Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! गोरेगाव–सीएसएमटी लोकल सेवा तब्बल ३ महिने बंद, नेमकं कारण काय?

07 Feb 2026 19:28:32
 
Mumbai Local
 
मुंबई: (Mumbai Local) मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना पुढील काही महिन्यांत मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी हा मार्ग सलग तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Local)
 
मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याच्या प्रकल्पांतर्गत वांद्रे–खार दरम्यानचा जुना रेल्वे पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जागा उपलब्ध व्हावी म्हणून गोरेगाव–सीएसएमटी हार्बर मार्गावरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. (Mumbai Local)
 
हेही वाचा:  Gadchiroli Naxalism: गडचिरोलीत नक्षलविरोधी कारवाईत मोठे यश; २ तळ उद्ध्वस्त, C-60 चे जवान दीपक मडावी यांना वीरमरण
 
गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम रेल्वेवर विविध पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. याआधी कांदिवली ते बोरीवली दरम्यान महिनाभर ब्लॉक घेण्यात आला होता. त्या काळात दररोज सुमारे २०० ते २५० लोकल फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. आता त्याच धर्तीवर हार्बर लाईनवरही मोठा परिणाम दिसणार आहे. (Mumbai Local)
 
या निर्णयाचा फटका दररोज प्रवास करणाऱ्या अंदाजे ३.६२ लाख प्रवाशांना बसणार आहे. गोरेगाव–सीएसएमटी मार्गावरील ८८ फेऱ्या आणि वांद्रे–सीएसएमटी मार्गावरील १०६ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. हार्बर मार्गे मध्य रेल्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांना अंधेरी किंवा दादरमार्गे वळसा घ्यावा लागेल. त्यामुळे त्या स्थानकांवरील गर्दीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. अनेकांना बस किंवा इतर वाहतूक पर्यायांचा आधार घ्यावा लागेल, परिणामी प्रवासाचा वेळ वाढणार आहे. (Mumbai Local)
 
मात्र हा तीन महिन्यांचा त्रास भविष्यातील सोयींसाठी असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. नव्या मार्गिका तयार झाल्यानंतर चर्चगेट ते विरारदरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवणे शक्य होईल. तसेच एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध झाल्याने लोकल गाड्यांचा वेळ वाचेल आणि त्या अधिक नियमितपणे धावतील. (Mumbai Local)
 
 
Powered By Sangraha 9.0