लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘शिवराज अष्टका’तील एकूण पाच चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता सहावे पुष्प असलेला ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात दाखल झाला. यापूव, आलेले ‘फर्जंद’ (2018), ‘फत्तेशिकस्त’ (2019), ‘पावनखिंड’ (2022), ‘शेर शिवराज’ (2022), आणि ‘सुभेदार’ (2023) हे या अष्टकातील चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले होते. त्यामुळे या सहाव्या चित्रपटाकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजित श्वेतचंद्र दिसणार आहे. तेव्हा हा चित्रपट नेमका कसा आहे, ते जाणून घेऊया...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या तेजस्वी पराक्रमासोबत त्यांचे बुद्धिचातुर्य हा संपूर्ण कार्याचा सदैव केंद्रबिंदू राहिला. छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी योद्धे होते, हे अनेक मोहिमांमधून अनेकदा सिद्ध झाले. महाराजांनी समोरील शत्रू कितीही बलाढ्य, बलशाली असला, तरी त्याचा ‘गनिमी काव्या’च्या कूटनीतीतून अत्यंत प्रभावीपणे पराभव केला. शत्रू बेसावध असतानाच काटेकोर रणनीती आखून त्याच्यावर सर्व ताकदीनिशी तुटून पडायचे, ही तर महाराजांच्या युद्धनीतीची एक खासियत होती. औरंगजेबाचे मुघल साम्राज्य मजबूत, शक्तिशाली मानले जायचे. अशा या साम्राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ जोरदार हादराच दिला नाही, तर सुरुंगही लावला आणि याची मोठी ठिणगी त्यांच्या आग्राभेटीतच लागली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्राभेट ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेलेली अशीच एक ऐतिहासिक घटना आणि हा सगळा शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
ऐतिहासिक चित्रपट म्हटले की, बरेचदा अनेकदा कथानक हे प्रेक्षकांना परिचित असते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात आणि स्मरणात अगदी खोलवर रुजलेला. तरीही, शिवरायांच्या पराक्रमाचे, धैर्याचे आणि दूरदृष्टीचे दर्शन मोठ्या पडद्यावर पुन्हा-पुन्हा पाहण्याची ओढ प्रेक्षकांना कायम असते. म्हणूनच, जेव्हा अशा चित्रपटांचे सादरीकरण भक्कम असते, तेव्हा हाच परिचित इतिहास पाहण्यासाठीही प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात गद करतात.
या चित्रपटाची कथा सुरू होते ती, क्रूर औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या करून आग्र्याची सत्ता हस्तगत केल्यापासून; दुसऱ्या बाजूला उभा राहतो ‘जाणता राजा’ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यासोबत राजमाता जिजाऊसाहेब आणि चिमुकले शंभूराजे. कथानक समजून घेण्यासाठी पुरंदरचा तह, महाराजांची सुरत स्वारी यांसारखे महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ योग्य ठिकाणी दिग्दर्शकाने कथानकात गुंफले आहेत. चित्रपटाच्या प्रारंभी काही दमदार युद्धसंघर्षाची दृश्ये पाहायला मिळतात, जी कथेला गती देतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाण्याचा निर्णय का घेतला? औरंगजेबाची भेट घेण्यामागे त्यांचा नेमका काय हेतू होता? ही स्वारी केवळ राजनैतिक होती की, त्यामागे एखादी गुप्त योजना दडलेली होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कथा पुढे सरकत असताना हळूहळू उलगडत जातात.
चित्रपटात शिवरायांचा ‘गनिमी कावा’, मावळ्यांचे शौर्य आणि त्यांची स्वराज्यावरील निष्ठा अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. तसेच राजमाता जिजाऊंची संवेदनशील आणि भावनिक बाजूही प्रेक्षकांना नक्कीच भावनिक करुन जाते. त्याचबरोबर शत्रूसाठी कठोर, डोळ्यांत ज्वाला असलेले; प्रसंगी आपल्या निडर मावळ्यांसाठी, शूरवीर सहकाऱ्यांसाठी, लाडक्या शंभूराजांसाठी हळवे होणारे पिता व ‘रयतेचा कर्तव्यदक्ष राजा’ असे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व कंगोरे दिग्दर्शकाने प्रभावपणे चितारले आहेत. इतिहासातील पराक्रमासोबतच माणुसकीची, नात्यांची आणि भावनांची ही मांडणी चित्रपटाला आणखी सुंदर आणि वेगळी दिशा देते.
या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकर यांनी लीलया सांभाळली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी स्वतः बहिज नाईक ही अत्यंत महत्त्वाची भूमिकादेखील या चित्रपटात साकारलेली पाहायला मिळेल. या भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी नवीन कलाकाराची निवड करण्यात आली आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या आधीच्या चित्रपटांमध्ये शिवरायांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी साकारली होती. यावेळी हे शिवधनुष्य अभिजित श्वेतचंद्र यांनी पेलण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. अभिजितची देहबोली, संवादफेक आणि एकूणच वावर पाहता, तो महाराजांच्या भूमिकेत साजेसा वाटतो. औरंगजेबाच्या क्रूर भूमिकेत अभिनेते समीर धर्माधिकारी झळकतात. त्यांनी या नकारात्मक पात्राला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटातील युद्धप्रसंगांची दृश्ये आणखी प्रभावी आणि भव्यपणे मांडता आली असती, असे वारंवार जाणवते. त्याचप्रमाणे डबिंग आणि सेट डिझाईन (नेपथ्य) या दोन्ही बाबतीत काही सुधारणा करता आल्या असत्या. उदाहरणार्थ, दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या औरंगजेबाचा महाल अपेक्षेपेक्षा साधा दाखवण्यात आला आहे, जो त्या काळातील सत्तेच्या भव्यतेशी तितकासा सुसंगत वाटत नाही. तरीही, अशा काही क्षुल्लक त्रुटी बाजूला ठेवल्या, तर या चित्रपटाच्या कथानकात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद नक्कीच आहे. शिवरायांच्या आग्रा स्वारीचा इतिहास सर्वश्रुत असला, तरीही चित्रपटात ‘सस्पेन्स’ कायम राखण्यात आला आहे आणि त्यामुळे ही कथा अखेरपर्यंत पाहण्याची उत्सुकता टिकून राहते.
या चित्रपटात कलाकारांची मोठी फौजच दिग्पाल लांजेकर यांनी मैदानात उतरवली आहे. मृणाल कुलकण, अभिजित श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकण, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना आणि नूपुर दैठणकर असे अनेक अनुभवी व तरुण कलाकार या चित्रपटात झळकतात. यामध्ये मृणाल कुलकण यांनी साकारलेली राजमाता जिजाबाईंची भूमिका विशेष लक्ष वेधून घेते. जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील कणखरपणा, वात्सल्य आणि भावनिक खोली त्यांनी पुन्हा एकदा प्रभावीपणे पडद्यावर साकारली आहे. चित्रपटात गाण्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली असून, ती कथानकाच्या प्रवाहाशी सुसंगत आहे. त्यामुळे कथा कुठेही भरकटत नाही. संवाद साधे, पण अतिशय परिणामकारक आहेत. एकूणच, आशय, सादरीकरण आणि भावनिक मांडणी यांचा समतोल साधण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. त्यामुळे हा चित्रपट सहकुटुंब, सहपरिवार नक्कीच पाहण्याजोगा आहे आणि इतिहास, भावना आणि संस्कृती यांचा अनुभव तो एकत्र देतो.
लेखन-दिग्दर्शन : दिग्पाल लांजेकर
निर्मिती : पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी
कलाकार : अभिजित श्वेतचंद्र, मृणाल कुलकण, समीर धर्माधिकारी, दिग्पाल लांजेकर, अजय पूरकर, स्मिता शेवाळे
रेटिंग : ३
- अपर्णा कड