मुंबई : ‘देवखेळ’ या वेबसीरिजवरून गेले काही दिवस कोकणात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वीदेखील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही यावर आक्षेप घेतला होता. ही वेबसीरिज झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ‘नमन-खेळे’ या पारंपरिक लोककलेचे विपरित व आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि कलावंत संघटनांनी केला आहे.
यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात आशिष शेलार यांनी म्हटले आहे,
“महोदय,
‘देवखेळ’ ही वेबसीरिज नुकतीच झी ५ या ओटीटीवर प्रसारित करण्यात आली आहे. ही वेबसीरिज रत्नागिरी जिल्ह्यातील “नमन-खेळे” या लोककलेचे विपरीत चित्रण करणारी व या लोककलेतील लोकदेवत म्हणून पूजल्या जाणाऱ्या “शंकरा” या प्रमुख पात्राचे अपमानकारक चित्रण करणारी आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या वेबसीरिजला कोकणातून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या लोककलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या कलावंतांच्या विविध संघटनांनी त्याला विरोध करून सरकार म्हणून मला निवेदनही दिले आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नमन खेळे ही अत्यंत लोकप्रिय व पारंपरिक लोककला असून सामाजिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेली ही हिंदू धर्म परंपरा जतन करणारी लोककलेची एक अग्रगण्य लोककला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामदेवतांशी या लोककलेचा थेट संबंध असल्याने त्याला धार्मिक दृष्ट्याही एक पावित्र्य व अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्यामार्फत ही कला जतन व संवर्धन करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. कोकणात शिवरायांच्या या कलेचा जागर सर्वत्र होत असताना १ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आपल्या शासनातर्फे या नमन कलेचा महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. या कलेत योगदान देणाऱ्या कलावंतांना आपण राज्य शासनाचे पुरस्कार देऊन सन्मानित करतो तसेच वृद्ध कलाकार मानधन योजनेंतही या कलेचा समावेश शासनाने केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सन्मान केलेली ही लोककला आहे.
त्यामुळे या वेबसीरिजमुळे पारंपरिक व खूप जुन्या लोकपरंपरेला धक्का लागला असल्याची जनमानसात भावना तीव्र दिसून येत आहे. या वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत असून वेबसीरिज विरोधात वाढता रोष व कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिवजयंतीचा सण जवळ आला असताना अशाप्रकारचे तणावाचे वातावरण निर्माण होणे योग्य नाही.
म्हणूनच आपण याबाबत लक्ष घालून तातडीने योग्य व उचित कारवाई करावी ही विनंती.”

दरम्यान, शिवजयंतीसारखा महत्त्वाचा उत्सव जवळ आलेला असताना अशा प्रकारचे तणावपूर्ण वातावरण निर्माण होणे योग्य नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ‘देवखेळ’ वेबसीरिजप्रकरणी शासनाने लक्ष घालून तातडीने योग्य आणि उचित कारवाई करावी, अशी मागणी मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.