२०४७ : विभाजनाची भिती नव्हे, तर अखंड भारताचा संकल्प करावा; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आवाहन

08 Feb 2026 16:43:48

 
मुंबई : (Dr. Mohanji Bhagwat) भारतावर ५०० वर्षे राज्य करूनही आक्रमक जे करू शकले नाहीत, ते आता काय करणार? असा रोकडा सवाल करतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सन २०४७ मध्ये भारत विभाजित होईल, अशी भीती बाळगण्यापेक्षा तोपर्यंत अखंड भारत साकारण्याचे आवाहन केले.

संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित 'संघ प्रवासाची १०० वर्षे : नवे क्षितिज' या दोन दिवसीय संवाद कार्यक्रमात मुंबईतील ९०० हून अधिक प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तिमत्त्वांना त्यांनी संबोधित केले. नेहरू सेंटर, वरळी येथे रविवार, दि. ०८ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या प्रश्नोत्तांच्या सत्रात डॉ. मोहनजी भागवत यांनी सहभागी सदस्यांनी विचारलेल्या विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक अशा विविध विषयांवरील थेट प्रश्नांवर उत्तरे दिली. याप्रसंगी व्यासपीठावर पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ.जयंतीभाई भाडेसीया, कोकण प्रांत संघचालक अर्जुन चांदेकर, मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया उपस्थित होते.

उपस्थितांनी मांडलेल्या एकूण १४३ प्रश्नांचे १४ श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले. त्यातील संघनीती, हिंदुत्व, राष्ट्रीय परिदृष्य, शिक्षण, अर्थकारण, राजकारण, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा, संस्कृती, कला, क्रीडा व भाषा तसेच जीवनशैली, पर्यावरण, इ. विविध विषयांवरील प्रश्नांना सरसंघचालकांनी समर्पक उत्तरे दिली.

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करताना सरसंघचालकांनी बांगलादेशातील सव्वाकोटी हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केले. असे झाल्यास अत्याचाराला आपोआपच पायबंद घातला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 'संघप्रवासाची १०० वर्ष : नवे क्षितिज' सरसंघचालकांचे उद्बोधन
 
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र यातील कोणीही नव्हे तर हिंदू हाच संघाचा सरसंघचालक असेल, असे प्रतिपादन करतानाच संघाचे सरसंघचालक होण्यासाठी कोणतीही जात असणे हा अडसर वा गुणवत्तेची अट नाही, भविष्यात अनुसुचित जाती किंवा जमातीचे कार्यकर्ते देखील सरसंघचालक होऊ शकतात. असा विश्वास डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला.

ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय अथवा अत्याचार झाला, त्यांचे सर्वांगीण उत्थान होईपर्यंत व त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईपर्यंत संविधानसंमत आरक्षण हे लागू राहिले पाहिजे, अशी संघाची निःसंदिग्ध भूमिका सरसंघचालकांनी यावेळी बोलताना मांडली.

संघाच्या स्वयंसेवकांनी भ्रष्टाचार विरोधात सुरु असलेल्या आंदोलनांचा अथवा सर्वप्रकारच्या प्रयत्नांचा भाग व्हावे अशी संघाची भूमिका आहे. मात्र केवळ कायदे करून भ्रष्टाचाराला लगाम लावणे अवघड असून त्यासाठी सुसंस्कारीत समाजमन घडवीणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कोणतीही व्यवस्था ही मूलतःच भ्रष्ट नसते; तर अशा व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीचे मन हे भ्रष्ट असते आणि त्यामुळेच ती व्यवस्था भ्रष्ट होते. याकडेही डॉ. मोहनजी भागवत यांनी लक्ष वेधले.

जोरजबरदस्ती अथवा लालूच दाखवून मतांतरण होत असेल तर ते निषेधार्हच आहे, त्याला प्रत्युत्तर हे घरवापसी असेल असे स्पष्ट करतानाच एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अथवा स्वप्रेरणेने मतांतरण करताना कोणाचाही विरोध नसल्याची भूमिका यावेळी सरसंघचालकांनी मांडली. लोकसंख्येचे गुणोत्तर हे केवळ जन्मदरातील घटीमुळे बदलत नसून, ते मतांतरण व अवैध घुसखोरी यामुळेही बदलत असल्याकडे लक्ष वेधतानाच अवैध घुसखोरी संदर्भात डिटेक्ट अॅण्ड डिपोर्ट हे धोरण कठोरपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. विदेशी अवैध घुसखोरांना रोजगार देण्याऐवजी तो आपल्या देशातील हिंदू अथवा मुस्लिमांना का देऊ नये, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हिंदू आणि शीख पूर्वीपासून एकच होते; आजही रोटी-बेटीचे संबंध आहेत. रक्ताचे नाते आहे. पूजापद्धती वेगळी मानली जाऊ शकते; त्यांच्या वैशिष्ट्याला मान्यता द्यावी, पण ते वेगळे नाहीत. आम्ही सर्व धर्म एकाच परंपरेतून आलो आहोत. गुरु ग्रंथ साहेबमध्ये केवळ शीख गुरुंचीच नव्हे, तर संपूर्ण भारतातील संतांची वाणी संकलित केली आहे. 'हिंद की चादर' म्हणून ओळखली जाणारी ही जुनी एकता पुन्हा प्रस्थापित करायची आहे. समाजाच्या नात्याने आपण सर्व एक आहोत, हेही लक्षात ठेवले पाहिजे. हिंदू असा स्वतंत्र कोणताही धर्म अस्तित्वात नाही. आज आपण ज्याला हिंदू धर्म म्हणून ओळखतो, तोच प्राचीन सनातन धर्म आहे. तथागत बुद्धांनी आपल्या विविध प्रवचनांतून याच सनातन धर्मात कालसुसंगत सुधारणा केल्याचे प्रतिपादित केले आहे. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचा पुनरुच्चार केला असल्याचे सरसंघचालकांनी नमूद केले.

या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील मान्यवर, डॉक्टर, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, क्रीडापटू, माध्यम प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे सदस्य, धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, सोशल मीडिया प्रभावक तसेच जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले होते.

ईसा मसीहा यांना प्रतिपादित केलेला ख्रिस्ती व मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेला इस्लाम हा आज त्याच स्वरूपात दिसत नाही. याचे कारण त्यांच्यानंतर या दोन्ही पंथांमध्ये राजकीय तत्त्वांनी वर्चस्व प्राप्त केले. त्यामुळे या पंथांतील आध्यात्मिकता मागे पडून राजकीय हितसंबंघ अधिक पुढे आले. त्यामुळे या पंथांच्या मूळ आध्यात्मिक तत्वांना चालना दिल्यास जगभरातील राजकीय संघर्ष कमी होऊ शकतील असा विश्वास डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला.
 
हे वाचलत का? - Dr. Mohanji Bhagwat : समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
 
भारतरत्न हा सन्मान न मिळताही स्वातंत्र्यवीर सावरकर हे कोट्यावधी भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. तथापि, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न सन्मान दिल्यास या सन्मानाची प्रतिष्ठा वाढेल, असे सरसंघचालक म्हणाले.

भाजप सत्तेत आल्यामुळे संघाला कोणताही थेट फायदा झाला असे नसून संघाच्या समाजातील वाढलेल्या शक्तीचा, स्वीकारार्हतेचा समविचारी व भारतीय नीतींचे अनुसरण करणाऱ्या पक्षांना फायदा झाला, हे महत्त्वाचे आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी घेतलेले सातत्यपूर्ण परिश्रम व संघाला समाजाने दिलेला स्नेह व दाखवलेला विश्वास यामुळेच संघाचे काम वाढले आहे. संघाशी संबंधित संस्था, संघटना अथवा पक्ष यांच्यावर संघ दबाव टाकत नाही. याठिकाणी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पुरेसे स्वातंत्र्य असते, ज्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्णय व प्रयोग जबाबदारीने करू शकतात. ते जी चांगली कामे करतात त्याचे श्रेय त्यांचेच आहे, मात्र ज्या कमतरता राहतात त्याचे आक्षेप पालक या नात्याने आमच्याकडे येतात व ती नैतिक जबाबदारी आम्ही घेतो. परंतु संघाचे काम हे केवळ आणि केवळ व्यक्तिनिर्माणाचेच काम आहे. विशिष्ट क्षेत्रात काम करणे हे संघाचे काम नाही, असे स्पष्ट विवेचन डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

समान नागरी कायद्यावर भूमिका मांडताना सरसंघचालकांनी सांगितले की, समाजाची मानसिकता बनवून व सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन अशाप्रकारचा कायदा लागू करावा असे आमचे मत आहे. उत्तराखंड व अन्य काही राज्यांत तशाच प्रकारचे प्रयोग होत असल्यामुळे आम्ही त्याचे स्वागत करतो. भारत हा विविधतेतून एकता जपणारा देश आहे, हे सूत्र अशा प्रकारचे कायदे बनवताना प्राधान्याने लक्षात ठेवले पाहिजे अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी व्यक्त केली.

संघातील कार्यकर्त्यांचे सरासरी वय हे २८ वर्षे आहे. ते २५ च्या खाली येण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. देशातील युवक हे देशप्रेमी व नैतिक आचरण करणारे आहेत. त्यांना त्यांच्या भाषेत मुद्दे पटवून दिले तर ते स्वीकारतात व त्याचे आचरणही करतात. त्यामुळे तर्कशुद्ध पद्धतीने आपल्या मूळ विचारांपर्यंत त्यांना घेऊन गेले पाहिजे. त्यांना प्रयोग करण्याची संधी व स्वातंत्र्य दिले पाहिजे व अशा प्रयोगात काही चूक झाल्यास आपण त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे. त्यांची जिज्ञासा तृप्त करण्याची क्षमता सध्याच्या पिढीने वाढविली, तर आपोआपच युवापिढी आणि सध्याची पिढी या दोघांच्या समन्वयातून भविष्यातील समर्थ भारताचे रूप साकार होईल. भारतीय तत्वज्ञानाचा प्रभाव हा अंतरंगापर्यंत पोहोचतो, तर पाश्चिमात्य प्रभाव हा वरवरचा असतो, असे सरसंघचालक म्हणाले.

<!-- Inject Script Filtered -->
 
दै. 'मुंबई तरुण भारत'च्या रविवार दिनांक, ८ फेब्रुवारीच्या अंकात 'संघप्रवासाची १०० वर्षे : नवे क्षितिज' या व्याख्यानमालेतील सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे संपूर्ण उद्बोधन प्रकाशित करण्यात आले आहे. याची सरसंघचालकांनीही दखल घेतली. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात जे पहिल्या दिवशी उपस्थित नव्हते, त्यांना संघात सहभागी होण्यासाठीचे ५ पर्याय कोणते, यासाठी दै. 'मुंबई तरुण भारत'मधील संपूर्ण भाषण वाचण्याचे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0