Islamabad Blast : इस्लामाबादमध्ये स्फोट; पाकचे आरोप, भारताचे सडेतोड प्रत्युत्तर

07 Feb 2026 15:13:25
India’s Blunt Response to Islamabad Blast
 
मुंबई : ( Islamabad Blast) इस्लामाबादमध्ये शिया मशिदीत झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कडाडून फटकारले आहे. या हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याचा पाकिस्तानी दावा पूर्णपणे निराधार आणि निरर्थक असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
भारताचा सहभाग असल्याचा दावा फेटाळला 
शुक्रवार दिनांक ०६ फेब्रुवारीला सकाळी इस्लामाबादमधील शिया मशिदीत झालेल्या आत्मघाती स्फोटात मोठी जीवितहानी झाली. या घटनेनंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत आणि अफगाणिस्तानवर आरोप केले होते. मात्र, भारताने हे सर्व आरोप साफ फेटाळले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने रात्री उशिरा निवेदन जारी करत सांगितले की, “या हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याचा दावा पूर्णपणे निराधार आहे. अशा आरोपांना कोणताही आधार नाही.”
 
पाकिस्तान स्वतःच्या समस्यांपासून पळ काढतोय
भारताने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या. मात्र, पाकिस्तान आपल्या देशातील गंभीर अंतर्गत समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी इतर देशांवर आरोप करत असल्याचं ही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, हे दुर्दैवी आहे की पाकिस्तान आपल्या सामाजिक रचनेला ग्रासलेल्या समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी, आपल्या अडचणींसाठी इतरांना दोष देत आहे.
 
हल्ल्यात 31 मृत्यू, शेकडो जखमी 
शुक्रवारी नमाजादरम्यान इस्लामाबादमधील इमामवाडा (शिया मशीद) येथे आत्मघाती हल्ला झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’नुसार या स्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला असून १६९ जण जखमी झाले आहेत. काही माध्यमांनी मृतांचा आकडा ६९ असल्याचेही म्हटले आहे.
 
राष्ट्रपती झरदारींचा निषेध
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. “निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे माणुसकीच्या विरोधात आहे,” असे त्यांनी म्हटले. जखमी लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली असून प्रशासनाला उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
 
देशाचे मनोबल खचवता येणार नाही
संसदीय कामकाज मंत्री डॉ. तारिक फजल चौधरी यांनीही हल्ल्याचा निषेध केला. अशा दहशतवादी घटना देशाचे मनोबल खचवू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि नागरिकांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले.
 
यापूर्वीही इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ले
११ नोव्हेंबर २०२५ रोजी इस्लामाबादमधील जी-११ परिसरात जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३० हून अधिक लोक जखमी झाले होते.
 
दहशतवादग्रस्त देशांमध्ये पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर
ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२५ नुसार, बुर्किना फासोनंतर पाकिस्तान जगातील दुसरा सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. २०२४ मध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर होता. अहवालानुसार, २०२५ मध्ये टीटीपीच्या हल्ल्यांमध्ये ०९ टक्के वाढ झाली असून, बलुच आर्मी (BLA) च्या हल्ल्यांमध्ये ६० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. इस्लामिक स्टेट-खुरासान (IS-K) ने आता पाकिस्तानी शहरांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला सलग दुसऱ्या वर्षी पाकिस्तानमधील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे पाकिस्तानमधील सर्वाधिक दहशतवादग्रस्त भाग असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0