिकांची दाद मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित नागरे यांनी केले.