चित्रांमधून उमटलेला तत्त्वविचार

07 Feb 2026 15:05:06
Jehangir Art Gallery
 
मुंबईतील जहांगीर कलादालन म्हणजे अनेकांसाठी चित्रप्रदर्शनाची पंढरीच! वर्षाचे ३६५ दिवस विविध विषयांना वाहिलेली चित्रप्रदर्शने आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतात. मात्र, सध्या तिथे सुरू असलेलं ‌‘द आर्ट ऑफ कॉन्सोलेशन‌’ ही चित्रांची मालिका म्हणजे मुलखावेगळी प्रस्तुती आहे, असे म्हणावे लागेल. डॉ. सुधीर पिलाई यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेली चित्रं दि. ८ फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुली आहेत. एकाच वेळेला चित्रकला, मानशास्त्र आणि तत्त्वज्ञान अशा तिन्ही शाखांच्या माध्यमातून एक वेगळा विचार त्यांनी यानिमित्ताने रसिक प्रेक्षकांसमोर मांडला आहे. या चित्रप्रदर्शनाचे विविधांगी पदर उलगडणारा हा लेख.
 
कोणा कारणे हे झालेसे निर्माण
देवाचे कारण देव जाणे॥ - संत तुकाराम
 
माणसाला ज्या क्षणी आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली, तेव्हापासून तो असंख्य प्रश्नांनी वेढला गेला. एकाप्रकारे त्याच्या जाणिवांनीच त्याच्या भोवती प्रश्नांचं जाळं विणायला सुरुवात केली. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ‌‘कोऽहम‌’ ते ‌‘सोऽहम‌’ हा प्रवास आपल्याला अनुभवायला मिळतो. जगभरात वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये या विषयाला धरून अनेक वेगवेगळे विचार मांडण्यात आले. या साऱ्याच्या संगमातूनच तत्त्वज्ञानाची विद्याशाखा जन्माला आली. तत्त्वज्ञान म्हणजे नेमकं काय, इथपासून ते तुमच्या-माझ्या जीवनाच्या दैनंदिन क्रियेशी निगडित असंख्य प्रश्नांचा धांडोळा या विद्याशाखेत लोकांनी घेतला. प्राचीन काळापासून माणसाच्या जीवनाला दिशा देण्याचे काम या विद्येच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु, माणसाच्या उन्नतीचा विचार हा केवळ एकाच परिप्रेक्ष्यातून होतो असे नाही, तर त्यासाठी जीवनाचे वेगवेगळे दृष्टिकोन आत्मसात करावे लागतात, हेही तितकेच सत्य. म्हणूनच, नजीकच्या काळात समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आदी विद्याशाखांचा उदय झाला. या सगळ्यामध्ये चित्रकला तर आदिम काळापासून माणसाच्या सोबत होतीच. मात्र, कालौघात तिलासुद्धा अनेक प्रवाह जोडले गेले. चित्रांच्या विश्वामध्ये ज्यावेळेला असे प्रवाह जोडले गेले, त्यावेळेला लोकांनी पुन्हा एकदा आपल्या भोवतालाचा नव्याने अन्वयार्थ लावला.
 
उदाहरणार्थ, लिओनार्डो द विंची यांनी साकारलेल्या चित्रातून कोणी मोनालिसाच्या स्मितहास्याचे रहस्य शोधले, तर कधी व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या रंगीबेरंगी चित्रांमधून त्याच्या मनाचं तळ गाठण्याचा प्रयत्न केला. चित्रांच्या विश्वातून अशाप्रकारे विविध गोष्टींचा ठाव घेण्याची प्रक्रिया रंजक तर आहेच. मात्र, त्याचबरोबर माणसाला खूपकाही शिकवणारीसुद्धा आहे.
 
डॉ. सुधीर पिलाई यांच्या चित्रप्रदर्शनामध्ये आपल्याला अशाच अनेक गोष्टींचा मागोवा घेता येतो. सुरुवातीला काळ्या-करड्या रंगांच्या कॅनव्हासवर ही चित्रं आपल्या भेटीला येतात. अचानकपणे काळ्या रंगाचा मारा झाल्याचा आपल्याला भास होतो. मात्र, इथेच खरी गंमत आहे. सप्तरंगांचा बहर फुलवून जी गोष्ट साध्य होणार नाही, ती दोन किंवा जास्तीत चार रंगांमधून चित्रकाराला पोहोचवायची आहे. आपल्या चित्रकलेतील कौशल्यापेक्षा चित्रकाराला निखळ तत्त्वविचार मांडायचा आहे, हेच आपल्याला त्याच्या चित्रांमधून दिसून येतं. या चित्रांमध्ये एकाच वेळेला ‌‘बुद्ध‌’ आणि ‌‘बुद्धदर्शन‌’ प्रकटल्याचं आपल्याला बघायला मिळतं. यातील एका चित्रामध्ये बुद्ध स्वत: एका दोरीवरून चालत आहेत. कारण, अखेर जीवन जगणं म्हणजे काय? डोंबाऱ्याचा खेळंच ना? इथे तोल सांभाळत पुढे जाणारे बुद्ध शाश्वत जीवनाचं सत्य आपल्याला सांगून जातात. ‌‘वेळ‌’ नावाची गोष्ट आणि ‌‘घड्याळ‌’ नामक यंत्राने आपल्या जीवनाचा ताबा घेतला आहे. मात्र, या ‌‘वेळ‌’ नावाच्या संकल्पनेचे आपण उद्गाते आहोत की, ‌‘वेळ‌’ या गोष्टीनेच आपल्यावर राज्य केलं आहे? असा आणखी एक प्रश्न चित्रकार आपल्यासमोर उभा करतो.
 
माणसाच्या आयुष्यात ‌‘स्पर्शा‌’लाही अनन्यसाधारण महत्त्व. स्पर्श म्हणजे जाणिवांचं माध्यम. मात्र, यामध्येसुद्धा ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जात असते, त्यावेळेला त्या व्यक्तीचा अखेरचा स्पर्शसुद्धा किती उत्कट असतो, हे चित्राच्या माध्यमातून अत्यंत सक्षमपणे चित्रकाराने मांडलं आहे. आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टीची निवड करतो, त्याच क्षणी अनेक गोष्टींसाठीची दारंसुद्धा बंद करत असतो. पर्याय न निवडणं, हीसुद्धा एकाप्रकारे निवडच असते. त्यामुळे माणूस या वास्तवाला पाठ दाखवून फार दूरपर्यंत जाऊ शकत नाही, हे सत्य चित्रकाराने कॅनव्हासवर खुबीने चितारले आहे. माणूस बऱ्याचदा त्याच्याच विचारांच्या आणि जाणिवांच्या डोहामध्ये अगदी खोलवर बुडालेला असतो. या डोहातून बाहेर पडण्यासाठी त्याला असंख्य खटपटी कराव्या लागतात. कधी या प्रयत्नात तो यशस्वी होतो, तर कधी अपयशी ठरतो. त्याचे हे प्रयत्न फसले की यशस्वी झालो, याची उत्तरं तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून त्याला मिळू शकतात. मनाचं गुपित उलगडलं की, त्याला त्याच्या या स्थित्यंतराचं आकलन होतं. या सगळ्याच्या संगमातून तयार झालेली ही चित्रमालिका खरोखरच चित्रकारांसाठी प्रेरणादायी तर आहेच; मात्र त्याचबरोबर एक नवीन विचार मांडणारी आहे, यामध्ये काही शंका नाही.
 
अशा आंतरविद्याशाखीय परिप्रेक्ष्यातून कलेकडे बघणं किंवा कलेच्या माध्यमातून जीवनाकडे बघणं, ही प्रक्रिया अवघड असते. बरेचदा असं करताना संकल्पनांच्या किचकट जंजाळातून सांगणारी व्यक्ती बाहेरच पडत नाही आणि त्यामुळे संवाद पूर्ण होत नाही. मात्र, डॉ. सुधीर पिलाई यांच्या चित्रांचं खरं यश यातच आहे की, एकाच वेळेला त्यांनी या संकल्पना आणि त्यांचा मतितार्थ लोकांसमोर मांडला. हा चित्रकार केवळ एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या माध्यमातून बघणाऱ्यांच्या मनामध्येच असंख्य प्रश्नांचं जाळं निर्माण केलं. आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणांपासून ते मुक्तीच्या संकल्पनेपर्यंत अनेक गोष्टींना नव्याने तपासण्याची वेळ दर्शकावर येते. अखेर, कुठल्याही कलाकृतीचा मूळ उद्देश काय? या विचाराच्या डोहात खोल शिरल्यास असं लक्षात येईल की, आपल्या भोवतालाबद्दल, जीवनाबद्दल त्या-त्या कलाकृतीने आपल्याला आणखी सजग करावं. ज्यावेळेला कोणतीही कलाकृती अशाप्रकारची ‌‘जागृती‌’ माणसाला प्रदान करते, त्याच वेळी ती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
 
9967826983
Powered By Sangraha 9.0