मुंबई : ( Hasan Mushrif ) कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६८ जागा आणि पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील २,६९१ मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला. या निवडणुकीत मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा तपासली जात आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक उमेदवार भारतीय जनता पक्षाचे असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात आपली ताकद आजमावली आहे. पहिल्या दोन तासांत कोल्हापूरमध्ये १०.३८ टक्के मतदानाची नोंद झाली, तर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही मतदान केले.
विलीनीकरणासंदर्भातील सुनेत्रा वहिनींच्या भूमिकेनुसार पक्ष तयार
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही निवडणूक पहिल्यांदा होत असल्याचे सांगत हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केले की, ९ वर्षांनी जिल्हा परिषद निवडणूक होत असल्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता आहे आणि नागरिक अजित पवारांविषयी सहानुभूती दाखवतील. विलीनीकरणासंदर्भातील चर्चाही अजित पवारांसोबत झाली होती आणि त्या बैठकीत नेतेमंडळी उपस्थित नव्हती. त्यामुळे सुनेत्रा वहिनींच्या भूमिकेनुसार पक्ष तयार आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या वातावरणात जे लोक शंका उपस्थित करतात त्यांना चौकशीत उत्तर मिळेल, असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
अपघात कसा झाला सत्य समोर येईल
हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघाताचा तपशील लवकरच समोर येईल. पवार कुटुंब एकत्र आहे आणि विधीच्या प्रसंगी संपूर्ण कुटुंब उपस्थित असेल. पक्ष जो निर्णय घेईल, तोच निर्णय असेल. उद्धव ठाकरे नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांना राज्यसभेत पाठवणार आहेत, त्याबद्दल अभिनंदन केले.
युतीचा घटक असताना देखील शिवसेना नेते रामदास कदम आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत आहेत, हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनीही पवार कुटुंबीयांची भूमिका स्पष्ट केली की लवकरात लवकर सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. तीन दिवसांनंतर सुनेत्रा वहिनींनी पदाची शपथ घेतली असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल व्हिलन कसे?
अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे पक्षाची मीटिंग प्रदेशाध्यक्षांनी बोलवायची असते. या प्रक्रियेत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल “व्हिलन” कसे असू शकतात, हे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष असून कोणतीही लुडबुड करणे योग्य नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची सत्ता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष राहील, राजकारण करून पक्षाला वजा करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.